Pomegranate Farming : दुष्काळ हटला, मजुरी सुटली डाळिंबातून प्रगती झाली

Fruit Farming : कायम दुष्काळ, त्यामुळे एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्याची वेळ पात्रेवाडीच्या (जि. सांगली) ग्रामस्थांवर होती. आज याच शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीत आर्थिक प्रगती करण्याबरोबर गावाचे नाव उज्वल केले आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

अभिजित डाके

Pomegranate Fruit Crop : कायम दुष्काळ, त्यामुळे एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करण्याची वेळ पात्रेवाडीच्या (जि. सांगली) ग्रामस्थांवर होती. आज याच शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीत आर्थिक प्रगती करण्याबरोबर गावाचे नाव उज्वल केले आहे. त्यासाठी उपयोगी ठरली एकमेकांची साथ, चांगल्या गोष्टींचे अनुकरण. प्रगतशील शेतकऱ्यांकडे जाऊन तंत्र आत्मसात करणे, सिंचन व्यवस्था आणि जोडीला परिश्रम, चिकाटी, धाडस.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी या दुष्काळी तालुक्यात दक्षिणेला २२४ कुटुंबांचा पात्रेवाडी गाव आहे. दावणीला एक-दोन जित्राबं. खरीप, रब्बी हंगामातील कडधान्यं, ज्वारी, बाजरी ही पिकं. वर्षभर पुरेल इतकं धान्यही व्हायचं नाही. गावातील माळरानावर कुसळ आणि चिलारांची झाडं. दुसऱ्यांच्या शेतात मजुरीशिवाय पर्याय नव्हता. त्यातील पैशांवर रोजीरोटी चालायची. घरटी एक सदस्य मोठ्या शहरात जाऊन नोकरी करायचा. गावाकडं चार पैसे पाठवायचे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डाळिंब शेतीचा श्रीगणेशा

गावातील विष्णू देवकर, अनिल गायकवाड, किसन गायकवाड, श्यामराव पवार, विनायक
गायकवाड या मंडळींना वाटायचं, दुष्काळावर मात करून शेती कसली पाहिजे. आटपाडी तालुक्यात डाळिंबाचं क्षेत्र वाढू लागलं होतं. त्याचं अर्थकारण पात्रेवाडीतील शेतकऱ्यांना खुणावत होतं.
त्यातूनच १९९४-१९९५ च्या दरम्यान गणेश वाणाच्या लागवडीपासून गावात डाळिंब शेतीचा
श्रीगणेशा झाला. पाण्याची समस्या होतीच. पण वेळप्रसंगी ट्रॅंकरने पाणी देऊन शेतकरी बागा जगवत होते. पिकाचा अभ्यास होऊ लागला. चांगलं उत्पादन मिळू लागलं. आठ वर्षांत गाव बदलू लागलं होतं. सन २००३ मध्ये भयंकर दुष्काळ पडला. बागा काढण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : डाळिंबातून फुलले दुष्काळी गावाचे अर्थकारण

पुन्हा एकदा डाळिंब लागवड

रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव तयार करण्याची कामे अन्यत्र सुरू होती. आपल्याही गावात असे तलाव झाले, वरुणराजाची कृपादृष्टी झाली, तर पाण्याचा प्रश्‍न सुटेल याची जाणीव ग्रामस्थांना झाली.
त्यातूनच गावात रोजगार हमी योजनेतून तीन पाझर तलाव झाले. टेंभू योजनेचे पाणी तालुक्यात आले होते. सन २०१४-१५ च्या दरम्यान गावातही टेंभूच्या पाण्याची चाचणी यशस्वी झाली. आणि
पुन्हा एकदा फोंड्या माळरानावर कुसळाच्या जागी डाळिंबाच्या लागवडी सुरू झाल्या. अंकुश गायकवाड, भारत गायकवाड, तानाजी गायकवाड हे त्यात आघाडीवर होते.

गावच्या हाकेच्या अंतरावरच सांगोला तालुक्याची हद्द. इथली कोळे, चोपडी, अजनाळे ही गावे डाळिंबासाठी प्रसिद्ध झाली होती. आटपाडी तालुक्यातील शेतकरीही डाळिंबात मास्टर झाले होते. अशा शेतकऱ्यांकडे जाऊन पात्रेवाडीतील शेतकरी सुधारित तंत्रज्ञान आत्मसात करू लागले. एकदा ९ बाय ८ फूट अंतरावर लागवड केली खरी. पण मर रोगाची समस्या भेडसावू लागली. पण पुन्हा नवा अभ्यास, विचारमंथन व अनुभवांची सांगड घालून व्यवस्थापनात बदल केले.

