
सौ. सुरेखा बोऱ्हाडे
Maharashtra Agriculture : स्व. वसंतराव फुलसिंग नाईक यांना हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजना वसंतराव नाईक यांनी सुरू करून महाराष्ट्रात क्रांती घडवली. त्यांना ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी बी.ए. करून पुढे एलएल.बी ही पदवी प्राप्त केली.
वत्सलाताई घाटे यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांनी आपल्या वकिलीचा उपयोग गोरगरीब, शेतकरी, आदिवासी घटकांच्या हितासाठी केली. त्यामुळे त्यांना सामाजिक बांधिलकी जपणारा वकील म्हणून संबोधले गेले. वत्सलाताई पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या. त्या वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. महिला सक्षमीकरणासाठी महिला संवाद, महिला मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करीत असत.
महाराष्ट्राची पायाभरणी
वसंतरावांनी वकिली बरोबरच सामाजिक कार्यासाठी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला अगदी मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. पुढे ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्री झाले.
आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय अभ्यास टीममध्ये तत्कालीन कृषिमंत्री वसंतराव नाईक यांची आंतरराष्ट्रीय राइस कमिशनच्या शिष्टमंडळात निवड होऊन त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. १९६३ मध्ये बहुमताने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या. महाराष्ट्राची पायाभरणी व उभारणी त्यांच्यात कारकिर्दीत झाली. प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले.
हरित-धवल क्रांतीचे प्रणेते
वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वांत जास्त काळ १२ वर्षे मुख्यमंत्री होते. ते एक अनुभवी राजकारणी होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शेती क्षेत्रात भरीव कार्य केले. वसंतराव नाईक यांनी आधुनिक शेतीच्या पद्धतींचा प्रसार करून महाराष्ट्रात हरितक्रांतीला चालना दिली. सिंचन, खतांचा वापर, सुधारित बियाणे यांचा प्रचार केला.
शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठे, प्रशिक्षण केंद्रे यांद्वारे मार्गदर्शन दिले. दूध उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सहकारी दूध संघ स्थापन केले. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्याला जोडधंदाची संकल्पना देऊन उभारी दिली. दुग्ध व्यवसायाच्या या क्रांतीला धवल क्रांती असे म्हटले गेले. ग्रामीण विकासासाठी ‘गाव तिथे रस्ता’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली. त्यामुळे खेड्यांना रस्त्यांनी जोडून विकास साधला गेला. नक्षल चळवळीविरुद्ध
कडक भूमिका घेतली. चंद्रपूर-गडचिरोली भागात वाढणाऱ्या नक्षलवादी चळवळीविरोधात कठोर पावले उचलली. त्यांनी आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अवलंबिल्या.
त्यांनी शिक्षण क्षेत्रातही अतुलनीय कार्य केले. १९६४ मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ (बालभारती), बालकांसाठी किशोर व जीवनशिक्षण मासिकाची निर्मिती, राज्य विज्ञान संस्था, शेतकरी हितार्थ शेतकरी मासिक निर्मिती त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना केली.
शिक्षण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय योगदान दिले. मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी शिक्षण संस्था, वसतिगृहे सुरू केली. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पोषण आहार योजना सुरू केल्या. औद्योगिकीकरण आणि रोजगार वाढीसाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबविले. राज्यात नवीन औद्योगिक वसाहती उभारल्या. एमआयडीसी सारख्या संस्थांच्या माध्यमातून सामान्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य टिकून होते.
वसंतराव नाईक यांचे निधन १८ ऑगस्ट १९७९ रोजी झाले. वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली. त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘हरितक्रांतीचे जनक’ अशीही उपाधी दिली गेली. त्यांच्या या योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस १ जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.