
Latur News : हडोळती (ता. अहमदपूर) येथील ज्येष्ठ शेतकरी अंबादास पवार यांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत पत्नी मुक्ताबाईच्या साह्याने पिकांची कोळपणी केली. त्यांचे हे चित्र वृत्तपत्रांसह विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले. बुधवारी (ता. दोन) पवार दाम्पत्याची सरकार दरबारी गंभीर दखल घेण्यात आली.
या बातमीवरून पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायातील आर्थिक विवंचनेची चर्चा घडून आली. ‘मोडला बैलबारदाना, मोडला नाही कणा’, या शिर्षकाखाली सकाळ अॅग्रोवनने मंगळवारी (ता. १) प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शेतकरी दाम्पत्याला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु झाला असून अनेकांनी शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवला आहे.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांचे कर्ज फेडण्यासोबत व बी-बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली. यासोबत अभिनेता सोनू सुद यानेही शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नाम फाउंडेशनने शेतकऱ्याच्या नातवाची निवासी शिक्षणाची जबाबदारी घेतली असून मावलगावचे शेतीनिष्ठ शेतकरी शरद पाटील यांनी एकबैली शेती औजारे देण्याचे कबूल केले आहे.
दरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यासोबत संपर्क साधून कृषी विभागाकडून लागेल ती मदत देणार असल्याचे सांगितले. कृषी विभागाकडून तातडीने खत व बियाणे देण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी बुधवारी शेतकरी दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना लागणाऱ्या मदतीची माहिती कृषी विभागाला अहवाल दिला. दोन दिवसांपासून अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे आपल्या शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेवून मशागत करत असल्याचे चित्र माध्यमांमधून प्रचंड व्हायरल झाले.
त्याची दखल घेत सहकारमंत्री पाटील यांनी बुधवारी शेतकऱ्याला फोन करून त्याच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती घेतली व त्यााच्या नावावरील चाळीस हजार रूपयांचे कर्ज भरण्याचे आणि त्यांना लागणाऱ्या बी-बियाणे यासाठी मदत करण्याची हमी दिली. पवार या वृद्ध दाम्पत्याकडे एकूण पाच कर जमीन आहे. ती जिरायत आहे. गेली दहा वर्षांपासून ते बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेत शेती करतात, असे त्यांनी सांगितले. आता वृद्धावस्थेत शेती करणे अवघड झाले आहे.
मुलगा पुण्याला कोठेतरी खाजगी नोकरी करतो, असे त्यांनी सांगितले व बैल बारदाणा करणे किंवा शेती करणे परवडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सहकार मंत्री पाटील यांच्याशी बोलत असताना पवार यांनी आमच्यावर असलेले कर्ज भरा व बी-बियाणे यासाठी मदत करा. तसेच आमच्या मुलांना नोकरीसाठीही प्रयत्न करा, अशी विनंती केली. कृषीमंत्री कोकाटे यांना बोलतानाही पवार यांनी कर्जमाफी देण्यासोबत शेतीमालाला चांगला भाव देण्याची मागणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.