Sugarcane : 'गतवर्षीचा २०२३-२४ हंगाम चांगला गेला आहे. मोलॅसिस, बगॅसच्या दरात वाढ झाली आहे. ब्राझीलमधील दुष्काळामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उंचावतच आहेत. सरासरी ३५५० रुपये क्विंटलने गतवर्षीच्या साखरेची विक्री झाली आहे. त्यामुळे कारखानदारांनी मुकाट्याने शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसाला टनामागे २०० रुपये द्यावेत’, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी (ता.१४) बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
शेट्टी म्हणाले, ‘जयसिंगपूर ऊस परिषदेत गतवर्षीच्या उसाला २०० रुपये देण्याच्या मागणीसह यंदा अपेक्षित पहिली उचल देण्याची घोषणा होणार आहे. यावर्षी देशांतर्गत गरज भागवून उर्वरित साखर निर्यातीला वाव आहे. त्यातून कारखानदारांना चांगला दर मिळणार आहे. तोडणी वाहतूक वाढल्याने एफआरपी वाढूनही शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. ३००० ते ३३०० रुपयांपर्यंत कारखानदारांनी दर दिला. तेच सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांनी लांबून ऊस आणूनही ३६०० रुपयांवर दर दिला आहे. यामुळे इतर कारखान्यांना आणखीन २०० रुपये देणे अवघड नसल्याचे मत शेट्टींनी व्यक्त केले.’
शेट्टी पुढे म्हणाले, ‘स्वाभिमानीची ऊसदराची मागणी कधीच अवास्तव नसते. या मागणीच्या अनुषंगानेच जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी टनामागे १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. इतर कारखानदारांनीही रक्कम द्यावी. यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. अजूनही महिन्याचा कालावधी आहे. यामुळे हंगामाच्या तोंडावर आंदोलन करीत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. २५ तारखेला ऊस परिषद असली, तरी तत्पूर्वी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना ऊस दराविषयी चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.’
‘महायुती व महाविकास आघाडी म्हणजे पॅकिंग वेगळे; पण माल एकच अशी अवस्था आहे. एखादे गँगवॉर चालावे, अशा पद्धतीने आरोपांची पातळी दोन्हीकडून घसरली आहे. यामुळे लोकांना सक्षम पर्याय हवा आहे. म्हणूनच आम्ही परिवर्तन महाशक्तीचा पर्याय दिला असून, प्रत्येक मतदारसंघात आश्वासक, व्हिजन असलेला व स्वच्छ उमेदवार देण्यावर किंवा अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी म्हणाले.’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.