Indian Agriculture :
आपल्या आहारामध्ये कंदवर्गीय पिकांचे महत्त्व
मोठे आहे. बटाटा, कांदा, गाजर, मुळा, आले, हळद, भुईमूग, रताळे, शुगरबिट आणि सुरण या सारख्या कंदाशिवाय आहाराची कल्पना करून पाहा. ही सर्व कंदवर्गीय पिके काढण्यासाठी जमीन खणणे आवश्यक असते. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी पिके उपटून किंवा कुदळीच्या साह्याने खणून काढत. मात्र त्या प्रक्रियेसाठी लागणारे मनुष्यबळ आणि कष्ट अधिक लागत असे. या कामांसाठी आता काही यंत्रे व औजारे विकसित झालेली आहेत. त्यांचा वापर केल्यास कामांची कार्यक्षमता तर वाढतेच, पण माणसांचे कष्ट कमी होतात.
मूळ - कंद खोदणी उपकरणाचे वर्गीकरण
अ) शक्ती स्रोतांनुसार
i) मनुष्य चलित : उदा. हाताची साधने आणि खोदण्याचे साधन उदा. कुदळ, खुरपे, फावडे इ.
बहुतांश शेतकरी म्हणतील, ‘‘यात काय नवीन सांगितले? आम्ही ही अवजारे वर्षानुवर्षे वापरतोच की!’’ हो, छोट्या क्षेत्रामध्ये आले, हळद आजही कुदळीने खोदूनच काढली जाते. मात्र पारंपरिक कुदळीमध्येही हळद, आले काढणीच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहे. कुदळीसारखे एकच अवजार सर्वत्र वापरले जाते. त्याची निवड करताना किंवा वापरताना आपण कोणती काळजी घेतो? तर सर्वसामान्य उत्तर असते की ‘‘काही नाही.’’ काम करणाऱ्या माणसाची उंची, ताकद आणि बैठे काम करण्याची क्षमता यासोबतच अवजारांची जडणघडण, वजन, दांड्याचा आकार, लांबी या सर्व बाबींचा परिणाम माणसाच्या कामांवर होत असतो. त्यामुळे अवजाराची निवड करताना वापरणाऱ्या व्यक्तीचा आणि उपलब्ध साधनांच्या वैशिष्ट्य़ांचा विचार केला पाहिजे.
शक्यतो उभे राहून काम करता येईल, असे अवजार निवडावे. कार्यक्षमता वाढते.
दांडा लाकडी असावा. म्हणजे हाताला घाम कमी येतो.
हात पकडण्याच्या ठिकाणी दांड्याच्या
व्यास ३२ ते ४० मिमी असावा. वापरणाऱ्याच्या मुठीत व्यवस्थित बसायला हवा. (अंगठा आणि मधील बोट टेकेल
असे.)
अवजारे भट्टीत तापवलेल्या पोलादापासून बनवलेली असावीत. ती अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात.
अवजार दांड्याला जोडणारा कान इंग्रजी ‘डी’ (D) आकाराचा असावा. म्हणजे दांडा गोल फिरणार नाही.
अवजाराला योग्य धार असावी. म्हणजे खणण्यासाठी ताकद कमी लागते.
काम पूर्ण झाल्यानंतर अवजारे स्वच्छ धुवून, पुसून, तेल लावून ठेवावीत. म्हणजे त्यांचे आयुष्य वाढते.
ii) पशुचलित अवजारे ः उदा. कांदे/बटाटा-कुळव, भुईमूग खोदणी अवजार इ.
बैलासारख्या पशूच्या साह्याने चालविण्याची अनेक अवजारे पूर्वापार वापरली जाते. त्यात बटाटा (कंद) खोदून ओळीत टाकले जातात. त्यासाठी अवजाराच्या दोन्ही बाजूला फाळ असणाऱ्या रिजर आणि मागच्या बाजूला लोखंडी सळ्या लावलेल्या असतात. मातीतून बटाटे काढून त्यावर चिकटलेली माती झाडली जाते. हे अवजार मोठ्या दांड्याला योग्य पद्धतीने जोडले गेले पाहिजे.
