Nashik News : कार्बन उत्सर्जन वाढल्याचा परिणाम ऋतुचक्रावर झाला आहे. या परिस्थितीत बांबू लागवडीशिवाय पर्याय नाही. काळाची गरज म्हणून शेतकऱ्यांनी आता उर्जा उत्पादक बनावे, असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
सटाणा येथे आत्मनिर्भर कृषी अभियानाअंतर्गत आरंभ खोरे गौकेंद्रित फेड प्रोड्युसर कंपनीतर्फे लाभार्थ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी बांबू रोपांचे वाटप व बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पटेल यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू कार्यशाळेचे अध्यक्ष होते.
याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा, प्रदीप बच्छाव, भाजपचे नेते पंकज ठाकरे, सुधाकर पाटील, भास्कर सोनवणे, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, अरुणकुमार भामरे, वन अधिकारी पी. बी. खैरनार, शिवाजी सहाने, तालुका कृषी अधिकारी भास्कर खैरनार, सहायक गटविकास अधिकारी आर. एम. सूर्यवंशी, अनिकेत सोनवणे आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले, की शेती करण्यासाठी मजूर टंचाई, वेळेवर पाऊस पडत नसल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे तापमान उच्चांक गाठत आहे. त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेतीत, नदी-नाले, पडीक जमिनीत शून्य खर्चातील बांबूलागवड केल्यास एकरी वर्षाला ४० टनांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. उसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपड्यापासून टूथ ब्रशपर्यंत आणि टोपी, चप्पल-बुटापासून ईथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. सध्या भारतात बांबूपासून १७०० प्रकारच्या वस्तू बनवल्या जात आहेत.
आमदार दिलीप बोरसे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नाशिक वनवृत्त समन्वयक भास्कर पवार, विनोद पाटील यांनी बांबूलागवड व पर्यावरणविषयी माहिती दिली. पटेल यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
बांबू लागवडीची चळवळ उभी करावी
कोळसा जाळण्यातून होणारे कार्बन उत्सर्जन बांबू जाळून थांबवले जाऊ शकते. याच्या हलचालीदेखील सुरू झाल्या आहेत. बांबूपासून इथेनॉल तयार करून तेच वाहनाचे इंधन म्हणून वापरले जाणार आहे. बांबूपासून इंधन निर्मितीचा पहिला प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या परिस्थितीत विविध प्रकल्प आणि हजारो वस्तू तयार करण्यासाठी करोडो टन बांबू लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बांबू लागवडीची चळवळ उभी करावी. बांबूला पाच हजार रुपयांपेक्षा अधिक टन भाव मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.