
Nashik News : शासनाने पिवळ्या सोन्याला अर्थात मक्याला दोन हजार २२५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र मक्याच्या वाढलेल्या उपयुक्ततेमुळे खासगी बाजारातही भाव तेजीत आहेत. खासगी बाजारात मकाला २१०० ते २०४०० च्या दरम्यान दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली असून, बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडून मका विक्रीला प्राधान्य दिले जात आहे.
तालुका खरेदी-विक्री संघात पणन महासंघ व फेडरेशनतर्फे शासकीय हमीभावाने मका खरेदी सुरू आहे. यासाठी १५ डिसेंबर ही ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत असून, जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र एकाही मका उत्पादक शेतकऱ्याने शासकीय खरेदीसाठी नोंदणी केलेली नाही.
मक्यासाठी शासनाचा २ हजार २२५ रुपये हमीभाव असून बाजारात २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलला भाव असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी बाजाराकडे आहे.येथील खरेदी-विक्री संघावर एकानेही नाव नोंदवले नाही. त्याचवेळी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ५ डिसेंबरपर्यंत २ लाख ७४ हजार ४६८ क्विंटल मक्याची खरेदी झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी दिली. यावर्षी खरिपात तालुक्यात ४५ हजार ५७२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी मका पीक घेतले आहे.
विशेष म्हणजे पाऊस व हवामान पोषक असल्याने यंदा मक्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन ७० ते ९० क्विंटलपर्यत आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. बाजार समितीसह शहरात अंदरसूल, पाटोदा, नगरसूल परिसरात अनेक खासगी व्यापारीही मका खरेदी करत आहेत. या व्यापाऱ्यांकडेही मका खरेदीचे प्रमाण अधिक असल्याने लाखो क्विंटल मका खरेदी होत आहे.
शिवाय बागायतदार शेतकऱ्यांनी अजूनही खरिपातील काढून ठेवलेल्या मक्याच्या खळ्यावर पोळी घालून ठेवल्या आहेत. शेतीकामाची धावपळ संपली की हा मका तयार करून मगच शेतकरी विक्री करतील. त्यामुळे अजुनही लाखो क्विंटल मका विक्रीला येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.