
Environmental Awareness: समाजातील व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी कार्यकर्त्यांचे अस्तित्व आणि त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण कोणतीही व्यवस्था केवळ नियमनाने सुरळीतपणे चालत नाहीत. ती व्यवस्था मानणारे आणि तिला पाठबळ देणारे लोक असतील तरच ती ठीकठाक चालू शकते. निसर्ग-पर्यावरण, आरोग्य-स्वास्थ्य किंवा सार्वजनिक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक ठरतात. केवळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींमुळे नव्हे, तर या कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच ते शक्य बनते. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांच्याविना मोठी पोकळी निर्माण होते.
साताऱ्याचा वैभव ‘भवताल’शी कसा जोडला गेला हे समजलंच नाही. माझ्या आठवणीनुसार, कोविडचा काळ होता. संपूर्ण देश टाळेबंदी (लॉकडाउन) अनुभवतच होता. कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. त्या वेळी लोकांपुढे ऑनलाइन पद्धतीने निसर्ग-पर्यावरण विषयक चांगले काही मांडता येईल का, असा विचार मनात आला. त्यातूनच फेसबुक लाइव्ह सुरू केले. हवा, पाणी, दगड-माती, निसर्ग, पर्यावरण असे अनेक विषय घेऊन सलग पंधरा दिवसांचे लाइव्ह होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि अनेक लोक आमच्या ‘भवताल’ या पर्यावरण मंचाशी जोडले गेले.
त्यातून पुढे ५ जून २०२१ या ‘पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पर्यावरणीय संवाद साधणारा ‘भवताल कट्टा’ हा ऑनलाइन कार्यक्रम सुरू झाला. पर्यावरणाच्या विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी मांडणी करायची आणि त्यात भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने लोक सहभागी व्हायचे. इतर राज्यांमधून आणि काही वेळा परदेशातून सुद्धा काही जण सहभागी व्हायचे. हा कट्टा जाहीर करताना त्या विषयाबद्दल प्रश्नमंजूषा जाहीर केली जायची. त्याची जबाबदारी वैभवने घेतली होती. असे करत करत तो ‘भवताल’ मध्ये इतका सामावून गेला की आता ‘भिजूया - मोजूया’ या अतिशय महत्त्वाच्या उपक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी त्याच्याकडे आहे.
ही जबाबदारी छोटी नाही. लोकांसाठी हा कार्यक्रम आखणे, टीममधल्या इतरांशी समन्वय साधणे, वेबसाइट टीमच्या संपर्कात राहणे, सहभागींना सतत काही ना काही नवे द्यावे लागते, नाही तर त्यांचा रस कमी होतो... असे बरेच काही. बरं, त्याने ही जबाबदारी का स्वीकारली? त्याला त्यातून कसलाही आर्थिक मोबदला मिळत नाही. उलट वेळ जातो, धावपळ होते, या कामानिमित्त फिरायचे झाले तर पदरचे पैसे खर्च करावे लागतात. तरीसुद्धा तो हे करत असतो, अगदी मनापासून आणि आनंदाने!
‘भिजूया - मोजूया’ या उपक्रमाचे फलित असे की त्यातून लोकांमध्ये पाऊस, पाणी व भवतालाविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत आहे. अनेक लोक स्वत:च्या राहत्या ठिकाणाजवळ पाऊस मोजत आहेत. पाण्याचे मोजमाप करत आहेत, अवतीभवतीच्या निसर्गाचे निरीक्षण करत आहेत. नागरिकांनी केलेल्या उपक्रमातून विज्ञानाचा प्रसार कसा होतो आणि होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्याचे सर्वांत मोठे यश म्हणजे- पर्जन्यमापक, त्यामागचे विज्ञान याबद्दल असलेला क्लिष्टपणा आणि दुरावा संपला. आणि हे कोणीही करू शकते हे लोकांना उमगले. शिवाय, ही कृती नागरिकांनी सामूहिकरीत्या करायची असल्याने एकमेकांच्या भागातील माहिती आपोआपच मिळायला लागली. आता हा उपक्रम मोठ्या पातळीवर राबविण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामागे अनेकांचे कष्ट आहेत, त्यात वैभवची भूमिका खूपच महत्त्वाची आहे.
‘माझा’ही क्रियाशील सहभाग हीच भावना
‘भवताल’च्या गेल्या १० वर्षांच्या प्रवासात वैभवप्रमाणेच अनेक कार्यकर्ते भेटले, अजूनही भेटत आहेत. काही आठवणारी नावं म्हणजे- पुण्याचा अमर, वनिता, राधिका, शताक्षी, निवेदिता, मुंबईचे अभिजित, धाराशिवचा पुष्कर, अहिल्यानगरचे संजय, छत्रपती संभाजीनगरच्या जयश्री, नेल्लोरच्या आदिती, साताऱ्याच्या प्राची, पालघरचे किशोर... खरं तर ही अगदीच प्रातिनिधिक नावे आहेत. असे कितीतरी कार्यकर्ते भेटत गेले आणि गोष्टी पुढे सरकत गेल्या. यापैकी कोणीही मोबदल्याच्या अपेक्षेने सहभागी झाले नव्हते, तर पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचे आतून वाटत होते म्हणून ते यामध्ये भाग घेत होते. त्यामुळेच अनेक गोष्टी पुढे सरकल्या.
