Maharashtra Budget 2024 : 'लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही', अर्थसंकल्पावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेती, महिला, विद्यार्थी, यासह अन्य घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्नात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024agrowon

Maharashtra Government : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आज (ता.२८) अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेती, महिला, विद्यार्थी, यासह अन्य घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्नात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. दरम्यान या अर्थसंकल्पाला विरोधकांनी सरकारचे बजेट म्हणजे थापांचा अर्थसंकल्प, फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा अशा टीका केल्या आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला थांपाचा अर्थसंकल्प असे संबोधले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. तसाच हा आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.

"गेल्या लोकसभा निवडणुकीत १० वर्षातील भाजपाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चीडलेल्या महाराष्ट्राने जो दणका दिला त्यातून सत्ताधाऱ्यांचे डोळे किलकिले झाल्यासारखं वाटतायेत. जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी, सुजाण आणि सज्ञान आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचे षडयंत्र उघड झालं आहे. महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेला आहे. काही तरी धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, खोटं रेटून बोलायचे आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर यायचं हा यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले."

Maharashtra Budget 2024
Budget 2024 : राज्यातील महिलांना मिळणार दरमहा १ हजार ५०० रुपये; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प : विजय वडेट्टीवार

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी विधानसभेत सादर केला आहे. अडिच वर्ष फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणून या सरकारने प्रायश्चित्त घेतले आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर टिकास्र डागले आहे.

राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. परंतु हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतूदींना भूलन जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता असल्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Budget 2024
Budget 2024 : सरकारकडून बळीराजाला काय मिळालं? शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, जुमलेबाज अर्थसंकल्प: नाना पटोले

राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कितपत होईल याबाबत शंका असून राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महाराष्ट्रावर ७ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे, दरडोई उत्पन्नात राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. दरडोई उत्पन्न व निर्यातीच्या बाबतीत गुजरातच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. राज्याची अशी दयनीय परिस्थिती असताना महायुती सरकार जनतेला गुलाबी स्वप्ने दाखवत आहे. गॅस, पेट्रोल व डिझेलच्या करातून १० वर्षे जनतेला लुटले आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेलवरील कर कपातीचे गाजर दाखवले आहे. पण जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com