Maharashtra Budget Session 2024 : शेतकऱ्यांना मोफत वीज

Vidhansabha Budget Session : राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा शुक्रवारी (ता. २८) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
Maharashtra Budget
Maharashtra BudgetAgrowon

Mumbai News : राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा शुक्रवारी (ता. २८) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. साडेसात अश्वशक्ती कृषिपंप वापरणाऱ्या शेतक-यांना या वीज बिल माफीचा फायदा होणार आहे. पुढील वीज बिलापासून ही वीजबिल माफी मिळणार आहे. याकरिता १४ हजार, ७६१ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वीज बिल माफीचा अपवाद वगळता शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. मागील योजनांचा आढावा घेत मागील योजनांमध्ये किरकोळ दुरुस्ती करत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिलाकेंद्री योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.

Maharashtra Budget
Maharashtra Budget 2024 : 'लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही', अर्थसंकल्पावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार होते. लोकसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना शेवटच्या टप्प्यात वीजबिल माफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी केला.श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यात सध्या ४७ लाखांवरील शेतकरी ३९ हजार २४७ दशलक्ष युनिट इतका वीज वापरतात. या विजेची किंमत ३३ हजार ४६ कोटी इतकी आहे. सध्या शासनाकडून शेतकऱ्यांना सहा हजार ९४६ सबसिडी तर ९५०० रुपये क्रॉस सबसिडी दिली जाते. शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ सुरू आहे. ९ हजार २०० मेगा वॅट क्षमतेचे विकेंद्रीय सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

त्याच्या अंमलबजावणीचा कालावधी १८ महिन्यांचा आहे. सध्या राज्यातील ४४ लाख सहा हजार कृषी पंपधारक साडेसात अश्वशक्तीचे पंप वापरत आहेत. या सर्व शेतकऱ्यांची वीज बिलमाफी केली जाईल. या वीजबिल माफीसाठी भार पडेल तेवढा सरकार उचलेल. ही योजना गतिमान करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘मागेल त्याला सौरऊर्जा पंप’ या योजनांतर्गत ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल.

दूध अनुदान योजना नियमित

राज्यातील गायीच्या दुधात मोठी पडझड झाल्यानंतर राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही योजना अतिशय संथगतीने सुरू राहिल्याने अनेक दूध उत्पादक यापासून वंचित राहिले होते. आतापर्यंत या योजनेंतर्गत २२३ कोटी ८३ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. दुधाच्या दरात सतत पडझड होत असल्याने ही योजना पुढे सुरू ठेवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.

Maharashtra Budget
Budget 2024 : सरकारकडून बळीराजाला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

सिंचन क्षेत्र ३ लाख हेक्टरने वाढेल

विविध कारणांनी अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत १०८ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे ६१ प्रकल्प पूर्ण होतील. त्यातून ३ लाख, ६५ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल.

थोडक्यात महत्त्वाचे...

- कांदा आणि कापूस हमीभावाने खरेदीसाठी २०० कोटी रुपयांचा फिरता निधी

- शेळी मेंढी आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्पांची घोषणा

- अटल बांबू समृद्धी योजनेसाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे देणार; प्रतिरोपासाठी १७५ रुपये अनुदान

शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला, युवकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प मांडला आहे. खऱ्या अर्थाने महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देणारा, नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. हे निरोपाचे अधिवेशन अशी टीका होत होती, पण कोण कुणाला निरोप देतो हे कळेल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सर्वसामान्य महिलांना दिलासा देणारी ठरेल. मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रुपये दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला. अडीच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे.
विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा ही मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ही मागणी​ मान्य के​लेली नाही. आजपर्यंतची वीजबिल थकबाकी तुम्ही माफ करणार आहात का? खतावर १८ टक्के जीएसटी आहे. म्हणजे शेतकऱ्याला एका बाजूला लुटायचे आणि दुसऱ्या बाजूने उदारपणाचा आव आणायचा. या सरकारला खोट्या मलमप​ट्ट्या लावून दाखवायचे असेल, तर हे चिडलेले लोक अजिबात शांत बसणार नाहीत. विधानसभेच्या निवडणुका कधी होतात, याची वाट शेतकरी आणि महाराष्ट्राची जनता पाहत आहे.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com