Chicken Disease : कोंबड्यांतील फाउल कॉलरा संसर्गजन्य आजार

Foul cholera : फाउल कॉलरा (पटकी) हा पाळीव आणि जंगली कोंबड्यांमध्ये जिवाणूद्वारे होणारा संसर्गजन्य आजार आहे.
Chicken Foul Cholera
Chicken Foul CholeraAgrowon

डॉ. सुधाकर आवंडकर

फाउल कॉलरा (पटकी) हा पाळीव आणि जंगली कोंबड्यांमध्ये जिवाणूद्वारे होणारा संसर्गजन्य आजार आहे. जिवाणू संसर्गानंतर बाधित कोंबडीमध्ये रक्तदोष (सेप्टीसेमिया) तयार होऊन मरतुक होते.

या आजाराची संक्रमण क्षमता आणि बाधित कोंबड्यांमध्ये होणारी मरतुक अतिशय जास्त असते. मात्र काही वेळा हा आजार अलक्षणिक असू शकतो.

आजाराची कारणे आणि प्रसार

मांसल आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये हा आजार दिसतो.

कमी वयाच्या कोंबड्यांपेक्षा जास्त वय आणि वयस्क कोंबड्यांमध्ये याची तीव्रता अधिक आढळून येते.

दीर्घकाळ संक्रमित झालेले आणि अलक्षणिक कोंबड्या आजाराचा वाहक म्हणून कार्य करतात. अशा बाधित कोंबड्या इतर निरोगी कोंबड्यांसाठी जिवाणू संक्रमणाचा स्रोत ठरतात.

उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांपासून आजाराचा प्रसार होतो.

बाधित कोंबड्यांची लाळ, शेंबूड, आणि अश्रू मध्ये जिवाणू उत्सर्जित होतात. त्यामुळे बाधित कोंबड्या आजाराच्या अंतः आणि आंतर कुक्कुटालयीन प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावतात.

Chicken Foul Cholera
Chicken Disease Control : कोंबड्यामधील बाह्य परजीवी आजारांचे नियंत्रण

जिवाणू उत्सर्जनामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. संसर्गित कोंबड्यांच्या सहवासात आणि जिवाणू दूषित वातावरणात आजाराचा प्रसार झपाट्याने होतो.

जिवाणू शेडमधील भिंती आणि जमिनीवर असलेल्या भेगा, खाद्य, पिशव्या, चप्पल, आणि नित्य वापराच्या इतर उपकरणांमध्ये जास्त काळ तग धरून राहतात. दूषित खाद्य, पाणी आणि उपकरणांद्वारे प्रसार होतो.

आजाराचा प्रसार सहसा अंड्यातून होत नाही.

आजाराचा प्रादुर्भाव थंड आणि दमट वातावरणात होते.

आपल्या भागात उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळा आणि हिवाळ्यात हा आजार दिसतो.

पाणथळ जागी येणाऱ्या पक्षांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.

आजाराची लक्षणे

जिवाणू संसर्ग झाल्यानंतर आजार दिसण्याचा कालावधी पाच ते आठ दिवसांचा असतो.

आजार अल्पकालीन तीव्र आणि दीर्घकालीन सौम्य अशा दोन प्रकारांत दिसून येतो.

अल्प कालीन तीव्र उद्रेकात बाधित कोंबडी कोणतीही लक्षणे न दाखविता सहा ते बारा तासांत मृत्यूमुखी पडते.कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जलद गतीने वाढत जाते.फार कमी कोंबड्या आजाराची लक्षणे दाखवितात. सुरवातीस हिरवट रंगाचा अतिसार दिसून येतो. नैराश्य, श्लेष्मा अतिसार, विस्कटलेले पंख, फुफ्फुस दाह, आणि जलद श्वसन यासारखी लक्षणे दिसून येतात.

दीर्घकालीन सौम्य उद्रेकात या आजाराची लक्षणे छाती, कल्ले, सांधे, स्नायुबंध आवरण आणि पायाच्या तळव्यात केंद्रित झाल्याचे दिसतात. फायब्रीनस पूरक स्त्राव साचल्यामुळे या भागांवर सूज येते. डोळ्यांच्या श्लेश्‍म त्वचेचा आणि कंठाचा दाह होतो. डोळ्यांतून अश्रू गळतात. डोळे, तुरे आणि कल्ले सुजतात. ते निळसर काळे पडतात.बाधित कोंबड्या लंगडतात.

कान, मस्तिष्क आवरण किंवा डोक्याच्या हाडात संसर्ग झाल्यास मानेचे स्नायू अकडतात. डोके किंवा मान एकाच बाजूला वळवता येते. डोके थरथरते.

प्रतिबंध आणि उपचार

शेडमधील व्यवस्थापन चांगले ठेवावे.

काटेकोर जैवसुरक्षा मानकांचा काटेकोर अवलंब करावा.

जंगली पक्षी, उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांना शेड आणि परिसरात येऊ देऊ नये.

कोंबड्या ठेवण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

खाद्य, पाण्याची भांडी आणि इतर साहित्य दररोज स्वच्छ करावे. त्यांना उन्हात वाळवून घ्यावे.

शेडमध्ये खाद्य आणि पाण्याची साठवणूक करू नये. दूषित खाद्य आणि पाणी देऊ नये.

वयाच्या १० ते १२ आणि २१ व्या आठवड्यांत कोंबड्यांचे लसीकरण करावे.

Chicken Foul Cholera
Chicken Disease : कोंबड्यामधील विषाणूजन्य आजार टाळण्यासाठी काय कराल?

शेडमध्ये कोंबड्यांची गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावी.

आजारी कोंबड्यांना त्वरित वेगळे करावे. पशुवैद्यकाच्या सल्याने योग्य मात्रेत प्रतिजैविके द्यावी. प्रतीजैविकांचा कालावधी पूर्ण करावा. मध्येच प्रतिजैविके देणे थांबविल्यास आजाराचा पुनः उद्रेक होऊ शकतो.

मृत कोंबड्यांना खोल पुरून टाकावे. उघड्यावर टाकू नये.

आजाराचा नायनाट करावयाचा असल्यास शेडमधील सर्व कोंबड्यांना काढाव्यात. शेड तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

निर्जंतुकीकरण करण्यासाठी शेडमधील कोंबड्या

आणि गादी काढून टाकावी. शेड स्वच्छ धुवावी.

शेड, भांडी, पाण्याचे पाइप आणि परिसराची निर्जंतुक द्रावणाने स्वच्छता करावी. पाण्याच्या टाक्या आणि पाईपमध्ये निर्जंतुक द्रावण कमीत कमी ३० मिनिटे

ठेवावे आणि नंतर पाण्याने धुवून घ्यावे. शेड आणि परिसरात निर्जंतुक द्रावण फवारणी केल्यानंतर

१२ ते ४८ तास सुकू द्यावे. त्यानंतर धुरीकरण करून घ्यावे.

शेडमध्ये नवीन कोंबड्या ठेवण्यापूर्वी किमान पाच दिवस निर्जंतुकीकरण करावे.

शेडमध्ये जात असताना पाय निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत.

निर्जंतुक द्रावण दर आठवड्याला बदलावे.

डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९

(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com