Silk Farming : रेशीम शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यावर भर

Silk Industry Business : जालना जिल्ह्यातील वालसा (डा.) (ता. भोकरदन) येथील बबन माधवराव साबळे यांचा रेशीम उद्योगातील ५ वर्षांचा प्रवास समाधानाचा राहिला आहे. बहिणीने रेशीम उद्योग करण्याचा दिलेला सल्ला फायद्याचा ठरला.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Silk Farming Management : शेतकरी नियोजन

रेशीमशेती

शेतकरी : बबन साबळे

गाव : वालसा (डा.), ता. भोकरदन, जि. जालना

तुती लागवड : अडीच एकर

संगोपनगृह : २

जालना जिल्ह्यातील वालसा (डा.) (ता. भोकरदन) येथील बबन माधवराव साबळे यांचा रेशीम उद्योगातील ५ वर्षांचा प्रवास समाधानाचा राहिला आहे. बहिणीने रेशीम उद्योग करण्याचा दिलेला सल्ला फायद्याचा ठरला. रेशीम उद्योगासाठी सुरुवातीला एक एकरावर केलेली तुती लागवड अडीच एकरावर पोचली आहे. वर्षभरात साधारण सात ते आठ बॅच घेतल्या जातात. रेशीम उद्योगात बबन साबळे यांना पत्नी सौ. शशिकला व आई कडूबाई, मुलगा विठ्ठल व मुलगी स्वाती यांची मदत होते.

Silk Farming
Silk Farming : आता रेशीम शेतीसाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत कर्ज

पारंपरिक पिकांकडून रेशीम शेतीकडे

बबन साबळे रेशीम शेतीस सुरुवात करण्यापूर्वी सोयाबीन, मका अशा पारंपरिक पिकांचे उत्पादन घ्यायचे. त्यातून कुटुंबाचे आर्थिक गणित बसत नव्हते. दरम्यान बबनराव यांची कडेगाव ता. बदनापूर येथील बहीण रूख्मनबाई पांडुरंग निंबाळकर यांनी रेशीमशेती करण्याचा सल्ला दिला. रूख्मनबाई यांचे कुटुंब चार ते पाच वर्षांपासून रेशीम उद्योगाकडे वळले होते. त्यातून कुटूंबाचे अर्थकारण मजबूत झाले होते. त्यामुळे रूख्मनबाई बबनरावांना दोन तीन वर्षांपासून थोड्या क्षेत्रात का होईना तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्याचा सल्ला देत होत्या. परंतु काटेकोर व किचकट उद्योग आपल्याला जमणार नाही म्हणून बबनराव सतत त्याला टाळत होते.

अखेर पारंपरिक पिकांच्या लागवडीतून हाती काही येत नसल्याने २०१९ मध्ये १ एकरावर तुतीची लागवड करून ते रेशीम उद्योगाकडे वळले. त्यानंतर २०२०-२१ मध्ये एक एकर व २०२१-२२ मध्ये अर्धा एकरावर लागवड करून एकूण क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र तुती लागवडीखाली आणले. सुरुवातीला २०१९ मध्ये रेशीम विभागाच्या माध्यमातून योजनेंतर्गत २२ बाय ५० फूट आकाराचे शेड उभारले. पुन्हा २०२२ मध्ये आणखी २४ बाय ५० फुटांचे शेड उभारत व्यवसायाचा विस्तार केला.

तुती बागेचे व्यवस्थापन

पहिल्या टप्प्यातील लागवडीपासून क्षेत्र विस्तार करण्यापर्यंतची संपूर्ण तुती लागवड ३ बाय २ बाय ५ फूट अंतरावर केली आहे. बैलजोडीच्या साह्याने तुती बागेत आंतरमशागतीच्या कामे करण्यावर भर दिला जातो. बागेत छाटणी केल्यानंतर डीएपी किंवा १०:२६:२६ यांची एकरी खतमात्रा दिली जाते.

Silk Farming
Silk Farming : रेशीम कीटकांसाठी दर्जेदार तुती पाला उपलब्धतेवर भर

तुती पाल्याचा दर्जा राखण्यासाठी शिफारशीत घटकांच्या दोन फवारण्या घेतल्या जातात. त्यातील पहिली फवारणी पीक १ ते दीड फुटाचे असताना आणि त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी घेतली जाते. या फवारण्या घेत असतानाच १९:१९:१९ एकरी १ किलो प्रमाणे फवारणीसोबतच दिले जाते. प्रत्येक बॅचमधील रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. एका बॅचमधील कीटकांना किमान सव्वा एकर क्षेत्रातील तुती पाला उपलब्ध होईल असे नियोजन केले जाते.

