Election Update 2024 : देशात लोकसभा निवडणुकाचा निकाल हाती आला यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रावर भाजप आणि काँग्रेस आघाडीकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे जनतेने घेतलेला निर्णय मतपेटीतून समोर आल्यानंतर धक्कादायक निकाल हातील आले.
यामध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात तयारी करून दणका बसला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी धोरणावर घेतलेले निर्णय उत्तर महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदीचा फटका भाजपला बसला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मताच्या माध्यमातून भाजपवर सपशेल नाराजी व्यक्त केली.
नाशिक दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघांमध्ये काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडीला ४ तर भाजपप्रणित 'एनडीए' भाजपला २ जागा मिळाल्या आहेत. यात सर्वांत चुरशीचा आणि उत्कंठावर्धक सामना धुळ्यात झाला.
नाशिकमध्ये विद्यमान खासदाराबद्दलची नाराजी, दिंडोरीत शेतकऱ्यांचा रोष, धुळ्यात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण, नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाबद्दलची अनास्था, जळगावमध्ये स्मिता वाघ यांना सहानुभूती आणि रावेरमध्ये रक्षा खडसे यांचे खणखणीत नाणे हे मुद्दे टर्निंग पॉइंट ठरले.
महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा मोठा पराभव केला. या पराभवामागे गोडसे यांच्या संदर्भातील सर्व स्तरातील नाराजी हा मोठा फॅक्टर ठरला. पहिल्या फेरीपासून राजाभाऊ वाजे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. भाजप लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय नसणे, हे देखील गोडसे यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. गिरीश महाजन यांच्यासारखे भक्कम नेतृत्व महायुतीला यावेळी पूर्ण क्षमतेने लाभले नाही.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना भोवली आहे. कोरी पाटी असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला. भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेचाही उपयोग झाला नाही.
धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. मुस्लिम मतांची मिळालेली एकतर्फी साथ ही डॉ. बच्छाव यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका भामरे यांना बसला.
धुळ्यात दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या हिना गावित यांचा काँग्रेसचे युवा आणि नवखे उमेदवार गोवाल पाडवी यांचा मोठा पराभव केला आहे. गोवाल यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. गावित कुटुंबावरील नाराजीचा फटका हिना गावित यांना बसला आहे.
जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांनी महाआघाडीचे करण पवार यांचा पराभव केला. या विजयामुळे उन्मेष पाटील यांच्या बंडखोरीचा परिणाम भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील समीकरणांवर झालेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. स्मिता वाघ यांना २०१९ मध्येही तिकीट जाहीर होऊन नंतर ते काढून घेण्यात आले होते. अभाविपच्या केडरमधील कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ यांनी ठेवलेल्या संयमाचे फळ त्यांना २०२४ मध्ये मिळाले.
भाजपच्या रक्षा खडसे या रावेरमधून तिसऱ्यांदा विजयी झाल्या. उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेले श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला. एकनाथ खडसे यांचे रावेरमधील वर्चस्व अधोरेखित झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.