Fisheries : मत्स्यव्यवसाय संकुलाचे काम रखडले

Fisheries Office Update : मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि बाहेरील सुशोभीकरणाची काही कामे शिल्लक आहेत.
Fisheries Office
Fisheries OfficeAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी आणि बाहेरील सुशोभीकरणाची काही कामे शिल्लक आहेत. अखेरच्या टप्प्यात असलेल्‍या मत्स्यव्यवसाय संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नवीन इमारत प्रशिक्षण केंद्रासह कार्यान्वित करण्याचा दावा मत्स्यव्यवसाय विभागाकडून केला होता. मात्र निधीअभावी काम रखडल्‍याने संकुलाचे उद्‌घाटनास विलंब होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

अलिबाग कोळीवाड्यात कोस्टगार्ड इमारतीच्या बाजूलाच मत्स्यव्यवसाय विभागाची नवी इमारत बांधण्यात येत आहे. बांधकाम पूर्ण झाले असून टाईल्स आणि रंगरंगोटीची कामे शिल्लक आहे. इमारतीमध्ये मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. ब्रिटिशकालीन इमारतीची दुरवस्था झाल्‍याने ती इमारत पूर्णपणे पाडण्यात आली आहे. सर्व परवानग्या मिळविल्यानंतर २३ जानेवारी २०२० मध्ये काम सुरू करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला देण्यात आले होते.

Fisheries Office
Fishery Employment : बक्कळ नफा कमवून देणाऱ्या मत्स्य व्यवसायातील संधी

संकुलासाठी ३ कोटी ३५ लाखांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात सुरुवातीला १ कोटी त्‍यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये २ कोटी ३६ लाख रुपये बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. संकुलाचे काम विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन एजन्सीला देण्यात आले आहे.

मत्स्य व्यवसाय विभागाशी संबंधित कार्यालये एकाच ठिकाणी नसल्याने कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या मच्छीमारांना हेलपाटे मारावे लागायचे. त्‍यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च व्हायचा.

मत्‍स्‍य व्यवसाय संकुलात परवाना विभाग, वसुली विभाग, उपायुक्तांचे कार्यालय, प्रशिक्षण केंद्र, मत्स्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. याशिवाय एक मध्यवर्ती सभागृह असेल, या ठिकाणी मच्छीमारांचे कार्यक्रम घेता येतील. सध्या हे सर्व विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असल्‍याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नव्या संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे.

Fisheries Office
Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

मत्‍स्‍य शेतीसाठी वित्तपुरवठा

जिल्‍ह्यात दरवर्षी साधारण ४२ हजार मेट्रिक टन मासेमारी केली जाते. यात ९५ टक्‍के वाटा सागरी मासेामारीचा आहे. काही वर्षांपासून गोड्या पाण्यातील मत्‍स्‍य शेतीला मच्छीमारांकडून पसंती मिळू लागली आहे. राष्‍ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी गतवर्षी घेतलेल्‍या कार्यशाळेत मत्‍स्‍य व्यवसाय आणि मत्‍स्‍यशेती पायाभूत सुविधा व प्रकल्‍पनिर्मितीसाठी अल्प व्याजदराने वित्तपुरवठा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशासकीय खर्चात होणार बचत

सध्या मत्‍स्‍य व्यवसायाशी संबंधित सर्व कार्यालयांचा कारभार भाडेतत्त्‍वावरील जागेतून सुरू आहे. प्रशिक्षण केंद्राला ३४ हजार ६८३ रुपये तर मत्स्यव्यवसाय उपायुक्त कार्यालयाला २५ हजार ८०२ रुपये इतके भाड्यापोटी खर्च करावे लागत होते. हे पैसे आता वाचणार आहेत. दहा वर्षात या विविध कार्यालयांसाठी कोटीच्या आसपास भाड्यासाठी खर्च करावे लागले आहेत. ही इमारत मुख्यतः प्रशिक्षण केंद्रासाठी वापरली जाणार आहे. वर्गखोल्या, सभागृहासह याठिकाणी मत्स्यसंग्राहलाय साकारण्यात येणार आहे.

राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मंजुरी...

अलिबाग-कोळीवाडा येथील मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी इमारत मोडकळीस आल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचे कार्यालय व मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र बंद करून २००६ मध्ये खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून मत्स्यव्यवसाय विभाग कार्यालयाच्या भाड्यासाठी सरकारला दरवर्षी सुमारे ७ लाख रुपये खर्च येतो.

जुन्या इमारतीच्या जागेत सुसज्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यास सप्टेंबर २०१४ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली असून सुसज्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राबरोबरच, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग कार्यालय आणि जिल्हा मत्स्यालय संकुलाचा यात समावेश आहे.

मत्स्यव्यवसायाशी संबंधित असणारे विभाग संकुलात एकाच छताखाली येणार आहेत. प्रशासकीय कामाकाजाबरोबरच जिल्हाभरातून येणारे मच्छीमार बांधव, सोसायट्यांचे पदाधिकारी यांचा हे सोयीचे जाणार आहे. ही इमारत कोळी लोकवस्तीमध्येच असल्याने येथून कोळी लोकांच्या उन्नतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे अधिक सोयीचे होईल. निधीच्या कमतरतेमुळे संकुलाचे काम रखडले होते. लवकरच यावर मार्ग काढला जाईल.
संजय पाटील, मत्स्यव्यवसाय उपायुक्त, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com