
Beed News : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या, पवन चक्की खंडणी व ॲट्रॉसिटी या तीन गुन्ह्यांचा तपास करून सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतरची पहिली सुनावणी बुधवारी (ता.१२) केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड करण्यात आली.
नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर पवन चक्की प्रकल्पाला धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हाही केज पोलिस ठाण्यात नोंद झाला. हत्येच्या घटनेपूर्वी याच प्रकल्पावरील दलित सुरक्षारक्षकाला मारहाणीचा गुन्हाही नंतर दाखल झाला. दरम्यान, केज पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने केला.
संतोष देशमुख यांची हत्या खंडणीला अडसर ठरल्यानेच झाल्याचे तपासातून समोर आल्याने वाल्मीक कराड याला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यात आले आहे. तर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे व फरार कृष्णा आंधळे यांच्यावरील दोषारोपत्र बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल केले. सदर दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयाने केजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केले. त्यावर बुधवारी (ता. १२) पहिली सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासमोर झाली.
सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. तर आरोपींपैकी वाल्मीक कराडकडून अॅड. विकास खाडे, विष्णू चाटेकडून अॅड. राहुल मुंडे व उर्वरित आरोपींकडून अॅड. अनंत तिडके यांनी बाजू मांडली. कारागृहात असलेल्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्रात पू्र्ण कागदपत्र दिले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. आरोपींचा जबाब दिला नसल्याचे म्हटले. तसेच आरोपींचे जबाब बंद लिफाफ्यात असल्याने तो लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आरोपींच्या वकिलांनी केली.\
या प्रकरणात दोषारोपपत्रात नमूद केलेल्या डिजिटल पुराव्यांचीही मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. यावर पुढच्या सुनावणीपूर्वी या बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे सरकारी पक्षाचे वकील अॅड. कोल्हे यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होईल, असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.