
Yavatmal News : तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची परतफेड मुदतीत केल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दर आकारला जातो. मात्र जिल्हा बॅंकेने सेवा सोसायटींना पत्र पाठवित सहा टक्के व्याजदराने कर्जवसुलीचे निर्देश दिले आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर १३० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याज परतावा दिला जातो. त्यामुळे शेतकरी शून्य टक्के व्याजदराच्या योजनेस पात्र ठरतात. २०२३-२४ मध्ये शून्य टक्के व्याजदराने मूळ कर्ज रकमेची परतफेड करण्यात आली होती. आता मात्र बॅंकेकडून मुद्दलासह व्याजाची वसुली केली जाणार आहे.
त्यानंतर केंद्र आणि राज्याचा व्याज परतावा घेण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना किसान ऋण पोर्टलवर माहिती भरावी लागेल. या माहितीचा भरणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून व्याज सवलत योजनेचा परतावा मिळणार आहे. त्याच कारणामुळे जिल्हा बॅंकेने मुदलासह सहा टक्के व्याजासह कर्जाची परतफेड करण्याची सूचना काढली आहे. परंतु बॅंक तसेच शासनाच्या या धोरणाचा फटका मोठ्या संख्येतील कर्जदार शेतकऱ्यांना बसणार आहे.
यातूनच त्यांना अतिरिक्त १३० कोटी रुपये भरावे लागतील, असा आरोप जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष अमन गावंडे यांनी केला आहे. या तरतुदीचा पुनर्विचार व्हावा याकरिता बॅंकेने देखील शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशा आशयाचे निवेदन त्यांनी सहकार आयुक्त, पालकमंत्री, जिल्हा बॅंक अध्यक्षांना दिले आहे. शेतीमालाला दर नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब आहे.
त्याची दखल घेत कर्जमाफीचा निर्णय व्हावा, अशी देखील मागणी अमन गावंडे, राजकुमार पत्रे, नानाजी आगलावे, मधुकर जाचक, नरेंद्र कोवे, भानुदास ढोणे, सुरेश कोडापे, बाबूराव जिरापूरे, नितीन घोटेकर, प्रफुल्ल नागपुरे, पुंडलिक खोडे, भानुदास बावने यांनी केली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात २०१४-१५ या वर्षात सात हजार ३३१ शेतकरी सभासदांना ७३ कोटीं कर्ज वाटप केले. १८ फेब्रुवारीपर्यंत यातील १०६८ शेतकऱ्यांकडून केवळ १२ कोटी ३४ लाख ४६ हजार रुपयांची वसुली होऊ शकली. याची टक्केवारी १४ असल्याचे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.