Tur Price : सोलापूर बाजारात नवी तूर खातेय भाव

Solapur APMC : हंगामाच्या अगदी सुरुवातीच्या मुहूर्तालाच तुरीच्या दराने प्रति क्विंटलला सरासरी ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोलापूर मार्केटला पसंती मिळते आहे.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Solapur Tur Market : महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकच्या सीमेवर असलेले सोलापूर हे बाजारपेठेचे महत्त्वाचे केंद्र आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे शहर म्हणूनही सोलापूरची ओळख आहे. दळण-वळणाची सुविधा अत्यंत उत्तम आणि सोईच्या आहेत. त्यामुळेच सोलापूर बाजार समिती नावारूपाला आली आहे. राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर बाजार समितीची वार्षिक उलाढाल सुमारे एक हजार कोटी रुपयांवर आहे.

कांदा, भाजीपाल्यासह भुसार धान्यात तूर, सोयाबीन, ज्वारी, गहू या प्रमुख धान्यांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. तर फळांमध्ये द्राक्ष, डाळिंबाचे व्यवहार होतात. पण मुख्यतः कांदा, डाळिंब, तूर, सोयाबीनमध्ये सोलापूर बाजार समितीची आघाडी आहे. उघड लिलाव आणि रोख पट्टी ही सोलापूर बाजार समितीचे वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतील शेतकरीही आवर्जून सोलापूर बाजार समितीला पसंती देतात.

तुरीचा पेरा एक लाख हेक्टरपर्यंत

सोलापूर जिल्ह्यात खरिपात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा या तालुक्यांत प्रामुख्याने तुरीचे उत्पादन होते. मागील वर्षी पाऊसमान आणि वातावरणामुळे तुरीचे क्षेत्र घटले होते. पण यंदा तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

Tur
Tur Rate : तूर दर आठवड्यात २००० रुपयांनी घसरले

यंदा जवळपास एक लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचले आहे. सुमारे ९९ हजार १७ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून काही भागांत तुरीची काढणी सुरू झाली आहे. यंदा पाऊसमान चांगले झाल्याने आणि वातावरणही पोषक राहिल्याने एकरी उत्पादनातही चांगली वाढ मिळते आहे.

खडका, पिंकूला पसंती

जिल्ह्यात अक्कलकोट, करमाळा, बार्शी हे तीन तालुके तूर उत्पादनात आघाडीवर आहेत. या तालुक्यांची तूर पिकाबाबत काही वैशिष्ट्ये आहेत. खडका या पांढऱ्या रंगाच्या तुरीची बार्शी आणि उत्तर सोलापूर भागात लागवड होते. तर अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर पिंकू, गूळओळी या लाल रंगाच्या तुरीची लागवड केली जाते.

बार्शीमधील काही भागांत खडका आणि काही भागांत बीडीएन-७११, बीडीएन-२०१३-४१ (गोदावरी) या सुधारित वाणांची लागवड होते. मात्र सर्वाधिक सुधारित वाणांची लागवड होते. खडका, गूळओळी हे लाल तूर वाण तुलनेने चवीला चांगले असून, पाच ते साडेपाच महिन्यांत लवकर येतात. त्यामुळे तुरीनंतर पुढे दुसरे पीक घेता येते. गावरान तुरीचे एकरी ३ ते ४ क्विंटल, तर सुधारित वाणांपासून ७ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते.

Tur
Tur Bajarbhav : तुरीचे भाव आणखी पडतील की सावरतील? ; उत्पादनवाढीची शक्यता असली तरी परिस्थिती पूरक

आवक वाढतेय, दरांत चढ-उतार

मागील पंधरवड्यापासून सोलापूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक वाढते आहे. त्यामुळे दरांत किंचित चढ-उतार होत आहे. पण सध्यातरी दर बऱ्यापैकी राहिले आहेत. २ ते ७ डिसेंबर दरम्यान १४५ क्विंटलपर्यंत तुरीची आवक झाली. प्रति क्विंटलला किमान ७५०० रुपये, सरासरी ९२०० रुपये, तर सर्वाधिक दर ९६०० रुपये इतका दर राहिला. त्यानंतर ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत आवक तब्बल पाचपट वाढून १०३२ क्विंटलपर्यंत झाली.

तरीही दर प्रति क्विंटलला किमान ७८०० रुपये, सरासरी ९२५० रुपये आणि सर्वाधिक ९६०० रुपयांवर स्थिरावले. तर मागील आठवड्यात १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुन्हा आवक वाढली. सुमारे १६३६ क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यामुळे दरात किंचित चढ-उतार राहिला, मात्र दर काहीसे स्थिरच राहिले. या सप्ताहात प्रति क्विंटलला किमान ६५०० रुपये, सरासरी ८३५० रुपये आणि सर्वाधिक ९२०० रुपये असा दर मिळाला.

उघड लिलाव, रोखपट्टी

सोलापूर बाजार समितीत तुरीचे ४५ ते ५० आडत व्यापारी, तर २० ते २५ खरेदीदार आहेत. साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुरीच्या हंगामाचा कालावधी असतो. या दरम्यान रोजच्या रोज लिलाव होतात. एरव्ही २० ते २५ क्विंटल तुरीची आवक होते. पण या हंगामात दररोज १०० ते २०० क्विंटलपर्यंत आवक होते आहे. मुख्यतः उघड लिलाव आणि रोखपट्टीमुळे शेतकरी सोलापूर बाजार समितीत तूर विक्री करतात. त्यामुळे स्थानिक भागासह बाहेरील शेतकरी तूर विक्रीसाठी येथे येतात.

मी या वर्षी ६ एकरांवर तूर केली होती. त्यातून १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. भाव तर सध्या चांगला आहे. पण सरसकट दर मिळत नाही, हमीभावाप्रमाणे सर्व तुरीला किमान दर मिळायला हवा.
प्रवीण कुंभारे, शेतकरी, आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर
माझी ६ एकर शेती आहे. त्यात ४ एकर तूर केली होती. १० क्विंटल तूर विकण्यासाठी आणली आहे. सध्या भाव बरा आहे. पण आणखी वाढायला पाहिजे.
प्रज्वल देवकते, शेतकरी, बेलाटी, ता. उत्तर सोलापूर
तुरीची आवक जिल्ह्यातून आहेच, शिवाय बाहेरूनही आवक वाढते आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजार चांगला राहण्याची शक्यता आहे. उघड लिलाव आणि रोखपट्टीमुळे शेतकरी सोलापूर बाजारात येतात.
वीरूपाक्ष कोरे, अडत व्यापारी, सोलापूर बाजार समिती, सोलापूर
यंदा तुरीच्या हंगामात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दर चांगले आहेत. तुरीची गुणवत्ताही चांगली आहे. आवक वाढते आहे, पण मागणीही आहे, त्यामुळे दर असेच राहतील किंवा आणखी वाढतील, असा अंदाज आहे.
स्वप्नील स्वामी, खरेदीदार, सोलापूर बाजार समिती, सोलापूर
सोलापूरचे हवामान कोरडे आहे. शिवाय जमीनही मध्यम ते भारी आहे. त्यामुळे तुरीला पोषक वातावरण आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडला, तरी वाढ चांगल्याप्रकारे होते. तसेच फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत परतीचा चांगला पाऊस पडत असल्याने त्याचाही फायदा उत्पादनवाढीला होतो.
अमोल शास्त्री, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर
Summary

(०२१७)- २३७४६७८, (कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com