
डॉ. अनिल तारू, प्रवीण देशपांडे, डॉ. अमोल झापे
सध्या नवीन फळझाडांची लागवड सुरू झाली आहे. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांपर्यंत फळझाडांची लागवड सुरू असते. या लागवडीच्या हंगामाच्या फायदा घेण्यासाठी गावपातळीवर विविध फळपिकांच्या रोपे/कलमे विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट दिसून येतो.
मोठ्या आकारांच्या पिशवीमध्ये मोठ्या वयाची आणि आकाराची विविध रोपे/कलमे ज्यांच्या वयाची आहेत, कोणता मातृवृक्ष आहे, कोणत्या पद्धतीने तयार केली आहेत याची शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही.
या विक्रेत्यांकडे विक्री परवाना नसतो तसेच विक्रीचा कोणताही ठरावीक दर ठरलेला नसतो. अशा विविध बाबींकडे दुर्लक्ष करून बरेच शेतकरी अशा प्रकारच्या ठिकाणाहून आपल्या शेतात लावण्यासाठी रोपे/कलमे विकत घेतात. अशी रोपे, कलमांच्या खरेदीमुळे पुढील टप्प्यांत नुकसान होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन नवीन रोपे/कलमे विकत घेताना विशेष काळजी घेणे आणि तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे.
रोपे/कलमे खरेदी करताना
जून ते ऑगस्ट महिन्यांपर्यंत फळपिकांच्या लागवडीची शिफारस आहे. चांगले दोन पाऊस म्हणजेच साधारण १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर फळपिकांची लागवड करावी. योग्य आकाराचे लागवडीचे खड्डे, सूक्ष्म सिंचनाची व्यवस्था महत्त्वाची आहे.
कृषी विभागाची जिल्हा तसेच तालुकास्तरावरील फळरोपवाटिका, कृषी विद्यापीठातील फळ रोपवाटिका, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्रांमधील फळरोपवाटिका (लिंबूवर्गीय पिकासाठी नागपूर, द्राक्ष पिकासाठी पुणे, डाळिंब पिकासाठी सोलापूर), कृषी विज्ञान केंद्राची फळरोपवाटिका, एनएचबीकडून मान्यता प्राप्त फळरोपवाटिका आणि कृषी विभागाकडून मान्यता प्राप्त खासगी फळरोपवाटिकेतून रोपे, कलमांची खरेदी करावी.
शासकीय तसेच शासनमान्य फळरोपवाटिकेतून रोपे, कलमांची निवड करावी.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन फळपिकांची लागवड करणार असेल तर पूर्वसंमती मिळाल्यानंतर रोपे/कलमे खरेदी करावीत.
ज्या फळपिकांची रोपे/कलमे आपण घेणार आहोत, त्या पिकांचे मातृवृक्ष रोपवाटिकाधारकाकडे असल्याची खात्री करावी.
फळरोपवाटिकाधारकाकडे चालू वर्षीच्या रोपे/कलमे विक्रीची शासनाची परवानगी असल्याची खात्री करावी.
रोपे/कलमे घेताना ते एक वर्ष वयापेक्षा लहान आणि दोन वर्षांपेक्षा अधिक जुने नसावेत, याची शहानिशा करावी, त्यासाठी रोपे/कलमे नोंदणी (स्टॉक) रजिस्टर तपासावे.
रोपे/कलमे १.५० फूट उंचीपेक्षा कमी आणि २.५ फूट उंचीपेक्षा जास्त नसावीत. कारण १.५ फूट उंचीपेक्षा कमी रोपे/कलमांची कडक होण्याची प्रक्रिया (हार्डनिंग) पूर्ण झालेली नसते. २.५ फुटांपेक्षा उंची रोपे/कलमांची मुळे पिशवीमध्ये गुंडाळलेली आणि वाढ खुंटलेली असण्याची शक्यता असते. जास्त उंच आणि जास्त वयाची रोपे/कलमे शेतात लावल्यानंतर जमिनीशी एकरूप होण्यास अडचणीची होतात.
लिंबूवर्गीय फळपिके, द्राक्ष, डाळिंब,पपई अशा पिकांच्या रोपे/कलमांच्या माध्यमातून फळरोपवाटिकेतून विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे खरेदी करताना रोपे/कलमे तसेच मातृवृक्ष रोग आणि कीडमुक्त आहेत याची माहिती घ्यावी.
फळपिकांच्या शिफारशीत केलेल्या जातींची निवड करावी. रोपवाटिकेमधून पक्की पावती आवर्जून घ्यावी. पावतीमध्ये फळपिकांच्या नावासोबत जातीचा उल्लेख, दिनांक तसेच दरांची स्पष्ट नोंद तपासावी.
ज्या ठिकाणी आपल्याला फळपिकाची लागवड करायची आहे त्या ठिकाणावरून जवळ असलेल्या किंवा एकाच हवामान विभागात असलेल्या रोपवाटिकेतून रोपे, कलमांची निवड करावी.
रोपे/कलमे आपल्या शेतात आणल्यानंतर ती सावलीत ठेवावीत. दुपारच्या उन्हाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी रोपे/कलमांना आपल्या शेतातील वातावरणाशी जुळून घेण्यासाठी ८ ते १० दिवसांची विश्रांती द्यावी.
रोपे/कलमांना यांना वातावरणाचा ताण बसलेला असेल किंवा रोपे/कलमे सुकल्यासारखी दिसत असतील तर त्यावर प्रति लिटर पाण्यात ३ ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी.
- डॉ. अनिल तारू, ९९६०२३२४८०, (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.