Khed News : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ अंतर्गत कडूस (ता. खेड) येथे पाच मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला नुकतीच शासनाची मंजुरी मिळाली आहे. जिल्हा विद्युत नियंत्रण समिती सदस्य रवींद्र गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
भारनियमन व वीजटंचाईची समस्या शेतकऱ्यांना कायमच सतावत असते. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी तसेच भारनियमन व वीज टंचाईपासून शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासन ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’अंतर्गत ठिकठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभे करीत आहे.
त्याच अनुषंगाने कडूस येथे पाच मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात आणि दिवसा थ्री-फेज वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांची रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यापासून सुटका होणार आहे. तसेच बिबट्या व अन्य जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार आहे.
रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक भार होणे, यामुळे रोहित्र जळणे, बदली रोहित्र वेळेत उपलब्ध न होणे आदी कटकटीपासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. विजेअभावी पिकांचे नुकसान टळणार आहे. हा प्रकल्प कडूस परिसरात उभा राहण्यासाठी गावचे सुपुत्र व जिल्हा विद्युत नियंत्रण समितीतील खेड तालुक्यातील एकमेव प्रतिनिधी सदस्य रवींद्र गायकवाड यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले. गायकवाड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नुकतीच या प्रकल्पाला मंजुरी मिळविण्यात यश आले.
कडूस येथील महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर पानमंदवाडी येथील १० हेक्टर म्हणजेच २५ एकर गायरान जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. एक रुपया भाडे तत्त्वावर शासनाने ही जागा अधिग्रहीत केली आहे.
दरम्यान, वीज निर्मितीचा तिसरा पर्याय म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती. कडूसच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी रुपयांच्या माध्यमातून पानमंदवाडीच्या गायरानावर प्रकल्प उभा राहणार आहे. कडूससह बाजूच्या गावातील शेतकऱ्यांची दिवसा वीज पुरवठ्याची समस्या दूर होईल, असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.
कमी दराने होणार वीज उपलब्ध
शासनाकडून जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रत्यक्षात प्रकल्प उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पातून ५ मेगावॉट वीज निर्माण होणार असून, ही वीज परिसरातील शेतकऱ्यांसाठी कमी दराने व दिवसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कडुससह आजूबाजूच्या गारगोटवाडी, रानमळा, दोंदे, सायगाव, साबुर्डी, वेताळे आदी गावांना याचा फायदा होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.