Chhatrapati Sambhajinagar : द्राक्ष महासंघाच्या धर्तीवर राज्यात आले महासंघ स्थापन करण्यासाठी, आल्याला हमी भाव मिळण्यासाठी तसेच कन्नड येथे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी शासनाला भाग पाडू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कन्नड येथे रविवारी (ता. १८) पहिल्या राज्यस्तरीय आले परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राजू शेट्टी हे मार्गदर्शन करीत होते. या वेळी शेट्टी यांनी आले उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. श्री. शेट्टी म्हणाले, की शासन भांडवलदारांच्या हिताची धोरणे राबवत आहे. आले पिकावरील उत्पादन खर्च कमी करून ग्रेडिंग, प्रोसेसिंग करून आल्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
तेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ८० टक्के पामतेलात २० टक्के शेंगदाणा तेलाची भेसळ करून सामान्य जनतेची आर्थिक लूट सुरू आहे. शेतीवरील अरिष्ट दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे लढण्याची गरज आहे. कृषी अभ्यासक उदय देवळाणकर म्हणाले, की भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. एकेकाळी कोरडवाहू शेतीनेही भारताला सुवर्णयुग आणले होते.
सिंचन, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व अनैतिक कर्जपुरवठा यात शेती महागडी झाली आहे. मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी सगळ्या कृषिसंस्कृतीला नख लावण्याचे काम सुरू आहे. कोरडवाहू पिकांची अधोगती व अन्न धान्य, खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी रस्त्यावरील लढाई लढावी लागेल.
कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांनी प्रास्ताविक केले. राज्यात आले उत्पादनाचे केंद्र कन्नड ठरले आहे. या आल्यामध्ये भौगोलिक व नैसर्गिक कारणांमुळे वेगळे गुणधर्म आहेत. कन्नड येथे आले संशोधन केंद्र होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी प्रकाश पोकळे, इंजिनिअर मिलिंद पाटील, माजी आमदार नामदेवराव पवार आदींची भाषणे झाली. परिषदेला आपचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पवार उपस्थित होते. प्रा. शिवाजी हुसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सीताराम जाधव, गणपत खरे, साहेबराव दाबके, देविदास काळे, चंद्रकांत देशमुख, अनिल राजपूत, अजय जाधव, अशोक इंगळे, गणेश देशमुख, प्रा. शिवाजी हुसे, दिलीप नवले यांचा ‘माती नाती’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रकाश बोरसे यांनी आभार मानले
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.