Fodder Policy : वर्षभर चाऱ्यासाठी ‘फॉडर पॉलिसी’

Animal Fodder : पशुपालकांनी जनावरांना वर्षभर लागणारे पशुखाद्य घटक, हिरवा चारा आणि कोरडा चारा यांचे वर्षभराचे नियोजन करावे. कारण दूध व्यवसायातील सुमारे ७० ते ७५ टक्के खर्च हा पशू आहारावर होत असतो.
Animal Fodder
Animal FodderAgrowon
Published on
Updated on

डॉ. वाय. जी. प्रसाद,

डॉ. जी. टी. बेहेरे

Fodder Shortage : पशूपालकांच्यासाठी चारा नियोजन हा येणाऱ्या काळामध्ये कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी आतापासून तयारी अत्यावश्यक आहे. मार्चनंतर चाऱ्याच्या किमती वाढायला लागतात, यातच अवकाळी पाऊस पडला आणि शेतातील चारा भिजला तर बुरशीमुळे काळा पडतो. असा चारा जनावरांसाठी वापरला असता त्यातील अफलाटॉक्सिनमुळे जनावरांचे यकृत खराब होऊन ती विविध आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. चाऱ्यामधील अफलाटॉक्सिनचा अंश दुधामध्ये येऊ शकतो. तसेच गाय, म्हैस उलटण्याची शक्यता वाढते. चाऱ्याच्या कमतरतेमुळे पशुपालक सोयाबीन भुसा, तूर भुसा, हरभरा भुसा इत्यादी इतर चाऱ्याकडे वळले आहेत. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात चारा टंचाईला सामोरे जावे लागते. हिरवा चारा मिळणे तर दुरापास्त होते. याच काळात सरकी पेंड, चुनी, पशुखाद्याचे दर वाढलेले असतात.

पशुपालकांच्या समोरील आव्हाने

जनावरांच्या दूध उत्पादनात सातत्य ठेवणे. शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवणे.

परवडणाऱ्या किमतीत चारा, खाद्य इत्यादी उपलब्धता करणे, उपलब्ध चारा व खाद्य मोजून देणे, नासाडी टाळणे.

दुभती, गाभण जनावरे,वासरे, बैलांना वजनाप्रमाणे खुराक देणे.

चाऱ्याचे नियोजन

जनावरांना वर्षभर पुरेल एवढा हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्याचे योग्य नियोजन करून ठेवावे. लहान पशुपालक, दूध उत्पादक एकत्र येऊन खरेदी करू शकतात. मागील १० वर्षांच्या खाद्य घटक व चारा किंमत यांचा अभ्यास केला तर कुठला कच्चा माल कधी कमी किमतीत उपलब्ध असतो हे सहज लक्षात येईल. पशुपालकांनी एकत्र येऊन स्वतःची आणि इतरांना लागणारी चारा, इतर गोष्टींची गरज ओळखल्यास या सर्व गोष्टींवरील खर्च कमी करता येऊ शकतो.

Animal Fodder
Pashu KCC : पशू किसान क्रेडिट कार्डसाठी २०३९ पशुपालकांनी केली नोंदणी

जनावरांची चाऱ्याची गरज

पशूपालकाकडे १० गायी किंवा म्हशी आहेत, त्यांना एका जनावराला दिवसाला सरासरी ६ किलो पशू खाद्य याप्रमाणे ६० किलो पशुखाद्य लागेल. म्हणजे १८०० किलो किंवा १.८ टन प्रतिमहिना. म्हणजे हेच प्रमाण १० उत्पादकांचे गृहीत धरल्यास १८ टन प्रती महिना आणि २१६ टन प्रती वर्ष इतके पशुखाद्य लागेल. हेच प्रमाण चाऱ्याचे गृहीत धरल्यास ७०० टन हिरवा चारा आणि सुमारे २०० टन कोरडा चारा लागेल. केवळ १०० गाईसाठी सुमारे ११०० टन पशू आहार लागेल, म्हणजेच एका चांगल्या पशुखाद्य वितरकाएवढी उलाढाल केवळ १० लहान दूध उत्पादक करू शकतात.

मूरघास, हाय फायबर पेलेट्स महत्त्व

हिरवा चारा मूरघासाच्या स्वरूपात सुमारे एक वर्ष साठवता येतो. यासाठी बंकर सायलेज, पीट सायलेज, बेल सायलेज तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. सर्वप्रथम मूरघास कसा तयार करायचा हे समजाऊन घ्यावे. कारण योग्य रीतीने मूरघास न बनविल्यास त्यात बुरशी होऊन त्याचे वाईट परिणाम जनावरांच्या शरीरावर होऊ शकतात.

काही ठिकाणी कोरड्या चाऱ्याला पर्याय म्हणून ‘हाय फायबर पेलेट्स'चा वापर केला जातो. दिवसाला लागणाऱ्या खाद्य व चाऱ्याचे प्रमाण समजून, नवीन कच्चा माल उपलब्ध होईपर्यंत लागणाऱ्या चाऱ्याचे गणित करून त्याची सोय दूरदृष्टी दाखवून अगोदरच्या काळात करावी. सोशल मीडिया व फेसबुक, व्हाटसअप ग्रुपचा वापर करून आपला गट तयार करावा.