हे केवळ ‘भवताल’ बद्दल नाही, तर सर्वच संस्था, गट, क्षेत्र यामध्ये पाहायला मिळतात. अनेक कार्यकर्ते निरपेक्षपणे आपले काम करत असतात. ते नेटाने पुढेही नेत असतात. त्याचा कोणताही गाजावाजा नसतो, हे सारे शांतपणे सुरू असते. त्यांना त्यातून पैसा, प्रसिद्धी, मानमराबत अशी कोणतीही अपेक्षा नसते. अवतीभवतीच्या व्यवस्था किंवा आपला भवताल नीटनेटका राहावा आणि त्यात माझाही क्रियाशील सहभाग असावा, ही त्यामागची भावना. त्या दृष्टीने अनेक जण अनेक गोष्टी करत असतात.
कोणी कचरा निर्माण होऊ नये म्हणून स्वत:ची पिशवी, पाण्याची बाटली, चहा पिण्यासाठी मग जवळ बाळगतात. कोणी इंधनाच्या बचतीसाठी स्वत:च्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतात. कोणी, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून सिग्नल मिळेपर्यंत शांतपणे वाहने थांबवून उभे राहतात. कोणी, माती-पाण्याच्या संवर्धनासाठी काम करतात, कोणी, आदिवासी-ग्रामीण भागात आरोग्यासाठी काम करतात. कोणी, आठवड्यातील काही वेळ पर्यावरणाच्या कामासाठी देतात. काही, त्या दृष्टीने आवश्यक त्या जबाबदारी स्वीकारतात... असे बरेच काही.
हे सारे करताना, आपण जगाच्या कल्याणासाठी हे करत आहोत, असा आविर्भावही नसतो. एखादी व्यक्ती, संस्था, संघटना, गट, मंडळ यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनेनुसार काम करत राहणे आणि त्या संबंधित गटाचे कार्य पुढे कसे जाईल, त्याला आपला हातभार कसा राहील याची मनोभावे जबाबदारी उचलणे, हा या कार्यकर्त्यांचा स्वभाव.
समाजातील व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे अस्तित्व आणि त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण कोणतीही व्यवस्था केवळ नियमनाने सुरळीतपणे चालत नाहीत. ती व्यवस्था मानणारे आणि तिला पाठबळ देणारे लोक असतील तरच ती ठीकठाक चालू शकते. म्हणूनच तर, वाहतूक नियम पाळून सिग्नलला थांबणारे एखादे वाहन असेल तर तो तोडून जाणाऱ्या इतरांची संख्या कमी होते. मात्र, अशी व्यक्ती नसेल तर सर्वच जण सिग्नल तोडून जातात आणि अपघात, वाहतुकीची कोंडी यांना आमंत्रण देतात. हे सर्वच बाबतीत पाहायला मिळते. ‘मला काय त्याचे...’ अशी वृत्ती वाढत असताना काही जण वैयक्तिक जबाबदारी पाळतात आणि त्यानुसार कृती करतात. हेच खरे कार्यकर्ते.
ओडिशा राज्यात पुरीच्या यात्रेत जगन्नाथाचा भला मोठा अवजड रथ ओढण्याची प्रथा आहे. तो ओढण्यासाठी हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य लोक उपस्थित असतात. त्यांना कोणताही विशिष्ट चेहरा नसतो. कोणीही कितीही मिरवले तरी या बिनचेहऱ्याच्या लोकांच्या ताकदीमुळेच रथ ओढणे शक्य होते. निसर्ग-पर्यावरण, आरोग्य-स्वास्थ्य किंवा सार्वजनिक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सुद्धा असेच प्रयत्न आवश्यक ठरतात. केवळ नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींमुळे नव्हे, तर या कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच ते शक्य बनते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांच्याविना मोठी पोकळी निर्माण होते.
आजची शोकांतिका अशी, की एकीकडे समाजातील समस्या वाढत आहेत आणि दुसरीकडे विविध कारणांमुळे असे कार्यकर्ते निर्माण होणे कमी झाले आहे. एखाद्या साध्या समस्येवर हितसंबंधांच्या पलीकडे तोंड उघडून बोलणेही होत नाही, तर मग त्याच्याबद्दल कृती करणे ही दूरचीच गोष्ट. असे कार्यकर्ते अजिबातच नाहीत असे नाही, पण निष्क्रिय मंडळींची संख्या पाहिली तर यांचे प्रमाण कमी झाले आहे, हे निश्चित. हे वास्तव सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने परवडणारे नाही. जे विभाग, प्रदेश, देश पुढे गेले आहेत, त्यांच्यामध्ये अशी कार्यकर्ता वृत्ती हमखास पाहायला मिळते. परदेशात किंवा इतर प्रदेशात असे काही पाहिले, की आपण तिथली उदाहरणे तोंडभरून ऐकवतो. पण तेच आपल्या भवतालात करण्याची वेळ आली की हात आखडता घेतो... असे का?
म्हणूनच, आजपासूनच सुरुवात करू आणि छोट्या छोट्या कृती करण्यासाठी आपल्यातला कार्यकर्ता जागा करू. आपल्या अशा कृतिशील होण्याने निश्चितच बदल घडेल; समाधानाची गोष्ट म्हणजे, त्यात आपलाही खारीचा वाटा असेल!
abhighorpade@gmail.com
(लेखक वरिष्ठ पत्रकार असून ‘भवताल’ या पर्यावरण विषयक मंचाचे संस्थापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.