
संतोष मुंढे
Jalna News : जालना जिल्ह्यात सिरसगाव येथील तीघे भाऊ व आई-वडील असे कंकाळ कुटुंब एकजीव होऊन एकदिलाने शेतीत राबते आहे. म्हणूनच हंगामी व बहुविध पीक पद्धतीसोबत फुलशेती व शेडनेट शेतीतून कुटुंबाला प्रगती साधता आली आहे. अत्यंत कमी पाण्याचा पट्टा. मात्र एकेकाळी पाच एकर शेती असलेल्या या कुटुंबाने २१ एकरांपर्यंत शेतीचा विस्तार केला आहे.
जालना जिल्ह्यातील पारतुर तालुक्यात सिरसगावचे शिवार तसे अल्प पाण्याचे. याच गावातील
बबनराव आणि कुंताबाई कंकाळ हे दांपत्य राहते. पूर्वी त्यांच्याकडे बाजरी, ज्वारी, मूग अशी पिके असायची. त्यातून फारसं काही पदरात पडत नव्हतं. कोरडवाहू शेती असल्याने बागायती पिके घेणे शक्य नव्हते. बबनरावांच्या वडिलांना पाच एकर शेती सीलिंग कायद्यातून मिळालेली होती. त्यांनी कष्ट करून चार एकर शेती आणखी जोडली. बबनरावांनीही वडिलांप्रमाणेच शेतीतील उत्पन्नातून काटकसर करीत आणखी सहा एकर शेतीची जोड दिली. आज प्रल्हाद, हनुमान व नारायण ही त्यांची तीन मुले आई- वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
बहरली शेवंती, निशिगंध
शेतीची धुरा खांद्यावर आल्यानंतर तिघा भावंडांनी पीक बदलास सुरुवात केली. सर्वप्रथम पाण्याची शाश्वत सोय करण्याचे प्रयत्न सुरू केले. आज दोन विहिरी व शेततळे आहे. कापूस, सोयाबीन ही हंगामी पिके होती. आज फूलशेती हा कुटुंबाचा मुख्य आधार झाला आहे. शेवंती, निशिगंध व झेंडू ही मुख्य पिके आहेत. फुलशेतीचे क्षेत्र दोन एकर आहे. या शेतीत १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. मधली चार वर्षे पाणी नसल्याने फुलशेती थांबवली होती. मात्र शेततळे घेतल्यानंतर ही समस्या कमी झाली. उत्पादनाबाबत बोलायचे तर दररोज दोन क्विंटल शेवंतीची काढणी होते. वर्षभरात किलोला २० रुपयांपासून ते सणावारावेळी १०० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतात. निशिगंधाची दररोज ५० किलोपर्यंत तोडणी होते. त्यास ५० रुपयांपासून ते १००, १५० रुपये प्रति किलो दर मिळतो. त्याची सलग चार महिने तोडणी, त्यानंतर दोन महिने विश्रांती व पुढे चार महिने उत्पादन सुरू असे चक्र असते. झेंडूलाही प्रति किलो १० ते ५० रुपये दर मिळतो. गावातून अन्य शेतकऱ्यांचा माल घेऊन जाणाऱ्या वाहनातून छत्रपती संभाजीनगर, तर रेल्वेद्वारे नांदेड बाजारपेठेत पोहोचतो.
शेडनेट शेतीचा आधार
सिरसगाव पोकरा योजनेत आल्यानंतर कंकाळ कुटुंबाने शेडनेट उभारण्याचा (२०१९) निर्णय घेतला. त्यापूर्वी प्रल्हाद यांनी बारामती येथे कृषी विज्ञान केंद्रात जाऊन संरक्षित शेतीचे प्रशिक्षण घेतले. ‘ॲग्रोवन’मधील लेख तसेच यशकथांच्या रूपाने पिकांची निवड कशी करावी याबाबत दिशा मिळाली. आज दीड एकरात शेडनेट आहे. मिरचीची जानेवारी दरम्यान लागवड होते. एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. किलोला २० ते ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. वीस गुंठ्यांतील काकडीचीही जानेवारी- मार्चमध्ये लागवड असते. त्यास २० ते २५ रुपये प्रति किलो दर मिळतो. दोन्ही पिके काही लाखांपर्यंत उत्पन्न देऊन जातात. काकडीनंतर प्रसंगानुरूप शेडनेटमध्ये झेंडू लागवडीलाही प्राधान्य देण्यात येते.
अन्य पिकांची जोड
दोन एकरांत हळद असते. त्याचे एकरी ३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळ्यातील मागणी लक्षात घेऊन पाच वर्षांपासून जानेवारीत तीन एकरांत कलिंगड घेण्यात येते. त्याचे एकरी २० टन उत्पादन घेण्यात येते. बीटी कपाशीचे एकरी किमान १२ क्विंटल तर सोयाबीनची पारंपरिक पद्धतीने पेरणी करत एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते. पाण्याची उपलब्धता पाहून ऊस लागवडीला प्राधान्य देण्यात येते.
कुटुंब राबते एकजीव होऊन
शेतीत प्रल्हाद, हनुमान व नारायण, त्यांच्या पत्नी अनुक्रमे गोदावरी, कोमल व निकिता
व आई- वडील असे कुटुंबातील जवळपास आठ सदस्य शेतीत राबतात. त्यामुळे कुठलंही काम करण्यासाठी मजुरांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. गरजेनुसार महिला किंवा एखादा पुरुष मजूर ते कामास घेतात. मोठे आठजण व लहान पाच असे मिळून तेराजणांचे कुटुंब आज एकत्र नांदते आहे. संपूर्ण कुटुंब शेतीला प्राधान्य देत असल्याने वर्षाकाठी सुमारे दोन लाख रुपये निव्वळ मजुरीतून वाचतात. जे त्यांच्या अर्थकारणाला बळकटी देतात. तिघा भावंडांनी आपापली कामे वाटून घेतली आहेत. यात फुलशेती, शेडनेट शेती ही कामे प्रल्हाद तर यांत्रिकी कामे, ट्रॅक्टर चालवणे ही कामे अन्य भाऊ सांभाळतात. कुटुंबातील सर्व जण एकजीव होऊन काम करीत असल्याने आम्हाला प्रगती करणे शक्य झाल्याचे प्रल्हाद सांगतात. म्हणूनच व्यावसायिक पिके, शेडनेट करणे शक्य झाले. ट्रॅक्टर व बैलजोडी घेता आली. शेततळे उभारता आले. गावात घराचे बांधकाम झाले. शेतीला जोड म्हणून ट्रॅक्टरद्वारे इतरांच्या शेतीची कामे करण्याचा व्यवसायही केला जातो. शेतीकामांसाठी दोन बैल आणि दुधासाठी दोन गायी आहेत. पंधरा एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिघा भावंडांनी शेतीच्या विकासातून २०१८ पासून आतापर्यंत सहा एकर शेती घेतली आहे. आज कुटुंबाकडे एकूण २१ एकरपर्यंत शेती झाली आहे.
प्रल्हाद कंकाळ, ८८०६७१३८९४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.