दोन शेडमध्ये एकावेळी दोन बॅच

रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २२ बाय ५० फूट आणि २४ बाय ५० फूट आकाराची एकूण दोन शेड उभारली आहेत. त्यामध्ये एकावेळी दोन बॅच घेण्याचे त्यांचे नियोजन असते.

वर्षभरात साधारणपणे ७ ते ८ बॅच घेतल्या जातात. साधारणत: जुलै ते महिन्यापासून बॅच सुरू होऊन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बॅच संपतात.

प्रत्येक बॅच २०० अंडीपुंजाची असते. १०० अंडीपुंजांपासून ७० ते ८० किलो दर्जेदार कोष उत्पादन मिळते.

तुती बागेची छाटणी झाल्यानंतर पुढील बॅचमधील रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होईल असे नियोजन केले जाते.

बॅच सुरू होण्यापूर्वी चॉकीची आगाऊ नोंदणी, शेड निर्जंतुकीकरणासह इतर आवश्यक सोपस्कार ते पार पाडतात.

चॉकी शेडवर आल्यापासून कोष तयार होण्यास साधारणत: १७ ते १८ दिवस लागतात.

आर्थिक उलाढाल

एका बॅचपासून कोष उत्पादन घेण्यासाठी सरासरी १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. उत्पादित रेशीम कोषांची विक्री जालना येथील रेशीम कोष बाजारपेठेत विक्री केली जाते. प्रत्येक बॅचपासून सरासरी ७० ते ८० हजारांचे उत्पन्न मिळते. हे बाजारपेठेतील दरानुसार कमी अधिक होते. असे श्री. साबळे सांगतात.

मागील कामकाज

१५ ऑगस्टपासून २७ ऑक्टोबर पर्यंत नॉन स्पिनींग समस्येमुळे कोणतीही बॅच घेण्यात आली नाही. या काळात विश्रांती घेण्यात आली. कारण, दरवर्षी या काळात अळी कोष तयार न करण्याची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे त्यामुळे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. या समस्येमुळे ऑगस्ट महिन्यातील घेतलेली बॅच फेल गेली आहे.

एका संगोपनगृहातील नवीन बॅच साधारण ७ नोव्हेंबरच्या दरम्यान, तर दुसऱ्या संगोपनगृहातील बॅच २० नोव्हेंबरच्या दरम्यान घेण्यात आली.

पहिली ७ नोव्हेंबरची बॅच १५० अंडीपुंजाची, तर दुसरी २० नोव्हेंबरच्या बॅच २०० अंडीपुंजाची घेतली आहे.

बॅच घेण्यापूर्वी शेडचे तीन वेळा निर्जंतुकीकरण करून घेतले. चंद्रिका जाळ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आली.

तिसऱ्या आणि चौथ्या मोल्टमध्ये दर्जेदार पाला रेशीम कीटकांना उपलब्ध करण्यात आला.

कोष निर्मितीस साधारणपणे २९ नोव्हेंबरच्या दरम्यान सुरुवात झाली. थंडीमुळे कोष निर्मिती प्रक्रिया संथ होते.

शेडमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी शेडच्या बाजूने प्लास्टिक पडदे लावण्यात आले. तसेच शेडमध्ये लहान शेकोट्या ठेवण्यात आल्या.

रेशीम कीटकांवर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत पावडरची धुरळणी केली. जेणेकरून रेशीम कीटकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.

आगामी नियोजन

सध्या एका संगोपनगृहातील रेशीम कोषाची घरच्या सदस्यांच्या मदतीने काढणी सुरू आहे. या बॅचमधून १५० किलो कोष उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.

ही बॅच पूर्ण झाल्यानंतर पुढील बॅचमध्ये साधारण २ महिन्याचे अंतर राखले जाईल.

तुती बागेत आंतरमशागतीची कामे केली जातील. बागेत रासायनिक खत तसेच शेणखत मात्रा दिली जाईल. तसेच सिंचन व्यवस्थापनावर भर दिला जाईल.

साधारणपणे ६ फेब्रुवारीच्या दरम्यान नवीन बॅच घेतली जाईल.

दुसऱ्या संगोपनगृहात तिसरा मोल्ट पास झाला आहे. या बॅचमधील रेशीम कीटकांचे संगोपनगृहामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मागील महिन्यात केलेल्या उपायावर भर देणार आहे. ही बॅच पुढील १५ दिवसांत कोष काढणीस येईल.

बबन साबळे, ९५२७३९५८७१

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com