सुपारीच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी, चमचे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथील बागायतदार नीलेश सदानंद गावडे यांनी सुपारीच्या सुकलेल्या पानांपासून पत्रावळी, द्रोण, प्लेट आणि चमचे अशा पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती केली आहे. थर्माकोल, प्लॅस्टिकला सक्षम पर्याय देत त्यांनी या उत्पादनांना विविध शहरांमध्ये चांगली बाजारपेठ मिळविली आहे.
सुपारीच्या वाळलेल्या पानांपासून द्रोण, पत्रावळ्या व चमचे
सुपारीच्या वाळलेल्या पानांपासून द्रोण, पत्रावळ्या व चमचे
Published on
Updated on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथील बागायतदार नीलेश सदानंद गावडे यांनी सुपारीच्या सुकलेल्या पानांपासून पत्रावळी, द्रोण, प्लेट आणि चमचे अशा पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती केली आहे. थर्माकोल, प्लॅस्टिकला सक्षम पर्याय देत त्यांनी या उत्पादनांना विविध शहरांमध्ये चांगली बाजारपेठ मिळविली आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता. वेंगुर्ला) गाव भाजीपाला पिकांसाठी ओळखले जाते. इतरांच्या आधी आपला भाजीपाला बाजारपेठेत पोहोचवून चांगला दर पदरात पाडून घेण्याचे तंत्र गावाने तयार केले आहे. गावातील सबनीसवाडा येथे नीलेश सदानंद गावडे यांचे घर आहे. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले. संपूर्ण जबाबदारी आईवर आली. आईच्या खांद्याला खांदा लावून शेतीत काम करीत नीलेश यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मग मुंबई गाठली. तिथे कुणीही ओळखीचे नव्हते. संघर्ष करताना पुढे खासगी कंपनीत वितरण व्यवस्थापकाची नोकरी मिळवली. पगार व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता. त्यातूनही इलेक्ट्रॉनिक विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला. व्यवसायाचा परवाना मिळविला. गावी जावे, शेती, पूरक व्यवसाय करावा असे वाटायचे. इंटरनेटचा वापर करून त्यातील अभ्यास ते करीत. गावी तीन एकर शेती होती. पारंपरिक भातशेती होती. परंतु आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. शेतीतच करिअर सन २०१३ मध्ये नीलेश यांचा विवाह झाला. पत्नीशी चर्चा करून गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी हाती फक्त पाच हजारांची पुंजी होती. पालापाचोळ्यापासून कोळसानिर्मिती, काथ्या उद्योग अशा पर्यायांचा विचार डोक्यात सुरू होता. सुरुवातीला सौरऊर्जेवरील उत्पादनांची एजन्सी घेतली. त्या निमित्ताने अनेक गावांतून जाणे- येणे वाढले. घरच्या शेतात आंबा व काजूची झाडे वाढवली. आज ३०० ते ४०० काजू, तर १०० ते १५० पर्यंत सुपारीची झाडे आहेत. तिसऱ्या वर्षापासून कलमी काजूचे उत्पादन सुरू झाले. परंतु उत्पन्नाचे गणित अजून जुळत नव्हते. व्यवसायाला मिळाली दिशा कोळसानिर्मिती, काथ्या उद्योग हे खर्चिक व्यवसाय होते. त्या वेळी सुपारीच्या सुकलेल्या पानांपासून पर्यावरणपूरक साहित्य बनविता येते असे समजले. स्वतःबरोबर सुपारीच्या मोठ्या बागा भागात होत्या. त्यामुळे कच्चा माल सहज उपलब्ध होण्याची सोय झाली. व्यवसायाच्या अंगाने अधिक अभ्यास सुरू झाला. पत्रावळी, द्रोण, चमचे आदी