Grape Market : मागणीमुळे द्राक्षांचे यंदा ‘पेड कटिंग’ पद्धतीने व्यवहार

Grape 'ped cutting' method : व्यापाऱ्यांकडून मालाची शोधाशोध; खरेदीपश्चात पैसे शेतकऱ्यांच्या हातात
Grape Market
Grape MarketAgrowon

मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik news : नाशिक : द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात निर्यातक्षम मालाचे पैसे झाले. मात्र इतर मालाला दर सर्वसाधारण होते. मात्र मार्चमध्ये उन्हाचा चटका वाढताच द्राक्षांची मागणी वाढल्याने दरात सुधारणा दिसून आली. उपलब्धता कमी होत गेल्याने व्यापाऱ्यांची धावाधाव सुरू होती. त्यातूनच यंदा हंगामाच्या मध्यानंतर ‘पेड कटिंग’ पद्धतीने व्यवहार झाल्याचे द्राक्ष पट्ट्यात दिसून आले. या माध्यमातून खरेदीपश्चात लगेच पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले.

मागील काही वर्षांत मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने व्यापारी व निर्यातदारांच्या मागे धावण्याची वेळ द्राक्ष उत्पादकांवर होती. मात्र यंदा हे चित्र बदलल्याचे दिसून आले. द्राक्ष उत्पादक शेतकरी कष्टाने माल पिकवतो; मात्र काही व्यापारी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तर काही अधिक दराचा लोभ दाखवून खरेदीत फसवणूक करत असतात. तर काही व्यापारी माल नेऊन बदल्यात धनादेश देऊन पोबारा होतात. यंदा असे प्रकार कमी होते.
पूर्वी एक एकर द्राक्ष खुडे करण्यासाठी आठवडाभर कामकाज व्हायचे. आता दोन ते तीन दिवसांत व्यापाऱ्यांकडून ते पूर्ण केले गेले. त्यामुळे व्यापाऱ्यांशी सौदा झाल्यानंतर १ ते २ रुपये कमी; मात्र जागेवर खरेदी व तत्काळ पैसा या पद्धतीने शेतकऱ्यांनीही ‘पेड कटिंग’ला प्राधान्य दिले. जिल्ह्यात अंतिम टप्प्यात जवळपास २० टक्क्यांवर व्यवहार हे ‘पेड कटिंग’ पद्धतीने झाले. द्राक्षाची उपलब्धता कमी असल्याने अनेक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडे चकरा माराव्या लागल्या. यंदा मागणी वाढल्याने एप्रिलच्या मध्यातच हंगामाची सांगता होण्याची चिन्हे आहेत.

Grape Market
Grape Farming : म्हेत्रे घेताहेत निर्यातक्षम रंगीत द्राक्षांचे उत्पादन

अशी आहे ‘पेड कटिंग’ पद्धत
शिवारखरेदी पद्धतीने व्यापारी स्वतः द्राक्षाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करून दर ठरवतात. त्यानंतर उपलब्ध मनुष्यबळामार्फत द्राक्ष काढणी होते. काढणीपश्चात मालाची हाताळणी व प्रतवारी करून थेट जागेवरच पॅकिंग करून विविध बाजारपेठांमध्ये ही द्राक्षे जातात. त्यामुळे बागेत मणी उरत नसल्याने बेदाणा उत्पादकांना द्राक्ष मण्यांच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर काही ठिकाणी जावे लागले. त्यामुळे द्राक्ष मण्याला २० रुपयांवर दर मिळाल्याने वीस वर्षांत उच्चांकी दर मिळाल्याचे बोलले जात आहे.

दराची स्थिती अशी
स्थानिक बाजारात द्राक्षाचे दर २० पासून ३५ रुपयांपर्यंत होते. मालाचा मागणी वाढताच साधारण ४५ ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळाले. त्यामुळे किलोमागे जवळपास १५ ते २० रुपये अधिक मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला.

यंदा चांदवड, दिंडोरी, सिन्नर येवला या भागांतील खुडे आटोपले आहेत. तर निफाड व नाशिक परिसरातील काही ठिकाणी खुडे सुरू आहेत. दरवर्षी मालाची उपलब्धता असल्याने मागणी दबाबात असल्यामुळे दाराला फटका बसतो. मात्र यंदा ‘पेड कटिंग’मध्ये रोख पेमेंट मिळाल्याने शेतकऱ्यांना हातात वेळेवर पैसे आले आहेत. संघाने जनजागृती केल्याने व्यवहारात फसवणूकही कमी झाली आहे.
- रवींद्र निमसे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक

आजवर कधीही ‘पेड कटिंग’प्रमाणे सौदा झालेला नव्हता. यंदा पहिल्यांदा मालाचा तुटवडा झाल्याने व्यापाऱ्याने बागेत येऊन स्वतःच्या मजुरांकडून माल खुडून नेला. पूर्वी द्राक्षाची खुडे करताना निसाई अधिक व्हायची, काही माल शिल्लक ठेवला जायचा. यंदा संपूर्ण माल खुडून नेला. त्यामुळे नुकसान कमी होऊन उत्पन्नवाढीसाठी मदत झाली.
- बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वडनेर भैरव, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com