Karta Shetkari : लपलेल्या उद्योजकाचा संततशोध

Article by Dr. Anand Nadkarni : आकाश म्हणतो, की त्याला आता दंतेवाड्यात गेल्यावर ‘घरी’ आल्यासारखे वाटते. स्वतःबरोबरच इतर अनेकांच्या जगण्याच्या आकाराला नवे ऊकार देणाऱ्या अशा उद्योजकांच्या कहाण्या या मातीमध्ये रोज घडत आहेत. ही प्रक्रिया देशव्यापी व्हावी म्हणूनचे ‘सेंद्रिय खत’ म्हणजे ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम.
Karta Shetkari
Karta Shetkari Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी :

रामकृष्णहरी वाचकहो! म्हणता म्हणता दहा-अकरा महिन्यांचा काळ सरला आणि ‘ॲग्रोवन’च्या अंकातील आपली ‘कर्ता शेतकरी’ ही लेखमालिका आता संपन्न होत आहे. ‘सह्याद्री फार्म्स’ आणि इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या दोन्ही सहभागी संस्थांना या प्रकल्पाच्या रूपाने एकत्र येता आले आणि त्यातून तयार झाला एक दृकश्राव्य अभ्यासक्रम. उण्यापुऱ्या बेचाळीस भागांचा. आपल्या ‘आवाहन आयपीएच’ या यू-ट्यूब वाहिनीवर तसेच एबीपी माझा ऑनलाइन आणि सह्याद्री फार्म्सच्या चॅनेलवर ही मालिका आपल्यासाठी निरंतर उपलब्ध आहेच.

तरीही लेखरूपाने हा सारा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून आम्हाला मांडावासा वाटला त्याची काही कारणे आहेत. कोणताही अभ्यासक्रम म्हटला की त्याचे एक पाठ्यपुस्तक असते. काही शेतकरी प्रथम ‘कर्ता शेतकरी’चे एपिसोड पाहतील आणि नंतर उजळणीसाठी लेखांचा वापर करतील. तर काही जण लेखमालिका वाचतील आणि नंतर स्क्रीनवरचे भाग पाहतील.

म्हणूनच या लेखमालिकेवर काही संस्कार करून त्याचे पुस्तक बनवावे असे मनात आहे. अशा प्रकारे प्रेक्षकश्रोते आणि वाचक अशा दोन गटांपर्यंत तर आपण पोहोचलो. पण अजून एक दस्तऐवज या उपक्रमादरम्यान तयार झाला आहे.ती म्हणजे शेतकरी मित्र-मैत्रिणींच्या गटाला हा ‘स्वाध्यायक्रम’ शिकवावा यासाठी नेमके काय करावे हे उलगडून सांगणारी प्रशिक्षण पुस्तिका.

स्वेच्छेने वाचण्या-पाहण्याचा (किंवा पाहण्या-वाचण्याचा) एक फायदा असतोच पण ‘जाणीवपूर्वक’ अभ्यास करण्याची एक पद्धत या ‘ट्रेनिंग मॅन्युअल’मध्ये आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषिगट, बचत गटातील महिला, कृषी क्षेत्रातले विद्यार्थी-प्राध्यापक आणि कृषी उद्योजक कंपन्या या सर्वांपर्यंत आपला अभ्यासक्रम सशक्तपणे पोहोचू शकेल.

शेतीबद्दलचा आत्मविश्‍वास खास करून तरुणांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये करीयर सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या एका तरुणाला कुटुंबातील एकाने घरातल्या पिढीजात शेतीव्यवसायाकडे वळण्याचा सल्ला दिला. ‘माझ्या लाइफस्टाइलसाठी असा तोट्याचा व्यवसाय नको' असा सूर त्याने लावला. यातले दोन शब्द महत्त्वाचे- लाइफस्टाइल आणि तोटा.

व्यक्तीच्या जगण्यामध्ये या दोन शब्दांच्या व्याख्या काय असतात त्यावर ‘उद्योजकता’ ठरते. एक तपाहून जास्त काळ लोटला. इंजिनियर होऊन ‘उत्तम’ नोकरी करणारा आकाश बडवे हा तरुण छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात पोहोचला. शहरी नोकरीमध्ये मन न लागल्यामुळे केंद्र सरकारच्या एका विकासवृत्तीच्या अंतर्गत दोन वर्षांसाठी तो दंतेवाडामध्ये पोहोचला.

Karta Shetkari
Masala Business : ‘टीएसजी’ ब्रॅण्डचा परराज्यांत विस्तार

आजही तिथेच कार्यरत आहे. पहिल्याच भेटीमध्ये त्याने भूसुरंग शोधणारी लष्करी वाहने दंतेवाडाच्या रस्त्यावर पाहिली तेव्हा त्याला ‘अवतार’ चित्रपटातील वाहने आठवली तसेच नक्षलग्रस्त भागातील अडचणींची कल्पनाही आली. ग्रामीण विकासाच्या विविध अंगांवर काम करताना हा तरुण रुळला आणि रुजला तो कृषी व्यवसायात.

