Crop Insurance : पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक| शंभू सीमेवरील आंदोलन दोन दिवस स्थगित| राज्यात काय घडलं?

कापूस आणि तूर पिकांच्या पंचनाम्यासाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये घुसून आंदोलन केलं.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

कापूस आणि तूर पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक

कापूस आणि तूर पिकांच्या पंचनाम्यासाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये घुसून आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली. कापूस आणि तूर पिकाचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केले आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहावं लागतं, असा आरोप स्वभामिनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. पुन्हा पंचनामे करून पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलवर कापूस ठेवून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. 

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देण्याबाबत मंजूरी मिळाली आहे. राज्यात दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्यासाठी १ हजार ६७२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही दर तीन महिन्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा करतं. 

Crop Insurance
Cotton MSP : कापसाची हमीभावाने खरेदी केली नाही तर होणार गुन्हा दाखल ?|संयुक्त किसान मोर्चा दिल्लीत धडकणार?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार?

राज्यात २०२० ते २०२२ च्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना १०६ कोटी ६४ लाख ९४ हजार रुपयांची मदत वितरित करण्यासाठी महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. यामध्ये शेती पिकं आणि इतर मालमत्तेची नुकसान झालेल्यांना मदत देण्यात दिली आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, "प्रलंबित असलेल्या मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून या निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे संबंधित शेतकरी व बाधितांना दिलासा मिळेल,"असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. परंतु ही मदत तुटपुंजी असल्याचं शेतकरी सांगतात. तसेच बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावं लागेल, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. 

कांदा निर्यातबंदी विरुद्ध शेतकऱ्यांचा इशारा

३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार आहे, असं केंद्रीय सचिवांनी स्पष्ट केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी एकत्र येत सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच कांदा निर्यातबंदी उठवली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारनं ८ डिसेंबरपासून कांदा निर्यात बंद केली. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फक्त बसला. रविवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं जाहीर केलं. पण असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती केंद्रीय सचिव रोहित कुमार यांनी दिली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.

शंभू सीमेवरील आंदोलन दोन दिवस स्थगित

हरियाणा-पंजाबच्या सीमेवरील आंदोलन शुक्रवारपर्यंत मागे घेण्याचा निर्णय पंजाबचे किसान मजदूर मोर्चाचे सरचिटणीस श्रवण सिंग पंढेर यांनी घेतला आहे. खनौरी सीमेवर बुधवारी शुभकरण सिंग या पंजाबच्या शेतकऱ्यांचा पोलिस हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी हरियाणा पोलिसांनी पुन्हा अश्रुधारा नळकांड्या फोडल्या. त्यामुळे शंभू आणि खनौरी भागात तणाव निर्माण झाला. त्यामुळे आंदोलन आज आणि उद्या स्थगित करण्यात आलं आहे. त्याबद्दलची घोषणा श्रवण सिंग पंढेर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com