चारा व्यवसाय संधी

चाऱ्याची अनुपलब्धता ही भविष्यातील व्यवसाय करण्यासाठी मोठी पर्वणी ठरू शकते. हिरवा चारा म्हणजे केवळ हिरवा मका या मानसिकतेतून बाहेर येणे गरजेचे आहे. जे शेतकरी वर्षभर हिरवा चारा उत्पादन घेतात, ते जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड वर्षभर करून चांगला व्यवसाय करू शकतात किंवा चाऱ्याचे मूरघास बनवून पुढील १२ महिन्यांपर्यंत हिरवा चारा संपल्यावर त्याचा वापर करू शकतात. यासाठी कंत्राटही केले जाऊ शकते की, जे विकणारा व विकत घेणारा यांच्यावर बंधनकारक राहील. प्रेस युनिट , हायड्रोलिक मशिन वापरून शेजारील राज्यामधील कोरडा चारा मोठ्या बेल स्वरूपात महाराष्ट्रात आणला जाऊ शकतो.

जास्त प्रथिनयुक्त चारा जसे की लसूण गवत (अल्फा अल्फा), डी.एच.एन-६ यामुळे पशू खाद्याचा खर्च खूप कमी करता येऊ शकतो. चाऱ्यातील प्रथिने शरीराला लवकर उपलब्ध होतात. हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्त्व अ आणि जीवनसत्त्व ई मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते जे प्रजनन, दूध उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता यासाठी उपयुक्त आहे. म्हणून जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड करावी.

डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९

(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत)

Animal Fodder
Rabi Irrigation : मालखेड तलावातून मिळणार नाही गव्हाला पाणी

`फॉडर बँक'चा वापर

ग्रामपंचायत किंवा दूध उत्पादक संस्था यांनी एकत्र येऊन गावामध्ये चारा गोडाऊन बांधणे काळाची गरज आहे. कारण शेतकऱ्यांकडून कमी किमतीला उपलब्ध असणारा चारा गोदामामध्ये साठा करून पुन्हा काही महिन्यांनी भरमसाठ किमतीत शेतकऱ्यालाच विकला जातो. लागणाऱ्या कच्चा माल, कडबा कुट्टी, कोरडा चारा कमी किमतीला उपलब्ध असताना खरेदी करून नंतर चार ते पाच महिन्यांनी दीडपट किंवा जास्त किमतीने खरेदी करण्यापेक्षा कमी किमतीला खरेदी करून गावातील फॉडर बँक मध्ये साठा करून ठेवल्यास पुढे येणारा खर्च कमी करता येऊ शकतो. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या खरेदीच्या ताकदीचा वापर करणे गरजेचे आहे. कारण खाद्य, पेंड, भुसा, कोरडा चारा, कच्चा माल गोदामात साठा करून पुन्हा जास्त किमतीला विकत घ्यावा लागतो. यात प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावे लागते.

उपलब्ध चाऱ्यामधील पोषक तत्त्वांचे तुलनात्मक प्रमाण तक्ता (टक्के)

चारा कोरडा पदार्थ प्रथिने तेल तंतुमय घटक एकूण पचनीय पोषक तत्त्वे

कडबा कुट्टी ९० ६.९ १.४ ४०.७ ५१.४

भाताचा पेंढा ९० ५.९ १.७ ३० ४८

गव्हांडा ९० ४ १.५ ३४.९ ४५

ऊस ४० २.६ १.४ ३७.२ ४६.३

पॅराग्रास १८ १०.२ २.२ ४७.७ ५०

हिरवा मका २३ ८.९ २.६ २८.९ ६७.८

लसूणघास १८ २० २.३ ३०.१ ५८.८

वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य आणि चारा देण्याचे प्रमाण

वजन(किलो) एकूण शुष्क पदार्थ (वजनाच्या ३ टक्के) पशू खाद्य (किलो) कोरडा चारा (किलो) हिरवा चारा

(किलो)

४०० १२ किलो ५.५ ४ १८

४५० १३.५ किलो ६ ४.५ १६

५०० १५ किलो ६.५ ५ २२

५५० १६.५ किलो ७ ५.५ २५

टीप : १) पशुखाद्य,कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आद्रतेसह गृहीत धरले आहे.

२) वरील प्रमाण हे २४ तासांचे असून दोन वेळेस विभागून जनावरांना देण्यात यावे.

३) हिरवा चारा उपलब्ध नसल्यास कोरडा चारा वाढवून द्यावा.

४) दूध उत्पादन वाढल्यास एकूण शुष्क पदार्थांचे प्रमाण दर पाच लिटर मागे ०.५ टक्यांनी वाढवावे.

५) आपल्याकडे जनावरांना हिरव्या चाऱ्यातून मिळणारा कोरडा पदार्थ हा केवळ २३ टक्के इतका असून प्रगत देशामध्ये हेच प्रमाण ६० टक्के इतके जास्त आहे. म्हणजेच जास्तीतजास्त प्रथिने, कर्बोदके, खनिजे, जीवनसत्वे चाऱ्यातून दिली गेली पाहिजेत तरच उत्पादन खर्च कमी करता येऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com