Farm Road Dispute : अतिक्रमित पाणंद रस्त्याच्या मोजणीलाच विरोध

Panand Road : राज्य सरकारने यंदा शेतरस्त्यांचा विषय चांगलाच ऐरणीवर घेतला आहे. यातूनच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद, शेत व शिवरस्त्यांवरील अतिक्रमण दूर करावे व त्यासाठी विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Farm Road Issue
Farm Road Issue Agrowon
Published on
Updated on

Latur News : राज्य सरकारने यंदा शेतरस्त्यांचा विषय चांगलाच ऐरणीवर घेतला आहे. यातूनच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद, शेत व शिवरस्त्यांवरील अतिक्रमण दूर करावे व त्यासाठी विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विभागीय आयुक्तांनीही सस्ती अदालतीचा उपक्रम हाती घेत शेतरस्ते मोकळे करण्यासाठी मोजणी व पोलिस बंदोबस्त मोफत देण्याचा निर्णय घेतला. उपक्रमातून खरिपाच्या पेरण्यापूर्वी शेतरस्त्यांचे प्रश्‍न निकाली काढण्याचे प्रयत्न झाले.

अनेक ठिकाणी प्रयत्नांना यश आले. मात्र मसला (ता. लातूर) येथील चारशे मीटर लांबीच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गुरुवारी (ता. पाच) प्रशासनाला यश आले नाही. रस्ता मोकळा करण्यासाठी सुरू केलेल्या मोजणीलाच विरोध झाला. यामुळे नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमण काढण्याच्या प्रकरणातील हा पहिलाच गुन्हा असावा.

Farm Road Issue
Farm Road: कोल्हापुरातील ४३० पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त

मसला येथील मसला चौक ते भिसेवाघोली जाणाऱ्या पाणंद रस्त्याचा तेरा वर्षांपासूनचा वाद आहे. या रस्त्याची गाव नकाशावर नोंद असून रस्त्याचा ठावठिकाणा शोधत अनेकदा प्रशासनाकडून शेजारी शेतकऱ्याच्या शेतातून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्यावरच अनेक सरकारी कामे झाली. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. या रस्त्याबाबत न्यायालयाचे निर्णय, त्याला झालेले अपील, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेले रस्ते, जिल्हा परिषदेकडून झालेले अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, असे अनेक तेरा वर्षात निर्माण झाले.

Farm Road Issue
Farm Road Dispute : शेतरस्त्यांची ५६० प्रकरणे सामंजस्याने निकाली

अनेक गुंतागुंत असलेल्या या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न मागील काळातही प्रशासनाकडून झाले. मात्र त्याला यश आले नाही. आता सस्ती अदालतीच्या माध्यमातून गुरुवारी या चारशे मीटर लांब व वीस ते पंचेवीस फूट रुंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न झाले. त्यासाठी महसूल, भूमिअभिलेख व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन मोजणी करण्यास सुरवात केली. मात्र या मोजणीलाच गावातील नऊ जणांनी तीव्र विरोध केला. नायब तहसीलदार गणेश सरोदे व मुरुडचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांच्यासह अनेकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यांनी भूमिका बदलली नाही. रस्त्याबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याचे सांगत विरोध कायम ठेवला. सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊपर्यंत प्रयत्न करूनही ते मागे हटले नाहीत. शेवटी तांदुळजाच्या मंडळ अधिकारी अमृता अकोले यांनी रात्री उशिरा मुरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून पोलिसांनी सुरेश रंगनाथ धुमाळ, रमेश बाजाराव धुमाळ, रत्नलिंग दिगंबर धुमाळ, अक्षय रमेश धुमाळ, रामेश्‍वर महालिंग धुमाळ, काकासाहेब विश्‍वनाथ धुमाळ, बसलिंग लक्ष्मण धुमाळ, शिवानंद दिगंबर धुमाळ व बालाजी सिद्राम धुमाळ यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२१, २२३ व १८९ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मसला चौक ते भिसेवाघोली जाणाऱ्या पाणंद रस्त्याबाबत तेरा वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यात गुंतागुंत आहे. प्रशासनाकडून या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पाणंद, शेत व शिवरस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सस्ती अदालतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमातूनच या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठीच्या मोजणीला विरोध झाला. समजून सांगूनही विरोध केल्याने नऊ जणांविरुद्ध कारवाई करावी लागली.
- गणेश सरोदे, नायब तहसीलदार, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com