डॉ. सी. व्ही. धांडोरे
Fodder Management : चाऱ्याचे योग्य पचन होण्यासाठी गरज असलेली लाळ आणि पाचक द्रव्ये पाण्यापासून बनलेली असतात. पाणी चाऱ्याला कोठी पोटात भिजवून किण्वन प्रक्रियेस मदत करते. चाऱ्यातील घटक विरघळून ते रक्तामार्फत शरीरभर पोहोचविण्याचे आणि चाऱ्यातील न पचलेला भाग आतड्यातून बाहेर नेण्यासाठी पाणी मदत करते. पाणी कमी पडल्यास पचन क्रिया मंदावते आणि दुग्धोत्पादन घटते.
१) दूध तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. दुधात ८० ते ८५ टक्के पाणी असते. रक्ताभिसरण करून शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
२) शरीरातील विविध रासायनिकक्रिया तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीवाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
३) जनावरांना सुका चारा खाल्ल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे मुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पाहावयास मिळतो.
ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही अशा पशुपालकांनी बादलीला फ्लोट व्हॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून द्यावे.
४) स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचा हौद किंवा टाकी पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडी करून त्याला आतून चुना लावावा. त्यामुळे त्यात शेवाळ वाढणार नाही. पाणी थंड राहून त्यातून कॅल्शिअमचा थोडा पुरवठा होईल.
५) जनावरांच्या ओल्या चाऱ्यात ६५-८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.
त्यामुळे जनावरांनी ओला चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर ते कमी पाणी पितात. तर सुका चारा जास्त प्रमाणात खाल्ला तर जास्त पाणी पितात.
६) नवीन आणलेली जनावरे पाण्यातील बदलामुळे कमी पाणी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ टाकून पाणी पाजावे.
७) दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चार वेळा दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के जास्त दूध देतात.
८) उन्हाळ्यात जनावरांना मुबलक व योग्य तापमानाचे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. दूध देणाऱ्या गाईंना एक वेळ जरी कमी पाणी मिळाले, तरी त्यांचे २० टक्के दूध कमी होऊ शकते.
९) पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज वातावरणातील तापमानाच्या समप्रमाणात वाढते.
कारण बाष्पीभवनाद्वारे शरीरातून वाया जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होते. उदा. प्रति चौरस मीटर कातडीमधून २७ ते ४० सेल्सिअस तापमानाला प्रत्येक तासात अनुक्रमे २३ ते ४० मिलि पाणी बाष्पीभवनाद्वारे कातडीमधून शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जनावरांना दुप्पट पाणी लागते.
१०) अमोनियाची विषबाधा टाळण्यासाठी प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेल्या आहारावर जोपासलेल्या जनावरांना अधिक पाण्याची गरज असते. आहाराचा प्रकार स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असलेल्या आहारावर जोपासलेल्या जनावरांना अधिक पाणी लागते.
११) विषारी घटक लघवीद्वारे शरीराबाहेर टाकण्यासाठी विषबाधेपासून संरक्षणासाठी, विषारी घटकांचे प्रमाण अधिक असलेल्या आहारासोबत वाढीव पाण्याची आवश्यकता असते.
१२) पूरक खाद्यपदार्थ खुराकामध्ये मीठ, क्षारमिश्रण, युरिया, गूळ, प्रथिने, औषधी घटक व संप्रेरकाच्या वापरामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढते. पाणी अधिक प्यावेसे वाटते.
१३) पचन संस्थेच्या विकाराने आजारी असलेल्या जनावरांना अधिक पाण्याची गरज असते.
१४) शरीरामध्ये चार ते पाच टक्के पाणी कमी असेल तर जनावरांना अशक्तपणा जाणवतो तसेच भूक मंदावते आणि पंधरा टक्क्यांपेक्षा पाणी दर कमी झाले जनावरांचा मृत्यू ओढवतो.
१५) जनावरांनी अति प्रमाणात पाणी प्यायले तर आहार क्षमता कमी होते.
पातळ हगवण लागण्याची शक्यता अधिक असते. अन्नद्रव्यांची पाचकता कमी होते; परंतु तंतुमय पदार्थाची पाचकता वाढते. वारंवार लघवी होते. रक्तातील युरियाच्या प्रमाणात घट होते. हे लक्षात घेऊन आहारामध्ये हिरव्याऐवजी वाळलेल्या चाऱ्याचे प्रमाण वाढवावे.चारा, वैरण, खुराक देण्यापूर्वी सकाळी पाणी पाजू नये. वाळलेला चारा खाल्ल्यानंतर विश्रांतीपूर्वी पाणी पाजावे.
----------------------------------------------------
डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४
(पशुधन विकास अधिकारी, सांगोला, जि. सोलापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.