

Dam Collapsed In Libiya : तुमच्या देशातील राजकीय शक्ती पूर्ण देशात दशकानुदशके यादवी माजवत असतील, तर तुमच्या जीवन-मरणाच्या नेहमीच्या प्रश्नांकडे आत्मघातकी दुर्लक्ष होणे अपरिहार्य आहे.
लीबियामधील देरना या छोट्या शहराच्या बाजूला असणारे धरण फुटून २० हजारांपेक्षा जास्त नागरिक एका क्षणात पाण्याच्या लोटात वाहून गेले. शहराची जवळपास एक चतुथांश लोकसंख्या होती ती. ज्यात अनेक कुटुंबेच्या कुटुंब नामशेष झाली आहेत; म्हणजे शोक करायला देखील मागे कोणी उरलेले नाही. कल्पना करून पाहा, थरकाप उडेल.
अशा घटनांना मानवी शोकांतिका म्हणून लेबले लावणे सोपे आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणून लेबले लावणे सोपे आहे; पण त्याचे आपल्याला मार्गदर्शक ठरतील असे अन्वयार्थ / धडे घेण्यासाठी ताण द्यावा लागेल. लीबियामध्ये गेली अनेक वर्षे- किमान दोन दशके- सामाजिक/ राजकीय यादवी माजली आहे.
अर्थसंकल्प बनवणे, राबवणे, एकूण प्रशासन लकवा मारल्यासारखे झाले आहे. उदा. जे धरण अचानक फुटले त्याची डागडुजी २००२ पासून झालेली नव्हती आणि लीबियामध्ये अशी अनेक धरणे आहेत. देशातील यादवीमुळे धोकादायक धरणांची साधी डागडुजी होत नाही, यावरून स्थितीची कल्पना येईल.
लीबियात सामान्य नागरिकांचा राजकारणातील सहभाग शून्य आहे. राजकीय पक्ष / नेते यांच्यातील सत्तास्पर्धा आपण समजू शकतो; पण देश/ समाज म्हणून अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडे नेऊन ठेवल्या पाहिजेत. देशातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, पुढच्या पिढ्यांचे शिक्षण अशी काही क्षेत्रे आहेत ज्यात अल्पकालीन सत्तासंबंध आणणे योग्य नसते.
अमेरिकेतील राज्यकर्त्या वर्गाबद्दल अनेक टीका करता येतील; पण देशाच्या हिताच्या निर्णयात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स पक्षाचे नेते पक्षीय हित बाजूला ठेवून निर्णय घेतात. त्यामुळे तेथील पायाभूत सुविधांची गुणवत्ता दशकानुदशके टिकून आहे आणि अशा अनेक गोष्टी सांगता येतील.
आपण आयुष्यभर नक्की कशासाठी राबतो? आपल्या आणि आपल्या मुलांच्या/ नातवंडांच्या आयुष्यावर जीवघेणे परिणाम करणाऱ्या कोणत्या गोष्टी / शक्ती आहेत याचे देखील भान नाही? यापेक्षा किडामुगी, पशु-पक्षी बरे. सतत वातावरणात, हवामानात होणाऱ्या बदलांचा ट्रॅक ठेवतात आणि त्याप्रमाणे आपला दिनक्रम आखतात.
प्रामाणिक असाल तर तुमच्या आवडत्या राजकीय पक्षाप्रती, नेत्याप्रती असणाऱ्या प्रीतीच्या पलीकडे जाऊन देशासमोरील, तरुण पिढीसमोरील, न जन्मलेल्या पिढ्यांसमोरील इश्यूंची मनातल्या मनात यादी कराल आणि जे चालले आहे ते बरोबर नाही या निष्कर्षावर याल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.