Pomegranate Farming
Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

तंत्र केले आत्मसात

टेंभूचं हक्काचं पाणी झालं होते. पण शेतीला कायमस्वरूपी पाणी हवे
तर पाणीपट्टी वेळेत भरणे तितकेच
गरजेचे होते. आज त्या दृष्टीनेच शेतकरी एकत्र येऊन प्रत्येक आवर्तनाला चार बंधाऱ्यात पाणी घेतात. प्रत्येक आवर्तनाला बंधारे भरून घेतले जातात. त्यासाठी सुमारे ६० हजारांपर्यंत खर्च येतो.
क्षेत्र वाढले तसे गावातील मजुरांना गावातच वर्षभर काम मिळू लागले. डाळिंबाला अपेक्षित दर मिळत असल्याने पाहून त्यांनाही डाळिंब लागवडीची प्रेरणा मिळाली.

त्यामुळे दोन वर्षांत गावात ५० एकरांवर नव्याने डाळिंब लागवड झाली आहे. तडवळे येथील प्रगतशील शेतकरी विजय मरगळे तालुक्यासह परिसरातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना विना मोबदला मार्गदर्शन करतात. पात्रेवाडीतील शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून सल्ला घेण्यास सुरुवात केली. बहुतांश शेतकरी आगाप मृग बहर धरतात.

सेंद्रिय, जैविक व रासायनिक असा खतांचा एकात्मिक वापर करतात. फळांची विरळणी करण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी अवगत केले. वयानुसार प्रति झाडाला २० ते ३० किलो फळे
ठेवण्यास सुरुवात केली. पेपरच्या साह्याने फळांना ‘कव्हर’ करून ‘सन बर्निंग’सारखी समस्या
कमी होऊ लागली. फळाचा आकार, वजन, चकाकीपणा आणि डागविरहित उत्पादन हाती येऊ लागले.

डाळिंब उत्पादकांचे अनुभव

गावातील अनिल गायकवाड म्हणाले, की दर्जेदार डाळिंब पिकविण्यासाठी जसा अभ्यास हवा असतो तसा अभ्यास विक्रीच्या अनुषंगाने बाजारपेठांचा करावा लागतो. आम्ही तेच केले. काढणीच्या हंगामात कोणाच्या बांधावर कोणत्या राज्यातील व्यापारी आले आहेत, दर कसे आहेत आदींचा अभ्यास सुरू केला. व्यापाऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले. आज व्यापारी आमच्या बांधावर येऊन खरेदी करतात. केरळ, बांगलादेश, कोलकाता, दिल्ली, झारखंड राज्यांतील व्यापाऱ्यांना विक्री होते. आटपाडी बाजार समितीदेखील डाळिंबासाठी प्रसिद्ध बाजारपेठ झाली आहे.

बळिराम देवकर सांगतात, की वडिलांनी १९९४- ९५ च्या दरम्यान गणेश डाळिंब लावले. त्यातून कुटुंबाची आर्थिक प्रगती सुरू झाली. सन २००३ च्या दुष्काळात बाग काढावी लागली. वडिलांचे
कष्ट प्रत्यक्ष पाहिले होते. आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक एक डाळिंबाची जोपासना करतो
आहे. त्यातूनच जुन्या घराची दुरुस्ती केली. आता नव्या घराचे स्वप्न पाहतोय.

अंकुश गायकवाड सांगतात, की आमची साडेतीन एकर शेती. पाण्याअभावी शेती करणे मुश्कील होते. त्यामुळे ट्रॅक्टरचालक म्हणून वीस वर्षे काम केले. गावात डाळिंबाचे क्षेत्र वाढल्यानंतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मजुरी करू लागलो. त्यातून अभ्यास वाढत गेला. सन २०१७ पासून आता स्वतः पाऊण एकरांत डाळिंब लावले. दोन वर्षांपूर्वी क्षेत्र वाढवले आहे.

पात्रेवाडी गावातील डाळिंब शेती

-गावची लोकसंख्या- सुमारे १५००
-कुटुंब संख्या- २२४
-डाळिंब क्षेत्र- १७५ एकर
- एकरी उत्पादन- ८ ते १० टन.
- मिळणारा दर- ५०, ६० रुपयांपासून १०० ते १५० रुपये प्रति किलो
-गावचे डाळिंबातून उत्पन्न- अंदाजे ३ ते ४ कोटींहून अधिक

संपर्क ः अनिल गायकवाड, ९४२११७१५४२
बळिराम देवकर, ७७०९९०७९२०


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com