आदिवासी शेतीकडे पाहतात ते फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर एक ‘सजीव’ नाते म्हणून. जंगल आणि शेती हे त्यांच्यासाठी एकाच सृष्टीचे अभिन्न भाग. दंतेवाडा हा जिल्हा ७१ टक्के आदिवासीबहुल, पण कुपोषणाचे प्रमाण ५७ टक्के जमीन भरपूर, जंगल दाट पण भूक, कुपोषण, गरिबी आणि बाजारव्यवस्थेचे शोषण या चार समस्या. नेमक्या याच प्रश्‍नांना उत्तर म्हणून अतिरेकी चळवळी जन्म घेतात. त्यामुळे या प्रश्‍नांचे योग्य असे उत्तर मिळते का, हा पुढचा प्रश्‍न. पण आठवड्याच्या बाजारामध्ये एक किलो चारोळीच्या बदल्यात एक किलो मीठ घेऊन जाणारी महिला आकाशने पाहिली.

सहकारी सेंद्रिय शेतीचा प्रयोग आकाश आणि सहकाऱ्यांनी सुरू केला. आज या शेतकरी सहकारी कंपनीचे नाव आहे ‘भूमगादी.’ भूमगादी हा स्थानिकांचा बैसाखी किंवा पोंगलसारखा उत्सव. आज जिल्ह्यातील १२० गावांतील साडेतीन हजार शेतकरी (पुरुष-महिला) या कंपनीचे भागधारक आहेत. ‘आदीम’ हा त्यांचा ब्रँड असून परंपरागत तांदूळ जातींची तीसहून अधिक उत्पादने ते विकतात.

त्यांचे एक तांदूळवाण तर काळ्या रंगाचे रोप आहे. अशा अनेक जाती त्यांनी विकसित केल्या. सोबत भात, ज्वारी, बाजरी ह्यांचे प्रोसेसिंग युनिट तयार केले. जंगली पदार्थ उत्तम चवीचे असतात हे सिद्ध करणाऱ्या ‘आदीम कॅफे’ची निर्मिती केली. या कॅफेचे मेनूकार्ड अतिशय प्रेक्षणीय आहे. लाल रंगाचा डोसा त्यात पाहायला मिळतो. (आकाशची मुलाखत आवाहन आयपीएच या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.)

महत्त्वाचे म्हणजे शेतकरी एकत्र येऊन शेतमालाचा भाव ठरवतात. या जिल्ह्यामधील रासायनिक खतांची खासगी दुकानेही बंद आहेत. सेंद्रिय शेतीला उत्तेजन द्यायचे तर रासायनिक शेतीला बांध घातले पाहिजेत हे तत्त्व शेतकऱ्यांनी २०१५ साली केंद्रीय कृषिमंत्र्यांसमोर तर २०१८ साली नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडले.

या कंपनीने स्वतःची नैसर्गिक खतप्रणाली तयार केली आहे. ‘3G’ हे त्यांचे एक लाडके उत्पादन. जिंजर, गार्लिक, ग्रीन चिली यांची ही प्रमाणित कृमीविरोधक ‘पेस्ट’ आहे. या साऱ्या प्रवासात आकाशला स्वतः मधला उद्योजक गवसला. उद्योजकता विस्तार पावते आहे. ‘लाईफस्टाईल’ची सही व्याख्या अनेकांना गवसते आहे आणि ‘नफा-तोट्याची’ गणिते आता वैयक्तिक परिघातून सुटून देशव्यापी बनू पाहत आहेत.

अशीच कहाणी आहे परभणी जवळच्या झरी नावाच्या गावातल्या कृषिभूषण मेघाआक्का देशमुखांची. त्यांचे माहेर म्हणजे कृषिभूषण कांताभाऊ देशमुखांचे घर. लाडाकोडात वाढलेली, बारावीपर्यंत शिकलेली थोरली लेक गावातल्या गावातच सासरी गेली. शेतकरी कुटुंबातली असूनही ती कधी प्रत्यक्ष शेतीत उतरलेली नव्हती.

ऐन विशीमध्ये प्रथम पतीचे निधन, त्यानंतर सासऱ्यांचा मृत्यू असे घाव सोसताना आक्काच्या मनाचा निर्धार होत होता. बहिणाबाई चौधरींची ‘गोंदण’ कविता तिच्या तोंडून ऐकताना अंगावर काटा येतो. पण आक्का ही कविता जगली. प्रथम पारंपरिक शेतीमध्ये उतरली. नंतर वडिलांच्या ‘विद्यापीठा’तील प्रशिक्षणातून पेरू, सीताफळे, लिंबू अशी पिके घेऊ लागली.

