Rural Development: समूहशक्तीतून साकारलेल्या ग्रामविकासाची कहाणी

Model Village: महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा भारतीय जनतेला उपदेश केला होता. खेड्याकडे चला याचा अर्थ खेड्यातच रोजगाराची आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे आणि खेड्यातील माणसांचे शहराकडे जाणे थांबले पाहिजे हा त्यामागचा हेतू होता.
Model Village
Model VillageAgrowon
Published on
Updated on

विनायक लिमये

महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा भारतीय जनतेला उपदेश केला होता. खेड्याकडे चला याचा अर्थ खेड्यातच रोजगाराची आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे आणि खेड्यातील माणसांचे शहराकडे जाणे थांबले पाहिजे हा त्यामागचा हेतू होता. माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी महात्मा गांधीजींचा हा उपदेश तंतोतंतपणे अंमलात आणला. राजकारणी आणि नोकरशहा यांच्यापुढे त्यांनी ग्रामविकासाचा नवा पॅटर्न तयार केला. अविनाश सुभेदार या माजी सनदी अधिकाऱ्याने सत्‍यनिष्ठतेचा आणि प्रशासनाला लोकाभिमुख करण्याचा पॅटर्न विकसित केला.

दळवी यांनी नोकरशाही आणि गावातील लोक यांच्यात सहकार्य घडवून त्या दोघांची टीम बांधून विकासाचा डोंगर उभा केला. हा डोंगर म्हणजे काय हेच या पुस्तकात सुनील चव्हाण यांनी उलगडले आहे. हे पुस्तक सत्त्व फाउंडेशन प्रकाशित केले आहे. सत्त्व याचा अर्थ स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस’ (SATV). फाउंडेशनच्या नावातूनच चंद्रकांत दळवी यांची गावाच्या विकासाची दिशा स्पष्ट होते. कुठलीही गोष्ट फुकट न घेता लोकवर्गणी आणि लोकसहभागातून कशी करता येते हे त्यांनी दाखवून दिले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातून निढळ हे अवघ्या पाच हजार लोकवस्तीचे गाव.

Model Village
Rural Development: उद्योगांनी ग्रामीणस्तर उंचावण्यासाठी मदत करावी

सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून ५० कि.मी. अंतरावरील दुष्काळी प्रदेशातील हे गाव. चंद्रकांत दळवी या गावचे सुपुत्र. शेतकरी कुटुंबातील दळवी यांनी १९८३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश केला. १९९५ पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १९७२ च्या दुष्काळात शालेय वयात चंद्रकांत दळवी यांनी पाझर तलावाच्या कामावर अर्थातच रोजगार हमी योजनेवर काम केले आहे. गरिबीचे चटके काय असतात हे स्वतः भोगलेले आहे.दळवी यांनी आपल्या गावाच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि गावातून बाहेर पडलेल्या नोकरदार मंडळींमध्ये ग्रामविकासासाठी एकत्र केले. गावातील शाळेची इमारत गावातून दूर गेलेल्या नोकरदार मंडळींकडून वर्गणी घेऊन आणि गावातील लोकांच्या श्रमदानातून विद्यालयाची इमारत उभी करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि तो अंमलातही आणला.

Model Village
Rural Development: एकीच्या बळावर प्रगतीच्या वाटेवर नागीचा माउली गट

‘निढळ नोकरवर्ग व व्यावसायिक संघटना, मुंबई’ अशी संघटना स्थापन करून गावाच्या विकासासाठी दरवर्षी ठराविक रक्कम गोळा करून निढळ गावातील विविध कामांना त्यांनी चालना दिली.पाणलोट विकास, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, वनीकरण, वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबविले. त्याचबरोबर ठिबक सिंचनावर बटाटा लागवड, डाळिंबाची बाग, आले पिकाचे प्रयोग, महिला भवन अशा एक ना दोन गोष्टी त्यांनी सुरू केल्या. गाव जसे जलस्वयंपूर्ण केले तसेच आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी निळकंठेश्वर पतसंस्थेची उभारणी केली. या पतसंस्थेच्या माध्यमातून तसेच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून निढळ गावाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले.

