
डॉ. आर. सी. कुलकर्णी, डॉ. के. वाय. देशपांडे, डॉ. बालाजी डोंगरे
कुक्कुटपालकास (Poultry Breeder) विषाणूजन्य आजारांवर उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे प्रामुख्याने रोगप्रतिबंधात्मक उपाययोजनाच फायदेशीर ठरतात. विषाणूजन्य आजाराचा प्रसार झपाट्याने होतो.
त्यामुळे बाधित पक्षी दुसऱ्याच दिवशी रोगांची लक्षणे (Disease Symptoms) दाखविण्यास सुरुवात करून दगावतात. बहुतांशी विषाणूजन्य आजारांची लक्षणे ही एकमेकांशी मिळतीजुळती असतात, त्यामुळे बाह्य लक्षणांवरून रोगनिदान करणे अवघड असते.
रोग निदान झाले तरी त्यावरील उपचाराचा खर्च अधिक असतो. योग्य उपचारांती आजारातून बरे झालेल्या पक्ष्यांची अंडी आणि मांस उत्पादनक्षमता (Meat Production) पूर्ववत होण्यास बराचसा कालावधी लागतो. त्यामुळे योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून आजाराचा धोका कमी करणे गरजेचे असते. आजच्या लेखात कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या मुख्य विषाणूजन्य आजारांबाबत माहिती घेऊयात.
१) मानमोडी ः
हा आजार प्रथमतः १९२६ मध्ये इंग्लंडमध्ये न्यूकॅसल या ठिकाणी आढळून आला. त्यामुळे त्याला ‘न्यूकॅसल’ आजार म्हणून ओळखले जाते. भारतात या आजाराला ‘रानिखेत’ तर महाराष्ट्रात ‘मानमोडी’ नावाने ओळखतात.
हा आजार मुख्यत: श्वसन आणि मज्जासंस्था यावर परिणाम करतो. रोगबाधा झाल्यापासून लक्षणे दिसून येईपर्यंत जवळपास ४ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो.
लक्षणे ः
- पक्षी शिंकतात, धापा टाकतात.
- चोच उघडून श्वास घेतात.
- पाय व मानेतील स्नायूंच्या समन्वयात अभाव.
- एक किंवा दोन्ही पायांना पक्षाघात.
- पक्षी मान गोलाकार, वर आणि खाली फिरवतात.
- काही पक्षी मान वरती फिरवून उलटे चालतात.
- प्रौढ पक्ष्यांच्या घशात घरघर आवाज येतो.
- भूक मंदावते.
- कवचहीन अंडी घालणे अथवा अंडी देण्याची क्रिया बंद होते.
- हगवण लागते.
उपाय ः
- आजारी पक्षी निरोगी पक्ष्यांपासून वेगळे करावेत.
- कुक्कुटगृहातील सर्व भांडी, साहित्य, कुक्कुटगृह जंतुनाशकद्रव्ये वापरून स्वच्छ ठेवणे.
- वेळोवेळी लसीकरण करणे.
२) मॅरेक्स ः
हा रोग ‘हरपेझ’ नावाच्या विषाणूमुळे होतो.
लक्षणे ः
- पंखांचा व पायांचा पक्षाघात.
- दृष्टिदोष निर्माण होणे, डोळ्यांच्या बाहुल्यांची असाधारण उघडझाप करणे, बुबुळ अपारदर्शक होऊन शेवटी अंधत्व येते.
- पिसांच्या मुळांना सूज येते.
उपाय ः
- वेळच्या वेळी लसीकरण करणे.
- जंतुनाशकद्रव्यांचा उपयोग करून कुक्कुटगृह आणि वापरातील भांडी स्वच्छ ठेवणे.
३) गंबोरो ः
हा संसर्ग जन्य आजार असून २ ते ८ आठवडे वयाच्या पिलांमध्ये आढळून येतो. खाद्य, पाणी, गादी, शेडमध्ये काम करणारे कामगार यांच्यामार्फत रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे ः
- पाण्यासारखी पांढरी हगवण, भूक न लागणे.
- पिसे राठ होतात. पक्ष्यांची वाढ खुंटते.
- पक्षी डोळे बंद करतात
- काही पक्ष्यांच्या छातीवर, एक किंवा दोन्ही पायांवर रक्ततप्रवाह साकाळल्या प्रमाणे दिसते.
उपाय ः
- शेडची स्वच्छता, निर्जंतुकीकरण.
