Amravati News : वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर शेडनेट, पॉलिहाउसमधील संरक्षित शेतीचा पर्याय फायदेशीर ठरणारा आहे. मात्र त्याकरिता हे तंत्रज्ञान आणि त्यातील पीकपद्धती याविषयी जाणून घेणे गरजेचे असून पूरक प्रशिक्षणावर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे तसेच कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. केव्हीके सभागृहात आयोजित या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच प्रमुख डॉ. करुणाशंकर सिंग, एमसीडीसी पुणेचे दिगंबर साबळे, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, सोमनाथ जाधव, प्रफुल्ल महल्ले, राहुल घोगरे यांची उपस्थिती होती. प्रमोद लहाळे यांनी पुढे बोलताना शेडनेट, पॉलिहाउस उभारणीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अपेक्षित सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमात बोलताना राहुल सातपुते यांनी जिल्ह्यात शेडनेट, पॉलिहाउस उभारणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगितले. ही बाब समाधानकारक असली तरी शेतकऱ्यांनी संरक्षित शेती पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या पिकांच्या लागवडीवरच भर दिला पाहिजे.
त्याकरिता बाजारपेठेचा विचार शेडनेट, पॉलिहाउस उभारणीपूर्वी करावा, असा सल्ला दिला. डॉ. करुणाशंकर सिंग यांनी केव्हीकेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध विस्तारविषयक योजनांची माहिती दिली. केव्हीकेमध्ये उपलब्ध सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.