कॉर्पोरेट पद्धतीची ग्रामसंस्थेची कार्यालये उभारली. केवळ भावनिक गोष्टी न करता विकास आणि गावकऱ्यांची इच्छा आणि गावाची गरज याचा समन्वय साधत दळवी यांनी निढळ गावाला अग्रस्थानी आणले. सरकारचा आणि विविध सामाजिक संस्थांचा पुरस्कार मिळविणारे निढळ गाव वेगळेच म्हणावे लागेल. ग्रामस्वच्छता, अस्पृश्यता निवारण, जलसंधारण, निर्मलग्राम, विमाग्राम, तंटामुक्तगाव, सरकारी पातळीवर मिळणाऱ्या अनेक पुरस्कारांच्या यादीत निढळ गाव अग्रभागी झाले यामागचे कारण दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेले धोरण आणि त्याला सर्वच ग्रामस्थांनी दिलेली कृतीची जोड.

Model Village
Rural Development: ग्रामविकासातून परिपूर्ण गावाची संकल्पना प्रत्यक्षात

देशातील विविध भागांतून अनेकांनी निढळचा विकास झाला कसा याची पाहणी करण्यासाठी या गावाला भेट दिली. शासकीय सेवेत असताना त्यांनी गावाकडे तर लक्ष दिलेच; पण सेवानिवृत्तीनंतरही गावाच्या विकासाला अधिक वेगाने चालना दिली. १९८८ मध्ये या गावात विहिरीतून पाणी शेंदून घ्यावे लागायचे. डोक्यावरून घागरीतून पाणी वाहून नेऊन पाण्याची गरज भागवावी लागत असे. दहा टक्के लोकवर्गणी गोळा करून सरकारची पाणीयोजना करण्याचे गावाने ठरविले; पण लोकवर्गणी गाव गोळा करू शकले नाही अशी स्थिती होती. त्याच ठिकाणी दळवी यांनी आपल्या संघटनेला बरोबर घेतले.

गावकऱ्यांची समजूत घालून लोकवर्गणी गोळा केली आणि पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेऊन त्याची उभारणी केली, विंधन विहिरी काढल्या, अनेक ठिकाणी वीजपंप बसवून नंतर पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन नव्याने पाणीपुरवठा योजनाही तयार केली. जी गोष्ट पाण्याची तीच गोष्ट विजेच्या बाबतीत होती. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा शिपाई रॉकेलचे दिवे लावत असे त्या ठिकाणी सगळीकडे एलईडी बल्ब बसवून विजेचे जाळे निर्माण केले. वीज, पाणी आणि सर्व वस्त्यांना जोडणारे डांबरी रस्ते करून पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले.

जिल्हा बँकेची शाखा उभारून ग्रामस्थांची सोय केली. गावातच तंटे कसे मिटतील याकडे लक्ष दिले व व्यसनमुक्ती शिबिरे राबवून गावाला व्यसनापासून लांब ठेवले. जी कुटुंबे दारू व्यवसायात होती त्यांना त्यापासून परावृत्त करून दुसऱ्या व्यवसायात सहभागी करून घेऊन दारू गाळण्याचे उद्योग बंद केले. त्याचबरोबर परवाना काढून होणाऱ्या दारूविक्रीचा जो व्यवसाय सर्वत्र चालतो तोही येथे होणार नाही अशा प्रकारे प्रबोधन केले. दारू पिण्याचे परवाने सामुदायिकरीत्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे अभियान राबवून व्यसनापासून लोक दूर कसे राहतील याकडे लक्ष दिले.

एकाच वेळी मन आणि शरीर चांगल्या कामात कार्यरत कसे राहील याची काळजी दळवींसह सर्व सहकाऱ्यांनी घेतली. गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिक्षण, समजूत काढणे, चांगल्या कामाचा पर्याय देणे अशा पद्धतीने दळवी यांनी गाव विकासाचा नवा मार्ग तयार केला. हा सगळा प्रगतीचा आढावा या पुस्तकात सुनील चव्हाण यांनी ओघवत्या शैलीत मांडला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर यांनी या पुस्तकाला अत्यंत मनापासून अशी प्रस्तावना लिहिली आहे. ती आवर्जून वाचावी अशी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com