Futuristic Education : जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणासाठी...

Future Education : शिक्षणातून चिकित्सक, सर्जनशील विचार करणारे, लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. उद्याचा नवभारत घडविण्यासाठी सृजन विद्यार्थी निर्मितीचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक सक्षम झाले पाहिजेत.
Future Education
Future EducationAgrowon

World Class Future Education : शिक्षणातून चिकित्सक, सर्जनशील विचार करणारे, लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. उद्याचा नवभारत घडविण्यासाठी सृजन विद्यार्थी निर्मितीचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक सक्षम झाले पाहिजेत.भारतीय शिक्षणपरंपरेत गुरू, आचार्य हे नेहमीच सर्वाधिक आदरणीय स्थानी राहिलेले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० मध्ये देखील शिक्षण सुधारणांच्या मूलभूत केंद्रस्थानी शिक्षक असला पाहिजे असे सुचवले आहे.

शिक्षकच घडवतात मुलांचे भविष्य

आजची मुले ही उद्याचे निर्माते आणि भविष्यातील सुजाण नागरिक आहेत, ते केवळ भारताचे नागरिक नाही तर जगाचे देखील नागरिक आहेत. उद्याच्या जगाचे नेतृत्व करणारी व विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणारी पिढी तयार करण्याचे काम शिक्षणातून होत असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित व्हावीत.

आजच्या विद्यार्थ्यांना जागतिक मान्यता मिळावी. यासाठी शिक्षकांच्या क्षमता विकसनासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. शिक्षणप्रणालीतील मूलभूत सुधारणांच्या केंद्रस्थानी शिक्षक असतो. शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत सर्व शिक्षकांसाठी ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात राज्याचे माजी शिक्षण सचिव नंदकुमार साहेब आणि त्यांच्या वेध परिवाराच्या चमूने अत्यंत मेहनतीने सदरील दर्जेदार प्रशिक्षण निर्मिती केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-अध्ययन करण्याची प्रेरणा व क्षमता निर्माण करणे तसेच शिकण्याची गती वाढवणे यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी पडणार आहे. यात जागतिक दर्जाच्या भविष्यवेधी शिक्षणाच्या चार आयामांवर भर दिलेला आहे. ते चार आयाम पुढीलप्रमाणे आहेत.

मुलांत हवी जागतिक दर्जाची स्वीकार्यता

जागतिक स्वीकार्यता असणारे मूल विकसित करणे हे एकविसाव्या शतकातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ‘लोकल टू ग्लोबल’ विचार करणारे विद्यार्थी घडविण्याचे काम शाळेतून आता होणार आहे. तंत्रज्ञानामुळे ‘वसुधैव कुटुंबकम्’ शक्य झाले आहे. अनेक प्रश्‍न आता देशाचे प्रश्‍न नाही. त्याचे स्वरूप जागतिक आहे.

ते सोडवण्यासाठी जगाला एकत्र येणे आवश्यक आहे. शेती, उद्योग, व्यापार, रोजगार सर्व वैश्‍विक झाले. आपली संस्कृती व मूल्य याचा आदर करतानाच जागतिक शांतता व शाश्‍वत विकास यासाठी जागतिक विचार करणारे व जागतिक स्वीकार्यता असणारे मूल आपल्याला शाळेतून घडवायचे आहे.

Future Education
Student Self Education : विद्यार्थी स्वतः शिकणार...

भविष्यासाठी तयार करावे सक्षम व्यक्तिमत्त्व

जगाच्या बदलाची गती प्रचंड आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी सतत शिकत राहावे लागणार आहे. जो शिकत राहील तोच स्पर्धेत टिकेल, अन्यथा अनुपयोगी ठरेल. शिक्षकांनी मुलांना शिकविण्यापेक्षा शिकण्यासाठी तयार करायचे आहे.

Learning to learn. शिकायचे कसे हे येणे म्हणजे शिक्षण. भविष्याचा अंदाज घेऊन सतत शिकत राहणारी, स्वतःला कायम अद्ययावत ठेवणारी मुले हीच भविष्यासाठी तयार झालेली असतील.

मुलांच्या क्षमतांचा १०० टक्के व्हावा उपयोग

प्रत्येक मूल वेगळं असते आणि प्रत्येक मूल शिकू शकते. यावर या प्रशिक्षणाचा भर आहे. आपण पूर्वी केवळ भाषिक आणि तार्किक बुद्धिमत्ता यावर भर देत होतो. याशिवाय इतरही बुद्धिमत्ता असतात.

