Flood Crop Damage : पुराच्या पाण्याने कोट्यवधींचे नुकसान

Kolhapur Flood : गेल्‍या वीस वर्षांपासून शिरोळ तालुक्याला शाप असलेला महापूर आता सवयीची बाब झाला आहे. शिवारातील पाणी मागे जाऊ लागले आहे, तसे महापुराने केलेले नुकसान दिसू लागले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : उसासह खरीप पिके, भाजीपाल्याचे झालेले अपरिमित नुकसान पुढील कित्येक वर्षेही भरून निघणारे नाही, अशी स्‍थिती यंदाच्या पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात आहे. पाणी न रोखता येण्याची हतबलता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. तर पुढे काय याचे भले मोठे प्रश्न चिन्ह शेतकऱ्यांसमोर उभे आहे.

गेल्‍या वीस वर्षांपासून शिरोळ तालुक्याला शाप असलेला महापूर आता सवयीची बाब झाला आहे. शिवारातील पाणी मागे जाऊ लागले आहे, तसे महापुराने केलेले नुकसान दिसू लागले आहे. जिवापाड जपलेल्या पिकांची दुर्गंधी व्यथित करते. असे किती दिवस, ही चिंता प्रश्नचिन्ह निर्माण करते.

पूर आल्याचे दुःख नाही पण सतरा ते अठरा दिवस शिवारात राहिलेले पाणीच शेतकऱ्यांना उद्विग्न बनवते. पाण्याची शिवारात वाढलेली वस्ती यंदा पिकांचे शंभर टक्के नुकसान करण्‍यास कारणीभूत ठरली आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरु केले असले तरी तोकड्या नुकसानभरपाईमुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.

पाऊस सुरु झाला की कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्‍ह्यांतून येणारे सर्व पाणी पंचगंगा, कृष्णा वारणा नद्यांना येते. हे पाणी कर्नाटकात प्रवेश करायच्या आधीच शिरोळ तालुक्‍यातील गावांतील शिवारांना गिळंकृत करते. ऊस भाजीपाला पिके घेत दिमाखाने मिरवणारा शिरोळ तालुका अनपेक्षितपणे आणि असाह्यपणे कोलमडतो.

Crop Damage
Kolhapur Flood : पाण्यामुळे पिके कुजू लागली

यंदाही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरवात केली आणि नेहमीप्रमाणे तालुक्यातील शेती पाण्याखाली जाऊ लागली. नद्यांचे पाणी तासाला एक इंचा प्रमाणे वाढत होते. तसतशी हळूहळू उसासह अन्य शिवारातील शेती पाण्याखाली जात होती.

शेतकऱ्यांनी धोकादायक परिस्‍थितीतही चारा पिकांची कापणी करत शक्य तितके नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी हतबल होऊन हे प्रयत्नही सोडून दिले. तालुक्यातील राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, बस्‍तवाड अकिवाट आदी गावे सर्वाधिक नुकसानीची. या गावांना नद्यांचा चहूबाजूंनी वेढा पडला.

पिकांच्या अवशेषामुळे खिन्नता

गेले पंधरा दिवस ही गावे बेटेच झाली होती. आता पाणी ओसरत आहे, पण सगळी रया सोडून जात आहे. राडीने माखलेला ऊस, भाजीपाला पिकांच्या मंडपांचा सांगाडा, खरीप पिकांचे राहिलेले केवळ अवशेष मन हेलावून टाकतात. अनेक शिवारांमध्ये आणखी दहा-बारा दिवस तरी जाण्याची परिस्थिती नाही.

केळीचे वैभव जपणारे खिद्रापूर, अकिवाट याच बरोबर ऊस, भुईमुगात अग्रेसर असणारी राजापूर, राजापूरवाडी या गावातील नव्‍वद टक्क्यांहून अधिक शेती पंधरा दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली होती. यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजूनही काही शिवारांमध्ये पाणी साचून आहे. यामुळे वाफसा स्‍थिती येण्यास आणखी पंधरा दिवस जातील, अशी शक्यता आहे.

Crop Damage
Kolhapur Flood : महापुराने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला; ३३ टक्के पिकाचे नुकसान, आता मदतीची प्रतिक्षा?

शेत स्वच्छतेसाठीही रक्कम नाही

अनेक खरीप पिकांना शेतकऱ्यांनी एकरी ३० ते ५० हजार रुपये खर्च केला आहे, पण तो खर्च कसा काढायचा असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. शेतातील खराब पिके काढण्याचाही खर्च निघणार नाही इतकी मिळणारी तुटपुंजी भरपाई शेतकऱ्यांना हतबल करते.

प्रशासनाने प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शेतात जाऊन पंचनामे होत आहेत. पण किती आणि कधी रक्कम मिळणार याचे उत्तर पंचनामे करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांपुढेही नाही. पाणी ओसरले खरे पण आता त्या शेतात काय घ्‍यायचे हा प्रश्नही त्यांना भेडसावतोय.

शासकीय उदासीनतेमुळे संताप

पुराचे पाणी वाढत असतानाही शासकीय उदासीनता दिसून आली. केवळ गावातील लोकच एकमेकांचा आधार बनून राहिले. केवळ सूचनांचे शासकीय सोपस्कर पार पाडण्यात आले. पण कुणीही लोकप्रतिनिधी गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र पूरग्रस्त भागात आहे.

शिरोळ तालुक्यातील पाण्याखालील क्षेत्र ः १६ हजार हेक्टर

अंदाजे नुकसान ः १०० कोटी

नुकसानग्रस्त प्रमुख पिके ः ऊस, भुईमूग, केळी, भाजीपाला

माझा एक एकर कोबीचा प्लॉट होता. उत्पादन सुरू झाले आणि पाणी शिवारात आले. एक-दोन दिवसांत पाणी उतरले असते तर नुकसान कमी झाले असते पण पंधरा दिवस पाणी असल्याने हातातोंडाशी आलेला प्लॉट गेला. हे नुकसान नेहमीचेच झाले आहे. प्रत्येक वर्षी कोणते पीक घ्यायचे हेच आम्हाला समजेना झाले आहे.
- इब्राहिम खान मोकाशी, खिद्रापूर.
मी यंदा भुईमुगाचे पीक घेतले होते. पण पाणी आले आणि चांगले आलेले पीक बुडून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
- अभिनंदन नरवाडे, खिद्रापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com