त्यासाठी दांडा रिजरसोबत योग्य कोनात असावा. म्हणजे अवजार एकसमान खोलीवर चालते. कंद काढणीची कार्यक्षमता वाढते.
iii) ट्रॅक्टर चलित उपकरणे
उदा. स्पिनर-खोदक यंत्र, खोदून-उचलणारे यंत्र, भुईमूग-खोदणी-शेकर-विंड्रोवर, शुगरबीट खांदणी यंत्र, गाजर व मुळा काढणी यंत्र (हार्वेस्टर) इ.
iv) स्वयंचलित यंत्रे
उदा. बटाटा-हार्वेस्टर/कम्बाइन, भुईमूग कंबाईन, शुगरबीट खांदणी यंत्र इ.
ब) शक्तीचलित यंत्राच्या जोडणी (हिचिंग) नुसार वर्गीकरण :
ओढली जाणारी अवजारे
आरोहित प्रकार
अर्ध-आरोहित प्रकार
स्वयं-चलित प्रकार
काढणीच्या प्रकारानुसार वर्गीकरण
थेट काढणी उपकरणे - ही उपकरणे जमिनीतील कंद खोदणे, वेगळे करणे आणि उत्पादने गोळा करण्याचे काम एकाच वेळी पूर्ण करतात.
अप्रत्यक्ष काढणी उपकरणे - संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शेतात यंत्रणा फिरवावी लागते. उदा. भुईमूग खोदणारा शेकर विंड्रोअर वेली खोदतो. माती हलविल्यानंतर एका ओळीत ठेवतो. वेली काही दिवस उन्हात वाळवल्या जातात. त्यानंतर वेली उचलण्यासाठी आणि शेंगा वेगळ्या करण्यासाठी पिक-अप जोडणीसह भुईमूग एकत्र केला जातो.
या उपकरणाच्या कार्यक्षम वापरासाठी...
(i) योग्य फील्ड लेआउट.
(ii) लागवडीची योग्य पद्धत.
(iii) काढणीच्या वेळी मातीची योग्य आर्द्रता.
(iv) काढणीपूर्व उपचार.
(v) खोदण्याच्या खोलीचे योग्य समायोजन.
(vi) यंत्राची योग्य जोडणी.
(vii) पिकिंग, कन्व्हेइंग आणि शेकिंग सिस्टिमच्या वेगाचे योग्य समायोजन.
(viii) शेत आणि पीक परिस्थिती लक्षात घेऊन, पुढे जाण्याच्या गतीची निवड.
(ix) एकाच वेळी सामग्री उचलण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी कामगारांची संख्या.
(x) वाहतूक आणि हाताळणीची अन्य उपकरणे हार्वेस्टरच्या क्षमतेशी जुळवून घेणे.
(xi) उपकरणांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती.
कंद मुळ पीक काढणी उपकरणे डिझाईन करण्यासाठी, खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.
अ) पिकाची विविधता आणि त्याच्या सांस्कृतिक पद्धती : सध्या वापरत असलेले वाण आणि अन्य व्यवस्थापन पद्धतींमुळे यांत्रिक कापणीमध्ये काही समस्या निर्माण होत असल्यास त्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ब) मातीचा प्रकार : कापणीच्या वेळी मातीचा प्रकार आणि आर्द्रता हे यंत्राच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. मातीमध्ये योग्य त्या सुधारणा करण्यासाठी योग्य घटकांचा समावेश मातीमध्ये करता येतो. त्यामुळे मातीचा पोत योग्य पातळीवर येतो. त्यामुळे ब्लेड सतत अडकणे आणि माती अडकल्याने येणारे अडथळे कमी होतात. मुळांच्या पिकांसाठी माती सहज वेगळे होण्यासाठी नाजूक असावी.
