
Market Trends : कांद्याबरोबर लसूण हे देखील मसाल्याचे महत्त्वाचे पीक आहे. अलीकडील काळात ग्राहकांकडून त्यास मागणी वाढली आहे. पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीत १० ते १२ लसूण व्यापारी आहेत. अलीकडील काळात लसणाचे दर चढे असून ते त्या स्थितीत स्थिर आहेत. चालू वर्षी नोव्हेंबरमध्ये उच्चांकी प्रति किलो ३८० ते ४०० रुपये दर मिळाला. किरकोळ ग्राहकांना हाच लसूण ३०० ते ४०० व त्यापुढील दराने खरेदी करावा लागला होता.
काही काळात हे दर कर ५०० ते ६०० रुपयांच्या पुढे गेले होते. सध्या बाजारात पांढऱ्या गावरान लसणाची परराज्यांतून दररोज पाच ते १० गाड्यांची आवक सुरू असून, दर प्रति किलो १५० ते २८० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. दर तेजीत असण्याचे कारण म्हणजे अलीकडील काळात लागवडीचे क्षेत्र घटले आहे. तसेच अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होऊन आवकेवर परिणाम झाला आहे.
यंदाचे चित्र
थंड हवामानात लसणाची वाढ चांगल्या प्रकारे होते. अनेक शेतकरी कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढ्याच क्षेत्रात त्याची लागवड करतात. साठवणुकीवरही भर देतात. पुढील हंगामात लागवडीच्या वेळेस गरज वाटल्यास थोड्याफार प्रमाणात गावातच किंवा बाजारात विक्री करतात.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात व गुजरात, मध्य प्रदेश राजस्थान भागात लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुलटेकडी बाजारात नाशिक, पुणे, नगर, सातारा या भागातून आठ ते दहा दिवसांतून एक ते दोन गाड्या लसणाची आवक होते. तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या भागातही मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करत असल्याने येथूनही मोठी आवक होते.
येथे आल्यानंतर पुणे शहर आणि उपनगरांमध्ये जवळपास ९० टक्के विक्री होते. त्यानंतर नगर, बारामती तसेच कर्नाटक, तमिळनाडू, केरळ येथेही लसूण पाठविला जातो. चालू वर्षी दर गगनाला भिडल्याने परराज्यातून पुणे मार्केटला लसूण मागवावा लागला. अशावेळी यंदा अफगाणिस्तानातूनही पहिल्यांदाच एक ते दोन गाड्या दाखल झाल्या होत्या. या लसणाला तुलनेने मागणी कमी असली तरी दर मात्र गावरान लसणाप्रमाणे होते.
दोन प्रकारची आवक
बाजारात दोन प्रकारच्या लसणाची आवक होते. यात गावरान लसूण गुलाबी रंगाचा असून, त्यास किलोला २०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. लांबी कमी, नावाप्रमाणे गुलाबी रंग, वजनदार, चमक व तिखटपणा जास्त अशा या लसणाला मागणी जास्त असते. पांढऱ्या रंगाच्या गावरान लसणाची लांबी थोडी जास्त, बऱ्यापैकी वजनदार, चमक व तिखटपणा थोडा कमी असतो. मसाले प्रक्रियेसाठी त्याचा जास्त वापर होतो. घरगुती ग्राहकांबरोबरच प्रक्रिया व्यावसायिकांकडून त्यास वर्षभर मागणी असते. मार्केटमध्ये लसणाच्या पाकळ्यांचीही आवक असून चांगल्या प्रतीच्या पाकळ्यांची प्रति किलो १५० ते २२० रुपयांप्रमाणे विक्री होते.
उलाढाल स्थिती
वर्षभराचा विचार केल्यास लसणाला पुणे मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी २०० ते ३०० रुपयांचा दर मिळतो. परंतु लागवडीच्या किंवा महत्त्वाच्या सणांच्या काळात दरांत काहीशी वाढ झालेली असते.
आनंदा कोंडे
९८२२०२८४९५ विभाग प्रमुख, बाजार समिती, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.