
Village Success Story: शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरीच्या पश्चिम बाजूस सह्याद्रीची रांग संथपणे नाणेघाट ओलांडून भीमाशंकरकडे सरकते. याच रांगेत ढाकोबाचे दाट जंगल आहे. वन्यपशू, अवघड वाटा, दरी डोंगर उतरुन नजीकच्या गावाला जाण्यासाठी काही तास लागतात. अशा दुर्गम रानात अंदळदेवच्या डोंगरकड्यावर सोमा जावजी तळपे आणि सौ. सखू सोमा तळपे हे एक जिगरबाज दांपत्य राहते. सोमाचे वडील आधी डोंगराखाली मीना नदीच्या खोऱ्यात राहायचे. त्यांचे देशी गायींवर प्रेम होते. तेथे देशी गायी पाळणाऱ्याला ‘लक्ष्मीदार’ म्हणत. लक्ष्मीदार असूनही जावजी मात्र गरीब होता. त्याला सोमा व बुधा अशी दोन मुले.
सोमा चार वर्षाचा असताना आई वारली आणि चार वर्षात पशुपालक बापही वारला. आणि सोमा ‘लक्ष्मीदार’ झाला. तो म्हणतो, ‘‘बाप गेला. गाईगुरांची आबाळ होऊ लागली. मीना नदीच्या खोऱ्यात चारा नव्हता. लक्ष्मी जगली पाहिजे. त्यासाठी चारा शोधायला हवा. चारा फक्त या डोंगरात होता. मग मी गाईगुरांसह गाव सोडला. शाळाही सुटली. आठ वर्षांचा असल्यापासून गुरांमागे डोंगरात कायमचा भटकत राह्यलो.’’ गुरांवरचं प्रेम पाहून माणूस थक्क होतो. सोमाचं शेरदिल पाहून त्याचा मामा गहिवरला आणि त्याने मुलीचा म्हणजे सखूचा हात सोमाच्या हाती दिला. सखू त्यागी आणि कष्टाळू होती. लग्न होताच तिने आजच्या मुलींसारखं शहराकडे जाण्याचा हट्ट धरला नाही.
सखू बनली झोपडीची लक्ष्मीदार
सोमाला त्याच्या चुलत्याने पोटच्या गोळ्यासारखं वाढवलं. मात्र त्याच्या दुखऱ्या आयुष्यावर प्रेमाची पहिली फुंकर घातली ती सखूने. हळदीच्या ओल्या अंगाने ती डोंगर चढून अंदळदेवच्या रानात गेली आणि सोमाच्या झोपडीची ‘लक्ष्मीदार’ बनली. सोमा-लक्ष्मी दोघेही शाळा शिकले नव्हते. मात्र सह्याद्रीच्या निसर्ग शाळेचे ते हुशार विद्यार्थी बनले. धुवाधार पावसात, बिबट्यांच्या डरकाळ्यात, सापांच्या फुत्कारात केवळ गाईगुरांसंग छोट्याशा झोपडीत कसं मजेत जगावं यात दोघांनी प्रावीण्य मिळवलं.
सखू डोंगरात आली तेव्हा सोमाकडे २०-२५ जनावरे होती. गोठ्यातली सारी कामं सखू करायची. रोज ४-५ लिटर दूध निघायचं. ते दूध विकण्यासाठी दोघे जण रोज डोंगर उतरून खोऱ्यात जायचे. येताना दाणापाणी भरून आणायचे. सखूने मग एक युक्ती काढली. रोज दूध विकण्याऐवजी खवा करून विकू, असे तिने सोमाला सांगितले. त्यानेही होकार दिला. मग रोज सारी कामे आटोपून पुन्हा खवा करण्याचा उद्योग झोपडीत सुरू झाला. बारा रुपये लिटरने दूध विकणारा सोमा आता ३० रुपये किलोने खवा विकू लागला. त्यामुळे झोपडीत पैसा आला आणि सोमा-सखूच्या संसाराला बरकत आली. झोपडीत पुढे एक छोटे बाळ जन्माला आले. त्याचे नाव बाळू.
असं गरिबीत जगणं बाळूच्या नशिबी नको, असे दोघांनी ठरविले. बाळूला त्यांनी डोंगरात ठेवले नाही. खाली गावात बारावीपर्यंत शिकवले. त्याच्या नोकरीचा प्रश्न होता. मग त्याला चार चाकी गाडी घेऊन दिली. तो आता गावात गाडी चालवून मजेत संसारात रमला आहे. बाळू गावात असूनही डोंगरातल्या सोमा-सखूची काळजी घेतो. गरज पडता वस्तू घेऊन चटकन डोंगराकडे जातो. सखू म्हणाली, ‘‘या डोंगरात आम्ही शेती करीत नाही. तुफान पावसामुळे येथे काहीच पिकत नाही. मात्र दूधदुभत्या बळावर आम्ही गावाकडे नवं घर बांधलं. मुलगा शिकवला. त्याचं लग्न लावून दिलं. त्याला गाडी घेऊन दिली. आम्ही मात्र या साऱ्या लक्ष्मींसाठी इथं डोंगरातच राहतो.’’
इतके सुखी, की दुःख आठवेना
अंदळदेवच्या रानात कधी कोंबड्याच्या आरवण्याने, कधी गाईच्या हंबरण्याने तर कधी बिबट्याच्या डरकाळ्यांनी पहाट होते. मग ‘लक्ष्मीदार’ सोमा-सखू कामाला लागतात. गाईगुरांचे शेण काढणे, वैरण घालणे, भाकर तयार करणे अशी एका पाठोपाठ एक कामं चालू होतात. सोमा सकाळपासून गायींना घेऊन रानात जातो. एकटी सखू दिवसभर झोपडीत राबते. गोठ्यांची सफाई, वैरण कापणी, चूल, त्यानंतर पुन्हा जनावरे येताच धारा काढणं अशी तिची सारं कामं एकापाठोपाठ चालू असतात.
मी दोघांना विचारले की, काय-काय संकटे आली तुमच्या जीवनात? त्यावर दोघे एकमेकांकडे पाहू लागले. ते संकट आठवू लागले. मी म्हणालो, ‘‘काय झालं?’’ ते म्हणाले, ‘‘या लक्ष्मींनी आम्हाला खूप सुख दिले. आम्हाला दुःख आठवत नाही. कारण संकट कधी आलंच नाही.’’ ते उत्तर ऐकून मी चकित झालो. खडतर जीवनाचा आनंददायी स्वीकार करीत सोमा आणि सखूने असा सुखाचा संसार केला आहे की त्यांना दुःखदेखील आठवत नाही..!
- सोमा तळपे यांचा मुलगा बाळू,
९३७०२७५६२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.