
Kisan Sabha : शेतकरी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी किसान सभेच्या वतीने नाशिक येथे गुरुवारी (ता.२६) शेतकरी महिलांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. शेतीमध्ये सर्वाधिक कष्ट शेतकरी महिला घेतात. परंतु त्यावर चर्चा होत नाही. या कष्टकरी महिलांच्या प्रश्नांना व्यासपीठ खुलं करून देण्यासाठी किसान सभेने परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत राज्यभरातील महिला सहभागी होणार आहे.
कृषी अरिष्ट, शेतीमालाची वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला रास्त भावाची मागणी, नैसर्गिक आपत्ती आदि विषयांवर चर्चा होत असते. परंतु महिलांच्या प्रश्ननांवर चर्चा होत नाही, त्यामुळे या परिषदेचं आयोजन केल्याचं किसानसभेने प्रसिद्ध पत्रकात सांगितलं आहे.
शेत जमिनीवर व राहत्या घरांवर महिला शेतकऱ्यांचा मालकी हक्क, महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला रास्त दाम, मोफत श्रमाला श्रम म्हणून मान्यता व त्याचा रास्त मोबदला, महिलांवरील अन्याय व अत्याचार, महिला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान व संशोधनाची आवश्यकता, व्यसन, हुंडा, बालविवाह, धार्मिक व जातीय शोषण व भेदभाव, स्वच्छतागृहाचा हक्क इत्यादी अनेक प्रश्न दुर्लक्षित केले जातात, यावर किसान सभा महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, असंही किसान सभेनं सांगितलं.
शेतकरी महिलांचे हे सर्व प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभेने पुढाकार घेतला असून शेतकरी महिलांच्या हक्क व अधिकारांचा उद्घोष करण्यासाठी या राज्यव्यापी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला शेतकऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न व हक्कांची या परिषदेत चर्चा होणार असून महिला शेतकऱ्यांच्या हक्क व मागण्यांची एक सनद या परिषदेमध्ये संमत करण्यात येणार आहे. परिषदेनंतर राज्यभर विविध जिल्ह्यांमध्ये या सनदेचे वाचन करणारे जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
किसान सभेच्या पुढाकाराने होत असलेल्या या परिषदेमध्ये ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या विविध संघटनांमधील महिला नेतृत्वांना आवर्जून आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेसाठी जनवादी महिला संघटना, सीटू ही कामगार संघटना, शेतमजूर युनियन, एस.एफ.आय. व डी.वाय.एफ.आय. या विद्यार्थी व युवक संघटना सहकार्य करत असून या संघटनांचे ग्रामीण भागात कार्यरत असलेले महिला नेतृत्व या परिषदेमध्ये सहभागी होणार आहे.
अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या परिषदेचे उद्घाटन करणार असून महिला शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या मकाम या संघटनेच्या नेत्या सीमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.