त्याचा योग्य वापर अध्ययन प्रक्रियेत करून घेता येतो. अवकाशीय, सांगीतिक, निसर्गवादी, शारीरिक, वैयक्तिक, आंतर वैयक्तिक, अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता. यांचा अध्ययन प्रक्रियेत वापर शिक्षकांनी करून घेतल्यास अध्ययन प्रक्रिया आनंददायी होते. यामुळे प्रत्येक मूल आपल्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग करून घेऊ शिकते.

Future Education
New Education Policy : नवीन शिक्षण धोरणाचा उद्योग क्षेत्राला फायदा

‘सहा सी’ मुलांत करावे लागतील विकसित

PISA म्हणजे programme for international student assessment. ओईसीडी देशांच्या संघटनेमार्फत ही परीक्षा घेतली जाते. भारतीय विद्यार्थी एकदाच या परीक्षेत सहभागी झाले होते. परंतु फारशी समाधानकारक कामगिरी आपली त्यात नव्हती. PISA परीक्षा एकविसाव्या शतकातील कौशल्ये मुलांमध्ये विकसित झाली आहे का हे पाहते.

यात मुलांची ‘सहा सी’ (6c) कौशल्ये तपासली जातात. चिकित्सक विचार (critical thinking), सर्जनशीलता (creative thinking), सहयोग (collaboration), संवाद (communication), आत्मविश्‍वास (confidence), करुणा (compassion) हे ‘सहा सी’ मुलांमध्ये विकसित करून आपल्याला PISA ready विद्यार्थी तयार करावयाचे आहेत.

सुधारणांच्या केंद्रस्थानी शिक्षकच

कोणतेही नवीन धोरण, कायदे अथवा योजना आल्या तरीही जोपर्यंत शिक्षक ठरवणार नाही तोपर्यंत शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत आमूलाग्र बदल होत नाही. आजपर्यंत शिक्षकांना शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ हे मुले कशी शिकतात आणि शिकण्याच्या या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका कशी असावी, यावर आधारित हे प्रशिक्षण आहे.

खरे तर शिकवणे नावाची संकल्पना मुळात अस्तित्वात नाही. मुले स्वतः शिकत असतात. जसे आपण मुलांना चालणे शिकवत नाही. मोठ्यांच्या आधाराने मुले स्वतःच चालायला शिकतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, कौशल्ये शिकताना मुलांना समजून घेणारा, नवीन कल्पना देणारा, चुकल्यास आधार देणारा, प्रेमळ सुलभक हवा असतो. तो सुलभक शिक्षक असतो. हा सुलभक वर्गाचे नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व करतो. शिक्षणप्रक्रिया शिक्षककेंद्री न राहता विद्यार्थीकेंद्री केली गेली आहे.

मुलांच्या अडचणी, दुःख आणि भावविश्व समजून त्याला अध्ययनाची गोडी लावण्याचे काम शिक्षकच करतात. मुले स्वतःहून शिकतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती विकसित होईल. मुले आव्हाने स्वीकारून स्वतःहून शिकण्यास प्रेरित होऊन सतत शिकत राहतील. यासाठी शिक्षक मुलांना मदत करणार आहे. शिकण्यासाठी मुले तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकतील. परंतु शिक्षण ही पूर्णतः ऑनलाइन किंवा आर्टिफिशियल प्रक्रिया नाही. गुगल मुलांना केवळ माहिती देते. ज्ञान नाही.

ज्ञान देण्यासाठी हवे शिक्षकच. मिळविलेल्या माहितीचा योग्य वापर करण्यासाठी हवा विवेक. हा विवेक चिंतन आणि मननातून येतो. चिंतन आणि मननाच्या पातळीवर शिक्षक मुलांसोबत हवेच. तरच मुले विवेकी बनतात. शिक्षण प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. एकविसाव्या शतकातील कौशल्ये शिक्षकांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणातून आत्मसात केली आहेत.

शिक्षणातून चिकित्सक, सर्जनशील विचार करणारे, लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. उद्याचा नवभारत घडविण्यासाठी सृजन विद्यार्थी निर्मितीचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक सक्षम झाले पाहिजेत.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com