
श्रीकांत कर्णेवार, सुतिक्ष्ण धोटे
Education Model : जर्मनीतील शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः शोधण्याची आणि समस्या सोडवण्याची संधी दिली जाते. शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि मूल्यमापन हे सतत चालू असते. कृषी शिक्षणातदेखील हीच पद्धत वापरली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये संशोधन आणि व्यावसायिक विस्ताराची संधी उपलब्ध झाली आहे.
शिक्षण हे केवळ ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे साधन आहे. प्रादेशिक भाषेत शिक्षण देणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. हा जर्मनीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये दिसणारा सर्वांत मोठा फरक जाणवतो. बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि नेदरलँड येथील व्हान हाल लारेन स्टाइन विद्यापीठामध्ये एक दशकापासून सामंजस्य शैक्षणिक करार झाला आहे.
या सामंजस्य करारानुसार भारतातील विद्यार्थी बारामती येथील कृषी महाविद्यालयामार्फत नेदरलँड येथे एक किंवा दोन वर्षाचे कृषी व्यवसाय पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण करतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी यशस्वी कृषी उद्योजक आहेत, काही विद्यार्थी विदेशात नोकरी करत आहेत. या कराराचा एक भाग म्हणून जर्मनीमधील कार्ल कांदझिया, रोन्तझ्स्च लीस्सी आणि मैय्की स्च्नेल्ले हे विद्यार्थी बारामती कृषी महाविद्यालयात त्यांचे एक सत्र पूर्ण करत आहेत. या विद्यार्थांसोबत विविध विषयावर चर्चा होत असताना आम्हाला जर्मनी आणि भारतीय शिक्षण पद्धतीतील फरक लक्षात आला.
जर्मनीमधील शिक्षण प्रणाली
भारत आणि जर्मनी हे दोन वेगवेगळ्या संस्कृती, इतिहास आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेले देश आहेत. या दोन्ही देशांच्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा फरक दिसतो. भारतीय शिक्षण पद्धतीला एकूणच पारंपारिक पद्धत म्हणता येईल. या पद्धतीमध्ये शिक्षक केंद्रित दृष्टिकोन अधिक प्रचलित आहे. विद्यार्थ्यांना माहिती देणे आणि ती माहिती विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे यावर भर दिला जातो. परीक्षा ही मूल्यमापनाचे साधन आहे. मात्र जर्मनीतील शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः शोधण्याची आणि समस्या सोडवण्याची संधी दिली जाते. शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि मूल्यमापन हे सतत चालू असते. केवळ परीक्षांवर मूल्यमापन केले जात नाही.
व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करण्यासाठी युरोपीय देशांतील पालकांना विशेष भर द्यावा लागत नाही, कारण तिथे ‘लर्निंग बाय अर्निंग' ही पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेताना स्वतःच्या गरजेपुरती कमाई करण्यास सुरवात करतो. विद्यार्थाला शिक्षणाची किंमत पैशाच्या स्वरूपात मिळते. परंतु भारताचा जर विचार केला तर अभ्यास विद्यार्थ्याला करायचा असला तरी त्याचा दबाव हा पालकांवर येतो. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना चांगल्या अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे लागते.
भारतीय शिक्षण पद्धती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून बनलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल नाराजीचा सूर दिसून येतो. केवळ नोकरी पुरत्या शिक्षण पद्धतीमुळे कौशल्य विकास शिक्षण पद्धतीवर परिणाम झाला. आता जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन आपल्याला कौशल्याधारित आणि व्यावसायिक शिक्षण प्रणालीवर भर देणे आवश्यक झाले आहे. आपला बहुतेक तरुण वर्ग हा पदवीसाठी परीक्षा यामध्ये गुंतला आहे, परंतु परदेशातील विद्यार्थी हे त्यांच्या पदवीचा वापर व्यवसाय, नोकरी तसेच नवनवीन संशोधनातील संधी शोधण्यासाठी करतात. पाश्चात्त्य देश आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये एक मोठा फरक म्हणजे भारतात अभ्यासक्रमांमध्ये सैद्धांतिक भागावर जास्त भर दिला जातो आणि तेच पाश्चात्त्य देशांमध्ये व्यावहारिक विषयावर लक्ष केंद्रित केले जाते.
