Success Story
Success StoryAgrowon

Success Story : माळरानावर जतच्या गायत्री पुजारींनी शून्यातून साकारले शेतीचे विश्‍व

नजर जाईल तिथपर्यंत माळरान आणि उगवलेली कुसळं. त्या माळरानावरील दगड फोडून स्वावलंबी होण्याची जिद्द आणि याच जिद्दीच्या जोरावर शेती करण्याचा केलेला निर्धार. माळरानावर शून्यातून शेतीचे विश्‍व निर्माण करण्याचे धाडस जत तालुक्यातील पांडोझरी गावातील गायत्री कल्लाप्पा पुजारी यांनी केले आहे.
Published on

Sangli Story : जत आणि दुष्काळ हे नाते तसं जुनेच. जत तालुक्याच्या पूर्व भागातील पांडोझरी हे गायत्री पुजारी यांचे सध्याचे मूळ गाव. जमखंडी तालुक्यातील काजीबेळगी हे गायत्रीताईंचे सासर. लग्न झाल्यानंतर पती कल्लाप्पा यांच्या सोबत नोकरीनिमित्त मोटेवाडी (ता.जत) येथे आल्या.

तिथं आल्यावर मराठी भाषा शिकल्या. गायत्रीताईंचे पती कल्लाप्पा हे सेवानिवृत्त शिक्षक. १९९८-९९ च्या दरम्यान पुजारी कुटुंब मोटेवाडीतून पांडोझरी गावात स्थलांतरित आले. मुलांच्या शिक्षणासाठी शहरात जाऊन राहण्याचा विचार कल्लाप्पा यांच्या मनात आला.

मात्र गायत्रीताईंनी त्यास विरोध केला. शहरात राहून पोट भरणार नाही. गावातच राहून आनंदी आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा निर्धार त्यांनी केला.

माळरानावर जमीन खरेदी

घरात बसून घरगाडा चालणार नाही. इतर कामांपेक्षा शेती करण्याचा विचार मनात आला. मात्र पती कल्लाप्पा यांनी शेती खरेदीसाठी नकार दिला. पण इच्छाशक्ती अफाट असल्याने गायत्री यांनी शेती खरेदीसाठी वडिलांकडून पैसे घेतले.

त्यातून पांडोझरीत ९ एकर खडकाळ आणि पडीक माळरानावरील जमीन खरेदी केली. माळरानावर फक्त कुसळं उगवली होती. शेतीमधील काहीच माहिती नसताना, याच माळरानावर शेती फुलविण्याचा निर्धार त्यांनी केला. गावातील लोक ‘आता ही शेती करणार’ अशी नावं ठेवायला लागली.

मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शेतीसाठी अभ्यास सुरू केला. माळरानावर कमी पाण्यात कोणती पिके घ्यावीत, याचा अभ्यास सुरू केला. त्यातून डाळिंब शेतीचा पर्याय समोर आला. शेती विकास करताना येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीचे चांगले मार्गदर्शन मिळाले.

Success Story
Sugarcane Production : माळरानावर पूर्वहंगामी उसाचे एकरी १०५ टन उत्पादन

शेतीसाठी पाण्याचा प्रश्न होताच. सुरुवातीला लहान आकाराचे शेततळे उभारले. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ३५ गुंठे क्षेत्रावर ८० ते ९० लाख क्षमतेचे शेततळे उभारून पाण्याचा शाश्‍वत स्रोत निर्माण केला. ठिबक सिंचनावर अधिक भर दिला.

पहिल्या टप्प्यात चार एकरांवर डाळिंब लागवड केली. मात्र निसर्ग आणि अपुऱ्या ज्ञानामुळे डाळिंब पीक तेलकट डाग रोगामुळे काढून टाकावी लागली. तरी हार मानली नाही. त्यानंतर २००२ मध्ये ड्रॅगन फ्रूट सव्वा एकरावर लागवड केली.

सध्या त्यांची अडीच एकर क्षेत्रामध्ये द्राक्ष लागवड आहे. द्राक्ष विक्रीबरोबर बेदाणा निर्मितीदेखील केली जाते. दरवर्षी सुमारे ५ टन बेदाणा तयार करून त्याची तासगाव येथे विक्री गायत्रीताई करतात.

शेतीमुळे मिळाली सक्षमता

शेतीच्या उत्पन्नातून मुलांची शिक्षणं पूर्ण केली. मोठा मुलगा श्रीनिवास एम.टेक., मुलगी शांभवी बीई सिव्हिल तर लहान मुलगा श्रीधर याने कृषीमध्ये पदवी घेतली आहे. या सगळ्यांत पती कल्लाप्पा यांची मोठी साथ मिळाली. शेतीसाठी यांत्रिकीकरण आणि इतर साहित्यांची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी कल्लाप्पा यांच्याकडे असते.

खडकाळ माळरान झाले हिरवेगार

माळरानावर आंबा, पेरू, चिकू, बोर, कवठ, हदगा अशा अडीशेहून अधिक झाडांची लागवड करत खडकाळ जमीन हिरवीगार केली आहे. शेतात आल्यानंतर दुष्काळी भागात आहोत, असं वाटतंच नसल्याचं भेट देण्यास येणारे शेतकरी सांगतात. सायंकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. बागेशेजारीच दोन शेततळी आणि बेदाण्यासाठी शेड उभारले आहे.

संपर्क - गायत्री पुजारी ७६६६५१८१६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com