Pune News : राज्य आणि देशपातळीवर काँग्रेसला पुढे नेणाऱ्या अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेला राम राम ठोकला आहे. याचदरम्यान काल सोमवारी (१२ रोजी) राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट काँग्रेस सोडली. यावेळी त्यांनी, "मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन", असं ते म्हणाले होते.
मात्र दोन दिवस थांबा म्हणणारे अशोकराव चव्हाण यांनी २४ तासातच भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज मंगळवार (१३ रोजी) दुपारी १ वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चव्हाण हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, अशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. याच्याआधी चव्हाण म्हणाले की, "आज दुपारी १२ ते १२.३० या वेळेत मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करणार आहे. आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे."
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत आपल्या विधीमंडळ सद्यस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १५ फेब्रुवारीच्या होणाऱ्या राज्याच्या दौऱ्यात प्रवेश करतील असे बोलले जात होते. मात्र या चर्चेच्या दरम्यान चव्हाण आजच भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. तर त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार, नेते आणि पदाधिकारी प्रवेश करतील अशी चर्चा आहे. चव्हाण यांच्या राजीनामानंतर माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजुरकर यांनी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. ते ही भाजपात प्रवेश करणार आहेत.
प्रवेशाने भाजपला ताकद मिळाली
यावेळी फडणवीस यांनी, चव्हाण यांच्या प्रवेशाने महायुती भक्कम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रवेशाने भाजपला ताकद मिळाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं काम सुरू केलंय. यामुळेच देशातील अनेक नेत्यांना आज भाजपमध्ये यावसं वाटतंय असे म्हटले आहे.
यावेळी चव्हाण यांनी, भाजपमध्ये प्रवेश करत आहे. येथे प्रामाणिकपणे काम करेन असे म्हटले आहे. फडणवीस यांच्याबाबत बोलताना, आमचे सत्तेत आणि विरोधी बाकावर असताना राजकारणापलीकडे सबंध होते. फक्त राज्याच्या विकासाची काम करायचे आहे. यासाठीच आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. तर गेल्या ३८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आज मी नवी सुरूवात करत असल्याचेही चव्हाण म्हणाले. तर राज्यात भाजपला अधिक जागा कशा मिळतील यासाठी काम करू, असे अश्वासन त्यांनी दिले आहे.
तसेच त्यांनी या प्रवेशावरून आपले कोणावरही दोषारोप नाही. कोणावर रोष नाही. तर योग्य वेळी याबाबत भाष्य करू असे म्हणत हा आपला वैयक्तित निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पक्ष जो आदेश देतील तो मान्य असेल. त्याप्रमाणे मी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला सोडणारे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण हे पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार होते. तर राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवले आहे. काँग्रेसच्या देशपातळीवरील वर्किंग कमिटीचे सद्यस्य होते. याचबरोबर त्यांचा राजकीय प्रवासाचा हा आढावा.....
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास...
*अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकीर्दीस १९८७ साली खरी सुरूवात
*१९८४ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस होते
*यानंतर ते १९८६ ते १९८९ काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश उपाध्यक्ष होते.
*वयाच्या तिसाव्या वर्षी ते १९८७ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी पोटनिवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता.
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास...
*जनता दलाचे नवखे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी १९८९ साली लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव केला
*१९९२ साली अशोक चव्हाण विधान परिषदेवर आमदार झाले
*अशोक चव्हाण १९९३ मध्ये राज्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह विभाग होते.
*अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महासचिव म्हणून १९९५ ते १९९९ पर्यंत जबादारी सांभाळली
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास...
*१९९९ मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. ते मुदखेड मतदारसंघातून विजयी झाले. त्यावेळी त्यांच्याकडे राज्याचे महसूलमंत्री पद होते.
*१९९९ मध्ये पुन्हा फेरबदलामुळे . त्यांच्याकडे परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार या मंत्रालयाचे मंत्रिपद देण्यात आले.
*२००४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांची मुदखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड
*२००४ च्या राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून उद्योग, खणिकर्म, सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास...
*२००८ साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबईतील अतिरेकी हल्ल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे अशोक चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
*२००९ मध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आले आणि ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
*२००९ मध्ये अशोक चव्हाण हे तिसऱ्यांदा आमदार झाले होते. यावेळी त्यांनी आमदारकी भोकर विधानसभा मतदारसंघातून लढवली.
अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास...
*२०१० साली त्यांना आदर्श घोटाळ्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आली.
*तसेच २०१४ साली देशात मोदी लाट होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडूण आले होते. एक राजीव सातव आणि दुसरे अशोक चव्हाण होते.
*२०१५ साली अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस पक्षाने राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
*२०१९ मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून ते चौथ्यांदा आमदार झाले. तर उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री झाले.
*२०२३ मध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते
इतर संघटनात्मक जबाबदाऱ्या
याशिवाय अशोक चव्हाण यांनी गुजरात, आसाम, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आदी राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून भूमिका पार पाडली. त्यांच्याकडे उदयपूर, रायपूर येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय ठरावाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी होती. त्याचबरोबर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे समीक्षा करणाऱ्या समितेचे त्यांच्याकडे अध्यक्षपद होते.
सध्याच्या घडीला ते राज्यातील इंडिया आघाडीचे काँग्रेसचे समन्वयक होते. तर बहूचर्चीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी उत्तम नियोजन केले होते. त्याची देशभर चर्चा झाली होती. त्यांनी नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेचे केलेले नियोजनामुळे नांदेड पॅटर्न म्हणून तो यात्रेच्या पुढील प्रवासात अंमलात आणला गेला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.