Farmer Daughter Success : संघर्षातून वाईबोथी येथील ‘कृषिकन्या’ झाली फौजदार

Inspiring Journey : बारावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असतानाही परीक्षेला सामोरे जात ‘ती’ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली.
Police Achievements
Police AchievementsAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बारावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असे असतानाही परीक्षेला सामोरे जात ‘ती’ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने लेकीची अभ्यासातील चुणूक ओळखून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

‘मुलीचे लग्न करून टाका, शिकून काय करेल’ असे अनेकांनी हिणवले. मात्र मायलेकीने सावित्रीच्या संघर्षाचा वसा पुढे नेला. हीच लेक आता फौजदार झाली आहे. ही संघर्षाची कहाणी आहे, नाशिक जिल्ह्यातील वाईबोथी (ता. येवला) येथील मनीषा संजय चव्हाण हिची.

Police Achievements
Exam Success Story : शेतकऱ्याची मुलगी झाली तंत्र अधिकारी

वडील संजय काशिनाथ चव्हाण हे शेतकरी. जिरायती शेती, त्यात जेमतेम उत्पन्नामुळे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत चौघे भावंडे शिकले. मोठी मुलगी अर्चना ही महिला पोलिस अंमलदार झाली. तर थोरला मुलगा कौतिक हा भारतीय लष्करात दाखल झाला.लहानपणापासूनच अत्यंत संघर्ष लेकरांच्या वाट्याला आला.

अनवाणी चार ते पाच किलोमीटर दूर नगरसुल (ता. येवला) येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्यानंतर तिने तालुक्याच्या ठिकाणी येवला येथे स्वामी मुक्तानंद उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीला असताना शेतीकामांसह अभ्यास असा दिनक्रम असायचा.

Police Achievements
Farmer Success Story : एका गुराख्याचे सीमोल्लंघन

बारावीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबावर मोठा आघात झाला वडील संजय यांचे अपघाती निधन झाले. एकीकडे दुःखाचा डोंगर व दुसरीकडे ध्येयाचा समतोल साधत मनीषा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. भल्या पहाटे उठून बस पकडण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. आई शिला यांनी लेकीला पाठबळ दिले. ती लेकीच्या भविष्यासाठी आग्रही होती.

संघर्षाच्या काळात दूरदृष्टी ठेवून लेकीला स्वामी मुक्तानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत रसायनशास्त्र विषयात पदवीधर केले. थोरली बहीण अर्चना चव्हाण-भड ही नाशिक पोलिस आयुक्तालयात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहे. तिने धाकट्या बहिणीला मार्गदर्शन करत नाशिकला आणले. मनीषा हिने स्वयंअध्ययन करत राज्य सेवा परीक्षांची तयारी केली. अनेकदा अपयश आले, मात्र ती खचली नाही.

कोरोना काळात परीक्षा लांबणीवर गेल्या. मात्र दुसरा पर्याय म्हणून तिने मुंबई येथे पोलिस भरतीचा मार्ग निवडला; त्यात यशस्वी झाली. नागपूर येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ती भरती झाली. प्रशिक्षणाला सुरुवात होऊन दीड महिना झाला असतानाच तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक या पदाला तिने गवसणी घातली. खुल्या प्रवर्गातून राज्यात ३० वा क्रमांक पटकावला होता.

परिस्थितीपुढे हार न मानता संघर्ष करायलाच हवा. लक्ष विचलित होणार नाही ते निश्‍चित राहील व त्यातून यश मिळेल हा ध्यास हवा. मुळातच शेतकऱ्यांच्या मुलींमध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. हाच संघर्ष कायम ठेवला तर यश जवळच असते, हार मानायला नको.
मनीषा चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com