
Silk Farming Management :
शेतकरी नियोजन
रेशीमशेती
शेतकरी : मोतीराम दुधाटे
गाव : देऊळगाव दुधाटे, ता. पूर्णा, जि. परभणी
तुती लागवड : २ एकर
परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा)येथील मोतीराम दुधाटे हे कुटुंबीयांच्या मदतीने मागील ८ वर्षांपासून पूरक उद्योग म्हणून रेशीमशेती करत आहेत. तुती बागेच्या काटेकोर व्यवस्थापनासह रेशीम कीटकांच्या योग्य संगोपनातून दर्जेदार कोष उत्पादन ते घेत आहेत.
देऊळगाव दुधाटे येथे मोतीराम दुधाटे यांचे मोतीराम, शिवराम, दामाजी या तीन भावांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची १० एकर शेती आहे. पारंपारिक पिकांची लागवड आणि मिळणारे उत्पन्न यांची गणित जुळत नव्हते. खात्रीशीर उत्पन्न हाती येत नव्हते. त्यामुळे मोतीराम यांनी पूरक व्यवसाय करण्याचे ठरविले.
दरम्यानच्या काळात त्यांना रेशीम शेतीविषयी माहिती मिळाली. त्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेत गावाशेजारील देवठाणा येथील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून रेशीम शेतीबाबत माहिती घेतली. २०१६ मध्ये मनरेगा अंतर्गत तुती लागवडीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करून व्यवसायास सुरुवात केली. रेशीम शेतीमध्ये मोतीराम यांना रेशीम शेतीमध्ये पत्नी लोचना, बंधू शिवराम, भावजय ऊर्मिला यांची मदत मिळते.
तुती बाग व्यवस्थापन
२०१६ मध्ये तुती लागवडीसाठी २ एकर जमीन तयार केली. तुती लागवडीसाठी देवठाणा येथील शेतकऱ्यांकडून तुती बेणे खरेदी केले. दोन एकर क्षेत्रावर ५ बाय ३ बाय २ फूट अंतरावर जो़डओळ पद्धतीने तुतीच्या व्ही-१ या जातीच्या लागवड केली. लागवड जून महिन्यात केल्यामुळे सिंचनाची आवश्यकता भासली नाही.
पावसाळा संपल्यानंतर प्रवाही पद्धतीने सिंचन करण्यास सुरुवात केली. लागवडीनंतर पाच महिन्यांनी नोव्हेबर २०१६ मध्ये बागेची पहिली छाटणी केली. दरम्यान, तुती लागवड केल्यानंतर देऊळगाव दुधाटे येथील सुदाम दुधाटे यांच्या शेतावर दररोज जाऊन रेशीम कोष उत्पादनाची संपूर्ण बॅच होईपर्यंत कीटक संगोपनाची प्रात्यक्षिकासह माहिती घेतली.
रेशीम कीटकसंगोपनगृह
रेशीम उद्योगासाठी शेतातील आखाड्यावर २३ फूट (उत्तर दक्षिण) बाय ६० फूट (पूर्व-पश्चिम) आकाराच्या जागेत रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी केली.
सिमेंट, विटा, टिन पत्रे, लोखंडी पट्ट्या आदी साहित्याचा वापर करून संगोपनगृह उभारले.
संगोपनगृहामध्ये दोन्ही बाजूने ६ फूट बाय ५० फूट आकाराचे प्रत्येकी ५ कप्पे असलेले रॅक उभारले. दोन्ही रॅकमध्ये ४ फूट तसेच दोन्ही रॅकच्या बाजूने ३ फूट मोकळी जागा सोडली. त्यामुळे चारही बाजूने रेशीम कीटकांना तुती पाने खाद्य म्हणून देणे शक्य झाले.
संगोपनगृह उभारणीसाठी सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा खर्च आला. त्यापैकी ९३ हजार रुपये मनरेगातून अनुदान मिळाले.
संगोपनगृहाची २५० अंडीपुंजाची क्षमता आहे.
रेशीम कोष उत्पादन
रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात बॅच सुरू करण्यापूर्वी चॉकीची आगाऊ मागणी नोंदविली. पहिली बॅच १५० अंडीपुजांची घेतली. त्यापासून ८० किलो कोष उत्पादन मिळाले. तेलंगणा येथील जनगाव मार्केटमध्ये रेशीम कोष विक्रीस नेले. त्यावेळी प्रतिकिलो ४०० रुपये इतका दर मिळाला. पहिल्या वर्षी १५० ते २५० अंडीपुजांच्या ६ बॅचपासून कोष उत्पादन घेतले. त्यातून सरासरी ८० ते ८२ क्विंटल कोष उत्पादन मिळाले.
दुसऱ्या बॅचपासून कोष विक्रीसाठी रामनगरम येथील मार्केटमध्ये नेण्यास सुरुवात केली. सध्या रामनगरम तसेच बीड येथील मार्केटमध्ये कोष विक्री केली जाते.
दरवर्षी प्रत्येकी २०० अंडीपुंजाच्या ६ बॅच घेतल्या जातात.
मागील महिनाभरातील कामकाज
आगामी बॅच नियोजनानुसार रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होण्यासाठी तुती बागेत आंतरमशागत केली.
त्यानंतर १५ः१५ः१५ खताची एकरी मात्रा दिली. तसेच डिकम्पोजरची आळवणी केली.
रेशीम शेतीत तुती पाल्याचा दर्जा उत्तम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पाल्याचा दर्जा चांगला मिळविण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी केली.
बॅच नियोजनानुसार संगोपनृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरणाची कामे करून घेतली.
मागील तीन दिवसांपूर्वी भेंडेगाव (ता. वसमत) येथे १५० अंडीपुंज (चॉकी) ची मागणी नोंदविली आहे.
आगामी नियोजन
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेशीम कोषाची नवीन बॅच घेणार आहे. त्यानुसार सध्या तुती बागेत आणि संगोपनगृहात पूर्वतयारी सुरू आहे.
चॉकी शेडवर आणल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रेशीम कीटकांची विशेष काळजी घेतली जाईल.
रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध करण्यावर अधिक भर दिला जाईल.
सध्या थंडी सुरु असल्याने संगोपनगृहातील तापमान योग्य राखण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल.
या बॅचमधील कोष साधारणपणे जानेवारी, २०२५ च्या पहिल्या पंधरवड्यात तयार होतील. उत्पादित कोषाची रामनगरम येथील मार्केटमध्ये विक्री करण्याचे नियोजन असल्याचे मोतीराम दुधाटे सांगतात.
- मोतीराम दुधाटे, ९६५७३१६६८५
(शब्दांकन : माणिक रासवे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.