शिक्षणात प्रात्यक्षिकांवर भर
उद्योगधंद्याची गरज
पाश्चात्त्य देशांमध्ये उद्योगधंद्यांचा मोठा विकास झाला असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष उद्योगामध्ये थेट काम करू शकतील अशा लोकांची गरज असते. त्यामुळे शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक ज्ञानावर भर असतो.
नवीन तंत्रज्ञानाचा विकास
पाश्चात्त्य देशांमध्ये सातत्याने नवीन तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असते. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम करण्यासाठी प्रात्यक्षिकांवर भर आहे.
स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती
पाश्चात्त्य देशांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची प्रवृत्ती अधिक प्रबळ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बुद्धीचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
उद्योजकता विकास
पाश्चात्त्य देशांमध्ये उद्योजकता विकासाला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जातो.
शिक्षणातील फरक भारतात शिक्षण मुख्यतः सैद्धांतिक असते. जर्मनीमध्ये व्यावहारिक आणि सैद्धांतिक शिक्षणाचे संतुलन असते. जर्मनीमध्ये विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात विशेषता मिळते. पण भारतात ही विशेषता उच्च माध्यमिक स्तरावर सुरू होते. भारतामध्ये शालेय स्तरावर व्यावसायिक प्रशिक्षणावर कमी भर असतो. केवळ शैक्षणिक उपक्रमाला प्राधान्य दिले जाते. जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण, कार्यानुभवावर भर आहे. भारतामध्ये स्पर्धात्मक आणि परीक्षेवर आधारित शिक्षण प्रणाली आहे. जर्मनीमध्ये सहकार्यपूर्ण वैयक्तिक विकासावर केंद्रित शिक्षण प्रणाली आहे.
भारतातील शिक्षण व्यवस्था ही शिक्षक केंद्रित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षण प्रणाली विद्यार्थी केंद्रित आहे. उदाहरण द्यायचे झाले तर जी दिशा शिक्षकांनी पूर्व दिशा म्हणून सांगितली, तीच खरोखर पूर्व दिशा आहे का?. यावर चर्चा होऊन एक सकारात्मक उत्तर जे विद्यार्थी आणि शिक्षकांना दोघांनाही अपेक्षित असते. या पद्धतीच्या शिक्षण प्रणालीतून विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीबाबत विशेष पडताळणी करायची सवय लागते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमावर भर
भारतात अजूनही परंपरागत शिक्षण पद्धतीचेच प्रमाण जास्त आहे. यात पुस्तकी ज्ञानावर जास्त भर दिला जातो. भारतातील बहुतेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यावर भर देतात. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक साधनसंपत्ती उपलब्ध नाही. भारतातील अभ्यासक्रम खूपच मोठा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. भारतात माध्यमिक शिक्षण हे दोन टप्प्यात विभागलेले आहे. यामध्ये माध्यमिक स्तर ५ वी ते १० वी आणि उच्च माध्यमिक स्तर ११ वी आणि १२ वी असा आहे. या टप्प्यावर विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य किंवा कला यांपैकी एक प्रवाह निवडतात. भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये खूप स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
जर्मनीत माध्यमिक शिक्षण (सेकुन्दार्स्तुफे) साधारणपणे पाच वर्षांचे असते. यामध्ये दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा (लोअर सेकंडरी) पाचवी ते सातवी इयत्ता आणि दुसरा टप्पा (अप्पर सेकंडरी) हा आठवी ते दहावी इयत्तेपर्यंत असतो. जर्मनीमध्ये माध्यमिक शिक्षणाचे तीन मुख्य प्रकार आहेत.
गेसाम्त्स्चुले ः या प्रणालीद्वारे विविध अभ्यासक्रमासाठी पात्र होता येते. जसे की व्यावसायिक किंवा उच्च मानकांच्याप्रमाणे अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी पात्र होतात.
रेअल्स्चुले ः हा व्यावसायिक प्रशिक्षण किंवा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उपयुक्त अभ्यासक्रम आहे.
गम्यसिउ काः हा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरासाठी आहे.
या तीन प्रकारच्या शाळांमध्ये परीक्षा किंवा शिफारशीच्या पत्रांच्या आधारे प्रवेश मिळतो. जर्मनीमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यावसायिक प्रशिक्षण आणि शालेय शिक्षणाचे संयोजन असलेल्या व्यवहार्य शिक्षण पद्धतीने दिले जाते.
श्रीकांत कर्णेवार ९४२२३०२५६९
(डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती, जि.पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.