उत्पादने तयार करण्याचे निश्‍चित केले. २०१८ मध्ये मंगळूरला जाऊन यंत्र खरेदी केली. चार प्रकारच्या वस्तू बनविता येतील असे साचे त्यात होते. घरापासून नजीक डिगवेवाडी येथे रस्त्यालगतची जागा भाडेतत्त्वावर घेतली. व्यवसाय विकास १) आजूबाजूच्या गावातील सुपारी उत्पादकांकडून पाने खरेदी करण्यास सुरुवात केली. मोठ्या आकाराच्या पानापासून १२ इंची पत्रावळ व अन्य उत्पादनांमध्ये नाश्‍त्यासाठी प्लेट्स, द्रोण आणि चमचे बनविणे सुरू केले. बाजारपेठ मिळविताना सुरुवातीला मेहनत घ्यावी लागली. थर्माकोल, प्लॅस्टिकच्या वस्तूंपेक्षा किमती अधिक होत्या. मात्र त्यांचे पर्यावरणपूर्वक महत्त्व व उपयोग व्यापारी व ग्राहकांना पटवून द्यावे लागले. निर्मितीत सुरुवातीला पानांचा साठा केला जातो. प्रक्रियेला आवश्यक पाने अर्धा तास पाण्यात ठेवली जातात. स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा तास वाळविली जातात. २) गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांमध्ये चांगली बाजारपेठ निर्माण केली. जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, देवगड या किनारपट्टीच्या आणि मोठ्या संख्येने पर्यटक येत असलेल्या शहरांमध्ये अशा वस्तूंना मोठी मागणी आहे. परदेशी पर्यटकांना विशेष आकर्षण या वस्तूंचे आहे.   ३) नीलेश व पत्नी नाजुका असे दांपत्यच बहुतांशी कामे करते. त्यामुळे मजुरबळावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी केला. शेतकऱ्यांकडील पानांच्या संकलनासाठी क्वचित प्रसंगी मजुरांची गरज भासते. वस्तू बनविल्यानंतर गुणवत्ता पुन्हा तपासण्यात येते. आकार कमी जास्त होणे, फाटलेल्या वस्तू बाजूला करून दर्जेदार वस्तूंचे पॅकिंग ही कामेही कुटुंबच करते. व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी

  • प्रति महिना सुपारीच्या सुमारे ४ हजार पानांवर प्रकिया
  • शेतकऱ्यांकडून प्रति पान ६० पैसे ते १ रुपया दराने खरेदी
  • उत्पादनांचे रिटेल दर प्रति युनिट
  • पत्रावळी- ७ रु.
  • द्रोण- २ रु
  • प्लेट- (दोन भाग असलेली)- ३ रु.
  • चमचा- १ रु.
  • उत्पादन खर्च- प्रति चार हजार पानांसाठी सरासरी साडेतीन हजार रु.
  • वार्षिक उलाढाल- सुमारे चार लाख, १६ हजार रु.
  • भांडवल स्वतः उभारले प्रकियेसाठीच्या यंत्राची किंमत साडेतीन लाख रुपये होती. वीज आकार, भाडेतत्त्वावरील जागा यासाठी आणखी तीस हजार रुपये खर्च होता. कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता नीलेश यांनी काही रक्कम स्वतः उभी केली. काही रक्कम नातेवाइकाने बिनव्याजी परताव्याच्या बोलीवर दिली. नीलेश आता आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत आहेत. कोरोना कालावधीत मोठा फटका बसला. त्यातून सावरत ते आणखी जोमाने कार्यरत आहेत. पानांचा साठा सुपारीचे एक पान महिन्याला गळून पडते. त्यामुळे कच्चा माल कमी प्रमाणात मिळतो. त्यातच किनारपट्टीचे तालुके वगळता सुपारीची लागवड कमी प्रमाणात आहे. पावसाळ्यात पानांची खूप कमतरता भासते. त्यामुळे त्या हंगामासाठी लागणारी पाने वाळवून त्यांचा साठा गोदामात करून ठेवला जातो. नीलेश गावडे, ९४०५४९६९६७, ७०३०७८६४४६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com