Karta Shetkari
Medicinal Plants : शेतकऱ्यांनी टिकवलेय औषधी पानपिंपळीचे अस्तित्व

“आमच्यात ‘वर्क फ्रॉम होम’ नसते. सारे जग कोरोना काळात घरी बंद होते, तरी आम्ही शेतावर होतो,” आक्का सांगत होती. शेतीतले प्रत्येक कौशल्य ती शिकली. “शेतकरी म्हटले की नेहमी ‘तोच’ का येतो तुमच्या नजरेपुढे?’’ आक्काने विचारले. मी तत्काळ आपल्या कर्ता शेतकरी मधल्या ‘अबोलीची बोली’ ह्या दोन भागांचे उदाहरण दिले.

तर गेल्या दोन दशकांमध्ये आक्काने साऱ्या शेतीचा पायापालट केला. पाण्याचे नियोजन केले, जमिनीचा कस वाढवला. आज साडेआठ हजारावर झाडांचे फलोद्यान बहरले आहे आणि आक्का आता स्वतःचे प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याच्या विचारात आहेत. अर्ध्या अर्ध्या किलोची ‘तगडी’ सीताफळे त्यांनी माझ्या हातात ठेवली.

या प्रवासात त्यांनी स्वतःचे बीए आणि एमए पूर्ण केले. मुलाचे शिक्षण करून त्याला पुढच्या प्रवासासाठी परदेशात पाठवले. महिलांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी संघटना बांधली. शिवणयंत्रांचे संच आणून महिलांचे केंद्र सुरू केले. ग्रामपंचायतीमध्ये त्या पंच बनल्या. एचआयव्हीग्रस्त बालकांना दत्तक घेतले आणि दिवसरात्र काम करताना अक्षरशः घाम गाळून कमावलेली ‘स्मितरेषा’ ढळू दिली नाही.

‘‘आज माझ्या सासरी आणि माहेरी प्रत्येक चांगल्या कामाचा मुहूर्त माझ्या हाताने होतो. पहिले औक्षण माझ्या हाताने होते. हा पाठिंबा नसता तर मी इथवर येऊ शकले नसते,” नम्रपणे आक्का सांगते. आपली दुःखे मनातच ठेवायची आणि तिथेच सोडवायची असतात असे सांगून आक्का म्हणाली, “सुखे मात्र मांडावी जगाच्या बाजारात. त्यांची तशीही किंमत फारशी नसते घराच्या चौकोनात . . .” आक्काशी गप्पा मारताना तिच्यातला बहिणाबाईचा वारसा उमगतो. ती सोज्वळ समज मनाला भिडते.

आकाश असू दे की आक्का... यांच्यामध्ये उद्योजकता मुळामध्ये होतीच अव्यक्त स्वरूपात. अद्वैत तत्त्वज्ञानात दोन शब्द आहेत. Potential आणि Manifest. बीजामध्ये अव्यक्त स्वरूपात झाड असते. झाड ‘व्यक्त’ होते तेव्हा त्यात फुले-फळे अव्यक्त स्वरूपात असतातच आणि फळ जेव्हा जन्म घेते तेव्हा त्यात लपलेले बीज असतेच.

उद्योजकता ही काही नव्याने तयार करायची ‘वस्तू’ नव्हे. ती गवसण्याची गोष्ट आहे. एकदा गवसली की तिचे मोल कळायला लागते. जगण्याची गणिते बदलायला लागतात. जीवनशैलीची आणि नफ्यातोट्याची सुद्धा.

आक्का म्हणते, की स्त्री स्वतःला भाजून घेते पण इतरांना मायेमध्ये भिजवते. आकाश म्हणतो की त्याला आता दंतेवाड्यात गेल्यावर ‘घरी’ आल्यासारखे वाटते. स्वतःबरोबरच इतर अनेकांच्या जगण्याच्या आकाराला नवे ऊकार देणाऱ्या अशा उद्योजकांच्या कहाण्या या मातीमध्ये रोज घडत आहेत. ही प्रक्रिया देशव्यापी व्हावी म्हणूनचे ‘सेंद्रिय खत’ म्हणजे ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम.

आता उद्योजकतेचा कस वाढविणारे हे साधन समाधानाने आणि विश्‍वासाने तुमच्या हातात दिलेले आहे. रामराम!

(या लेखमालेचे शब्दांकन करणाऱ्या माझ्या सहकारी शिल्पा जोशी आणि डॉ. सुवर्णा बोबडे, तसेच सह्याद्री फार्म्सचे सर्व सहकारी यांचे आभार.)

(समाप्त)

( लेखक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ आणि ‘आयपीएच’चे संस्थापक आहेत.)

anandnadkarni@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com