क) सिंचनाची पद्धत : एखाद्याने अवलंबलेल्या सिंचन पद्धतीचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. पिकाची पेरणी वरंब्याच्या बाजूवर/बेडवर/सपाट पृष्ठभागावर केली जाते, त्यानुसार सिंचनाची योग्य पद्धत निवडली पाहिजे. काढणीच्या वेळी मातीच्या योग्य आर्द्रता असावी. ते पाते जमिनीत घुसण्यासाठी आणि कार्यक्षमपणे माती-फोडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
कंदवर्गीय पिकांच्या काढणी उपकरणांचे आरेखन (डिझाइन) पुढील प्रमाणे असावे.
(i) खोदणाऱ्या यंत्राने कंद क्षेत्राच्या खाली असलेल्या वेलांना ७ ते १० सें.मी.च्या खोलीवर कापून टाकले पाहिजे. सर्व वेली उचलून माती झटकून टाकली जावी. त्यानंतर त्या वेली एकाच वेळी ओळीत ठेवल्या जाव्यात.
ii) मातीच्या कार्यरत आर्द्रतेवर पात्याचा प्रवेश शक्य असावा.
iii) खोदणाऱ्या यंत्राने सरळ वाढणाऱ्या आणि पसरणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या वाणांसाठी कार्यक्षमतेने काम केले पाहिजे.
iv) विद्यमान वाणांसाठी शेंगा तूट वाजवी असावी. (एका मर्यादेपेक्षा अधिक नसावी.)
v) ३० एचपी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरने ओढता येणारे यंत्र असावे.
vi) सुलभ वाहतूक आणि उत्तम हालचालीसाठी आरोहित
(उचलून नेण्यायोग्य) केलेले असावे.
वापरलेले ब्लेडचे प्रकार
खोदणाऱ्या यंत्रामध्ये तीन प्रकारचे ब्लेड सहसा वापरले जातात. त्यातही एकल (सिंगल पीस) वक्र पद्धतीच्या ब्लेडचा वापर अधिक केला जातो. बहुतांश वेळी एक सलग पीक किंवा एक सारखी माती नसल्यामुळे अर्ध पलटी (हाफ स्वीप) प्रकारच्या ब्लेडचा वापर शक्यतो टाळला जातो.
समायोजन आणि काम करण्याची पद्धत
चांगल्या कार्यक्षमतेसाठी यंत्राने काम सुरू करण्यापूर्वी समायोजन (कॅलिब्रेशन) केले पाहिजे.
पात्याच्या प्रवेशाची खोली गेज चाकांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरची वरची लिंक लांब किंवा लहान करून समायोजित केली जाते. साधारणपणे शेंगाच्या खाली सुमारे ४ सेंमी, किंवा पिकाच्या प्रकारानुसार ७.५ ते १२.५ सेंमी खोली पुरेशी असते.
शेकर कन्व्हेयरचे पुढचे टोक हँड लिव्हरच्या साहाय्याने समायोजित केले पाहिजे. त्यामुळे क्रॉस बारवरील स्पाइक जमिनीत जास्त खोल जाणार नाहीत. त्यांनी जमिनीच्या वरच्या बाजूस सुमारे ३ सेंमी वेचणी करावी अशी अपेक्षा आहे. दात आवश्यकतेपेक्षा खोलवर न चालवण्याची खबरदारी घ्यावी. कारण त्यामुळे शेकर कन्व्हेयरवरील भार वाढतो. वेलीपासून माती वेगळे करणे अधिक कठीण होते.
ट्रॅक्टरचा पुढे जाण्याचा वेग २.५ ते ३ किमी प्रतितास ठेवावा. शेकर कन्व्हेयरचा वेग ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याच्या वेगापेक्षा सुमारे १०% जास्त असावा. त्यामुळे निघत असलेले कंद किंवा शेंगा साचून न राहता साफ होऊन बाजूला पडल्या जातील.
यंत्र शेताच्या लांबीच्या बाजूने चालविली जावी. शक्यतो पिकाच्या ओळीची दिशाही तीच असल्यास वळताना किंवा फिरताना होणारा वेळेचा अपव्यय कमी होतो. शेताचा आकार शक्य तितका मोठा ठेवावा.
- डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,
(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.