
Pune News: गेल्या काही दिवसांमध्ये पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पाबाबत शासन एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. आता शासनाने ड्रोनद्वारे सर्व्हे केला जाईल, असे जाहीर केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण ज्या क्षेत्रावर ड्रोनच्या साह्याने सर्व्हे करणार आहेत. त्या गावांतील सात-बारा उतारावर जिराईत म्हणून पूर्वीच नोंदी केल्या आहेत. प्रत्यक्ष शेतात अनेक प्रकारची फळझाडे असताना सात-बारा उतारावर जिराईत म्हणून नोंद असल्याने पीककर्ज मिळविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी सात-बारा उतारावर पीकपाणी नोंद करण्यासाठी महसूल कर्मचारी शेतावर येऊन नोंद करीत होते. मात्र मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना स्वतःच नोंदी करण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला.
पीकपाणी नोंदविण्यासाठी संपूर्ण राज्यात एकच वेबसाइट असल्याने महिनोन््महिने सर्व्हर बंद असतो. त्यामुळे कित्येक वर्षे शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदच सात-बारा उतारावर झालेली नाही. शेतात आंबा, चिकू, सीताफळ, पेरू, जांभूळ, डाळिंबाच्या बागा असून, अनेक शेतकरी आता पाणी उपलब्ध असल्याने ऊस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत, मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या नोंदीच अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत.
अनेक शेतकऱ्यांनी एक ते चार, पाच किलोमीटरपर्यंत पाइपलाइन करून शेतात पाणी नेले आहे. शेतातील पीकपाणी नोंद करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे असताना चुकीच्या पद्धतीने नोंदी झाल्याने प्रकल्पबाधित गावांतील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे फटका बसला आहे. तालुक्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार, विभागाचे मंडलाधिकारी आणि तलाठी यांना याबाबत पूर्ण कल्पना असतानाही एकाही अधिकाऱ्याने सात-बारा पीकपाहणी करण्याची काळजी घेतलेली नाही. त्यामुळे कार्यालयात बसूनच चुकीच्या पद्धतीने महसूल विभागाने नोंदी करीत असताना बागायती क्षेत्र जिराईत म्हणून दाखविले आहे.
प्रत्यक्ष शेतात पीकपाहणी करणे गरजेचे
ड्रोन सर्व्हे करण्याचे शासनाने एक मे पासून ठरवले असले तरी यामध्ये फारसे तथ्य राहणार नाही. कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी नांगरून ठेवल्या आहेत. ज्या शेतात फळबागा आहेत. त्यांच्याच बागा दिसणार आहेत. मात्र ज्यांनी जमिनी खालून पाइपलाइन आणली आहे. त्यांच्या नोंदी कशा करणार, त्यासाठी जमिनीवरून प्रत्यक्ष शेतात जाऊन पीकपाहणी करणे गरजेचे आहे. अन्यथा, केवळ ड्रोनमधून शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
काही गावच्या तलाठ्यांचे प्रताप
अनेक ठिकाणी माळरान असताना तिथे सुपीक जमीन दाखविण्याचा प्रताप काही गावच्या तलाठ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांना कायमच त्याचा फटका बसत आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.