
Nashik News : शेतीच्या कामाच्या व्यापामुळे अनेक महिला शेतकऱ्यांना मनात इच्छा असूनही विठुरायाच्या भेटीसाठी वारीत जाता येत नाही; परंतु तीनशे किलोमीटर अंतरावरील सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील दिंडीत सहभागी झालेल्या सुमारे सहा हजार वारकऱ्यांना पुरणपोळीचे गोड जेवण देण्याची सेवा सारदे (ता. बागलाण) येथील शेतकरी महिलांनी गेल्या ४१ वर्षांपासून जपली आहे. विठुरायावरील आपली अनोखी निस्सीम भक्ती पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली आहे.
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांनी सुरू केलेली दिंडी माउलींच्या पालखी सोहळ्यातील दिंडी प्रसिद्ध आहे. विष्णू महाराज केंद्रे दिंडीचा समृद्ध वारसा अनेक वर्षांपासून जपत आहेत. ही दिंडी ज्येष्ठ कृष्ण द्वादशीला सासवडला मुक्कामी असते. एकादशीचा उपवास सोडण्यासाठी सारदे येथून पुरणपोळ्यांनी भरलेली पिकअप सासवडकडे रवाना झाली होती.\
संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव यांना बहीण मुक्ताबाईने सोपानदेवांच्या सासवड नगरीत पुरणपोळी खाऊ घातली होती. त्यामुळे पुरणपोळीच्या पाहुणचाराची परंपरा सुरू ठेवून सारदेकरांनी अनोखा भक्तिभाव जपला आहे. दरवर्षी नियोजनाप्रमाणे द्वादशीला दुपारचे जेवण पुरणपोळी (मांडे) व आमरसाचा स्वाद वारकरी घेतात.
दरवर्षी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सारदे यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातील महिला यात सहभागी होऊन आपापल्या घरातून पुरणपोळी बनवून गावातील राम मंदिरात जमा करतात. द्वादशीला सासवड येथे दुपारपर्यंत पोहोचून संपूर्ण दिंडीला मांडे भोजनाचे जेवण स्वतः वाढून कार्य सिद्धीस नेतात.
...अशी झाली सुरुवात
पूर्वी वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या वारीमध्ये गावातील महिला आणि पुरुष सहभागी होत असत. गावात प्रवचनासाठी आले असताना गोविंद महाराजांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले.त्यावेळी त्यांनी असे जेवण वारीत मिळाले तर किती छान होईल, असे सहज सांगितले.
त्यानंतर वारीत सहभागी होणाऱ्या महिला खापर आणि पुरणपोळीसाठी लागणारे साहित्य घेत सहभागी होत असत. मात्र वारकऱ्यांची संख्या आणि मांडे तयार करणाऱ्या महिला हे सूत्र जमत नव्हते. शेवटी भजनी मंडळाच्या सदस्य गावातच आदल्या रात्री मांडे तयार करून सासवड येथे थेट वाहनाने पोहोच करु लागले. गेल्या चाळीस वर्षांपासून अखंडपणे पुरणपोळीची परंपरा सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.