- मांसल पक्षी, अंड्यावरील पक्षी स्वतंत्र वाढविणे.
- रोगप्रतिबंधक लसीकरण करणे.
४) देवी (फॉउल पॉक्स) ः
हा विषाणूजन्य आजार आहे. कोणत्याही वयाच्या पक्ष्यांमध्ये आजाराचा बाधा होऊ शकते. विषाणूचा एका पक्ष्यापासून दुसऱ्या पक्ष्यामध्ये थेट संपर्काद्वारे प्रसार होतो.
लक्षणे ः
- डोळ्यांवरील कातडी, तुरा, चोचीच्या शेवटच्या भागाजवळील कातडी या ठिकाणी फोड येतात.
- कातडीवर तांबडे फोड येतात. ते पिवळे टोकदार होऊन नंतर खपली धरून कातडीवर कायमचा खड्डा पडतो.
उपाय:-
- आजारी पक्षी वेगळे ठेवावेत.
- देवी रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.
५) बर्ड फ्लू (प्लेग) ः
- हा पक्ष्यांमधील अत्यंत घातक विषाणजन्य आजार असून, मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो.
- जगभरात पाणथळ ठिकाणी, तसेच पाण्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये हा आजार नेहमीच दिसून येतो.
- कोंबड्या, लाव्ही आणि बदकांसह जवळपास सर्व प्रकारच्या पाळीव आणि वन्य पक्ष्यांमध्ये आजाराची लागण होऊ शकते.
- बंदिस्त पोल्ट्री व्यवसायामधील कोंबड्यामध्ये या आजाराचा प्रसार झपाट्याने होतो.
- मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांमधील विशिष्ट रोगप्रतिकारक क्षमतेमुळे त्या या आजारास कमी प्रमाणात बळी पडतात. मात्र आजाराचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतात.
- बाधित पक्ष्यांद्वारे आजाराचा झपाट्याने प्रसार होतो.
लक्षणे ः
- पक्ष्यांना ४५ ते ४६ अंश सेल्सिअस इतका ताप येतो.
- भूक मंदावते.
- पिसे विस्कटलेली दिसतात.
- तुरा व कल्ला निळसर पडतो.
- डोळे लालसर व सुजलेले दिसतात.
- डोके व घसा यांवर सूज येते.
- श्वसनक्रियेला त्रास.
- आजारी कोंबड्या सुरुवातील नरम कवच असलेली अंडी देतात. आणि कालांतराने अंडी देणे बंद करतात.
- आजारी पक्ष्यांत अतिसार होतो.
- पंख नसलेल्या कातडी आणि पायांवर रक्तपात दिसून येतो.
उपाय ः
- जैवसुरक्षेता नियमांचा काटेकोरपणे अवलंब करावा.
- पाळीव पक्ष्यांचा जंगली पक्ष्यांशी संपर्क टाळावा.
- मृतपक्षी खोल खड्ड्यात चुन्याची भुकटी टाकून पुरावेत.
- कुक्कुटपालक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही आजारी किंवा मृत पक्ष्यांसोबत संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
- मुक्त संचार करणारे पक्षी जमिनीवर पडलेले किंवा मृत पडलेले दिसून आल्यास त्वरीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास सूचित करावे.
- आजाराचा उद्रेक झालेल्या ठिकाणाच्या एक किलोमीटर परिघात नियमानुसार बाधित क्षेत्र आणि १० किलोमीटर क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. त्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
६) संसर्गजन्य ब्राँकायटिस ः
हा प्रामुख्याने ६ आठवडे वयाखालील पक्ष्यांमध्ये होणारा आजार आहे.
लक्षणे ः
- पक्षी चोच उघडी ठेवून श्वास घेतात.
- डोळ्यांतून पाणी येते.
- रात्रीच्या वेळी श्वास घेताना घर-घर असा आवाज येतो.
- अंडी उत्पादनात घट होते.
- अंडी कवच गुणवत्ता कमी होते.
- नाकातून पाण्यासारखा स्राव येतो.
उपाय ः
- कुक्कुटगृहाची तसेच परिसराची स्वच्छता ठेवावी.
- बाधित मृत पक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.
- पक्ष्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करावे.
डॉ.कुलदीप देशपांडे - ८००७८६०६७२, (विभाग प्रमुख, पशु पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला)
डॉ.आर.सी कुलकर्णी, ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.