Sugarcane Fertilizer and Irrigation Management :
शेतकरी नियोजन
खोडवा ऊस
शेतकरी : महादेव तासगावे
गाव : जांभळी, जि. कोल्हापूर
खोडवा क्षेत्र : २ एकर
कोल्हापूर जिल्ह्यातील जांभळी (ता. शिरोळ) हे ऊस उत्पादनातील अग्रेसर गाव. या गावातील महादेव ता सगावे यांची ६ एकर शेती आहे. यामध्ये महादेवराव उसासह अन्य भाजीपाला पिके घेतात. त्यांचा विशेष भर उसाच्या लावणीवर जास्त असतो. प्रत्येक वर्षी पाच ते दहा एकरावर उसाची लागवड असते. मागील वर्षी त्यांनी दोन एकरावर खोडवा ठेवला आहे.
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तासगावे कुटुंबीय दरवर्षी एकरी ७२ ते ७५ टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतात. त्यासाठी कारखान्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या ऊस उत्पादन व्यवस्थापन कार्यक्रमाचा आधार घेतला जातो. कारखान्याचे अधिकारी नियमितपणे ऊस लागवडीस भेट देतात.
हवामानानुसार व्यवस्थापन पद्धतीमध्ये आवश्यक बदल सुचवतात. कारखान्याकडूनच आवश्यकतेनुसार रासायनिक खतांचा पुरवठा होत असल्याने आवश्यक ती खते तातडीने मिळतात. श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांचे मार्गदर्शन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोलाचे ठरते. यामुळे उसाचे व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचे महादेवराव तासगावे सांगतात.
खोडवा व्यवस्थापनातील बाबी
मागील वर्षी डिसेंबरमध्ये दोन एकरांतील ऊस तुटल्यानंतर खोडवा ठेवला आहे. को - २६५ या जातीचा खोडवा आहे.
ऊस लागवड साडेतीन फुटी सरीत आहे. डिसेंबरमध्ये ऊस तुटल्यानंतर त्यांनी पाचट कुट्टी केली. कुट्टी केल्यानंतर पाला एक सरी आड सरीत ट्रॅक्टरच्या साह्याने दाबून घेतला. पाला कुजण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटची वापर केला.
त्यानंतर पिकाचे बुंध्याची छाटणी केली. छाटणी केल्यानंतर रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी केली.
साधारणपणे ७ ते ८ पानांवर ऊस आल्यानंतर दत्त कारखान्याच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत उसाची पाने तपासणीसाठी पाठविली. त्यानंतर प्रयोगशाळेच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी महिन्यात भरणीच्या वेळी रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या. त्यात १०ः२६ः२६, युरिया, अमोनिअम सल्फेट, कॅल्शिअम व पोटॅश यांच्या मात्रा दिल्या आहेत.
त्यानंतर एकसरी आड पाटपाणी आणि ठिबकद्वारे सिंचन केले. माळरानावरील जमीन असल्यामुळे आवश्यकतेनुसार सिंचन करण्यावर भर देण्यात येतो. पावसाचा अंदाज घेऊन ठिबक व पाटपाणी या दोन्ही पद्धतीने सिंचन व्यवस्थापन केले.
रासायनिक खतांचे संतुलित व्यवस्थापन तसेच पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे मातीची सुपीकता जपली आहे. योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सिंचनाची फारशी आवश्यकता भासली नाही. उसाच्या कांड्यांची वाढ चांगली झालेली आहे.
पाचटाचा प्रभावी वापर
तासगावे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आजपर्यंत कधीही शेतातील पाचट जाळले नाही. ऊस गेल्यानंतर पाचट कुट्टी करून तसेच शेतजमिनीत मिसळले जाते. यामुळे जमिनीचा पोत सुधारून जमीन अधिक उत्पादनक्षम बनते, असा महादेवराव यांचा अनुभव आहे. यावर्षी योग्य व्यवस्थापनातून खोडव्याचे उच्चांकी उत्पादन घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.
आगामी नियोजन
सध्या शेतातील उसाचा खोडवा अकरा महिन्यांचा झाला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने खोडव्यासाठी पूरक स्थिती होती.
अद्याप ऊस हंगाम सुरू झाला नाही. डिसेंबरमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर त्यापुढे ३ ते ४ महिन्यांत उसाची तोड होऊन तो कारखान्याला जाईल.
सध्या उसाची वाढ मोठी झाल्यामुळे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने फारशी कामे करणे शक्य होणार नाही. एक ते दोन महिन्यानंतर पाण्याचा ताण पडल्यास पाटपाणी व ठिबकद्वारे सिंचन करण्यावर भर राहील. सद्यःस्थितीमध्ये खोडव्याचे एकरी ७० टनांहून अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
महादेव तासगावे, ९८८१८१४३२२
(शब्दांकन : राजकुमार चौगुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.