
Wardha News: कायम दुर्लक्षित राहिलेल्या गावधन गुराख्यांच्या कार्याचा राज्यात पहिल्यांदाच सन्मान करण्यात आला. त्यांना १० लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात आले. शिवाय त्यांना सुरक्षा किटचेही वितरण करण्यात आले.
वर्धा येथे झालेल्या एका कार्यक्रमात ११ गावांतील निवडक गुराख्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम गौळाऊ गोवंशाच्या जतन, संवर्धन व संशोधनासाठी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ‘गौळाऊ गोवंश जतन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे राबवण्यात आला. ग्रामीण भागातील गोवंश संवर्धनात गुराख्यांचे योगदान अनमोल आहे.
या योगदानाची दखल घेत ट्रस्टने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम आयोजित केला. जंगलात जनावरे चारणाऱ्या गुराख्यांवर वारंवार होणारे वाघांचे हल्ले, सर्पदंश, मुसळधार पावसातील अपघात अशा अनेक नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर गुराख्यांच्या सुरक्षेसाठी ही अभिनव योजना साकारली गेली. त्यांना १० लाख रुपयांचे अपघात विमा कवच, पावसाळी रेनकोट व बूट प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब गलाट होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका पशुधन विकास अधिकारी राजेंद्र घुमडे, पशुपालक अभ्यासक सजल कुलकर्णी, आर्वी पोस्ट मास्टर शुभम झोड आणि आयोजक पुष्पराज कालोकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गणराज गलाट यांनी केले, तर डॉ. प्रफुल्ल कालोकार यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी वसंत झामरे, लोभेश्वर असोले, बबन येवले, देविदास राऊत, प्रमोद खोब्रागडे, महेंद्र जुननाके, नीलेश गलाट, अजिंक्य शहाणे, राजू चंदनखेडे, गोकुळ सोनवणे, राहुल, कुणाल, महेश कालोकार यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या कार्यक्रमात ट्रस्टच्या www.gaolaobredeers.org या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.
या गुराख्यांचा झाला सन्मान
विनोद हुके (भिवापूर), गजानन कालोकार (दानापूर), भास्कर गळहाट (दहेगाव), रूपेश लाटकर (माळेगाव काळी), सुनील भोंडे (कासारखेडा), होरेश्वर शेळके (गुमगाव), श्रीकृष्ण पाटीलपैक (बेढोणा), नारायण साठे (चोपण), मारोती नेहारे (काचनूर), ऋषेश्वर साठे (चांदणी), मुरलीधर ठाकरे (मोरंगणा) हे गुराखी गत अनेक वर्षांपासून १०० ते २५० जनावरांचा कळप घेऊन जंगलात चराईसाठी जात असून, गोवंश संवर्धनात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.