Maharashta Karnataka Sugarcane Rate : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. परंतु दोन्ही राज्यांच्या सीमेवरील साखर कारखान्यांच्या ऊसदरात १०० ते १५० रुपयांची तफावत दिसत असल्याने उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारकडून उसाची एफआरपी जाहीर केली आहे यामध्ये महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातील साखर कारखान्यांचे दर जास्त असल्याने यंदाचा गळीत हंगामात महाराष्ट्रातील सीमाभागाच्या साखर कारखान्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील ४ साखर कारखान्यांचे दर एफआरपीपेक्षा जास्त दर आहेत.
कर्नाटक सरकारने यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्यांच्या उताऱ्यानुसार प्रतिटन उसाचा दर जाहीर केला आहे. बेळगाव जिल्ह्यात निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट, कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स, बेळगाव तालुक्यातील हुदली येथील बेळगाव शुगर्स व बैलहोंगलच्या सोमेश्वर कारखान्यांची एफआरपी ३९०० पेक्षा अधिक आहे. सरकारने जाहीर केलेल्या दरात तोडणी व ओढणी वजा करून हे दर मिळणार आहे.
व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्टचे (बेडकिहाळ) कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी झालेल्या हंगामातील साखर उताऱ्यानुसार सरकारने दर देण्याचे सूचित केले आहे. सरकारने जाहीर केलेल्या प्रतिटन ऊस दरात तोडणी व ओढणी वजा करून उत्पादकांना दर देण्यात येणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.
यावर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, साखरेच्या उताऱ्यावरून सरकारने एफआरपी ठरविलेली असते. यातून तोडणी व ओढणीचा खर्च वजा केल्यावर प्रत्यक्षात ऊस उत्पादकांना कमी बिल मिळणार आहे. कारखान्यांचे उत्पन्न बघितल्यास अधिक दर देणे शक्य आहे. गतवर्षीच्या गाळपापोटी २०० रुपये अधिक मागणी केली आहे. सरकारच्या एफआरपीबाबत व यंदाच्या बिलाबाबत २५ ऑक्टोबरला ऊस परिषदेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने गत गाळपातील उताऱ्यानुसार यंदाची एफआरपी जाहीर केली आहे. त्यानुसार दर देण्याचे सूचित केले आहे; पण यात तोडणी व ओढणी कमी असल्याने आणि इतर उपपदार्थांची निर्मिती कारखान्यांत होत असल्याने एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी असल्याचेही शेट्टी म्हणाले.
१३ कारखान्यांचा उतारा ११ पेक्षा अधिक
गतवर्षीच्या उताऱ्यानुसार हा दर निश्चित केला जातो. त्यानुसार कर्नाटकच्या साखर आयुक्तांनी उत्तर कर्नाटकातील ६५ कारखान्यांची एफआरपी जाहीर केली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची एफआरपी चांगली आहे. जिल्ह्यातील २८ पैकी २६ कारखान्यांचा उतारा १० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे यंदा उसाला अधिक दर मिळेल, अशी आशा आहे. केवळ दोन कारखान्यांचा उतारा हा दहापेक्षा कमी आहे. १३ कारखान्यांचा उतारा ११ पेक्षा अधिक आहे.
१०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३४०० रुपये प्रतिटन दर निश्चित केला आहे. १०.२५ टक्क्यांपेक्षा जास्त उताऱ्यासाठी प्रत्येकी १ टक्का उतारा वाढल्यास त्याला अतिरिक्त ३३२ रुपये वाढीव द्यावे लागणार आहेत. ९.५० टक्के किंवा ९.५० पेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांसाठी ३१५१ रुपये दर निश्चित केला आहे. यात कारखान्यांची तोडणी व ओढणी वजा करून उत्पादकांना दर दिला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.