Grape Export : द्राक्ष निर्यातीच्या दिरंगाईमुळे निर्यातदार अडचणीत

Grape Market : सुएझ कालव्यामार्गे प्रामुख्याने युरोपात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवर इस्राईल व हमास युद्धाचा परिणाम दिसून आला.
Grape Export
Grape ExportAgrowon

Nashik News : सुएझ कालव्यामार्गे प्रामुख्याने युरोपात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवर इस्राईल व हमास युद्धाचा परिणाम दिसून आला. परिणामी, वाहतूक मार्गात बदल झाल्याने निर्यात अंतर वाढल्याने १८ ते २२ दिवसांचा कालावधी ३० ते ३५ दिवसांपर्यंत जाण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० दिवसांपर्यंत वेळ लागल्याने डोकेदुखी वाढली आहे. निर्यातीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी अधिक लागल्याने द्राक्षांची गुणवत्ता, टिकवणक्षमता व प्रतवारीवर परिणाम झाला.

भाडेवाढ, गुणवत्तेचा प्रश्‍न व दराचा फटका या तीन प्रमुख अडचणी सर्वच निर्यातदारांच्या पातळीवर कमी-अधिक प्रमाणावर आहे. यामागे शिपिंग लाइनने शब्द देऊनही वेळेवर द्राक्ष न गेल्याने कंटेनरमागे ३.५ ते ४ लाखांवर नुकसान झाल्याची ओरड द्राक्ष निर्यातदारांची आहे. जानेवारी महिन्यात द्राक्ष निर्यात सुरू झाल्यानंतर प्रतिकंटेनर भाडे १,५०० ते १,८०० डॉलरपर्यंत होते. मात्र इस्राईल-हमास युद्धादरम्यान निर्यात करणाऱ्या जहाजांवर हल्ला झाल्यानंतर सुएझ कालव्यामार्गे समुद्री वाहतूक बंद झाली.

Grape Export
Grape Export : युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना वाढती मागणी ; निर्यातीत १० टक्क्यांची वाढ

त्यानंतर मार्गात बदल करून शिपिंग कंपन्यांनी दक्षिण आफ्रिकेमधील केप ऑफ गुड होपमार्गे वाहतूक सुरू केली. मात्र त्यानंतर जहाजांची उपलब्धता मर्यादित असल्याचे सांगत कंपन्यांनी कंटेनरमागे २,७०० ते ३,२०० डॉलर इतकी भाडेवाढ झाली. लागणारा वेळ व वाहतूक भाडे हा फटका होताच.

त्यात पूर्वीपेक्षा वेळ अधिक लागेल याचीही पूर्वकल्पना होती. मात्र जहाज कंपन्यांनी त्यापेक्षा अधिक वेळ लावल्याने दिलेल्या शब्दापेक्षा निर्यातीला दोन आठवड्यांचा कालावधी अधिक लागल्याची ओरड आहे. त्यामुळे मालाचे नुकसान झाल्याने दर पडले. अशा तीनही गोष्टींमुळे नुकसान सोसण्याची वेळ आल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. सध्या निर्यातदार तणावात असून ३० ते ४० टक्के फटका बसण्याची शक्यता आहे.

Grape Export
Grape Farmer Fraud : द्राक्ष उत्पादकांची ३६ लाखांची फसवणूक करणारे दोघे अटकेत

...ही झाली अडचण

केप ऑफ गुड होपमार्गे द्राक्ष निर्यात प्रक्रियेला १८ ते २२ दिवसांच्या वेळेपक्षा १० ते १५ दिवसांचा अधिक वेळ लागेल, असे शिपिंग कंपन्यांनी कळविल्याचे निर्यातदार सांगतात. मात्र प्रत्यक्षात ४५ ते ५० दिवस लागले. जानेवारीत गेलेले द्राक्षे मार्चच्या पहिल्या सप्ताहात पोहचले. एका सप्ताहात युरोपातील रोटरडॅम पोर्टवर ६०० ते ७०० कंटेनर पोहोचतात. सुरुवातीला दर असल्याने तुटवडा समजून निर्यात वाढली. मात्र नियोजन कोलमडल्याने पुढे एकदाच १ हजारावर कंटेनर येथे पोहोचल्याने

मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला. त्यात लागलेल्या अधिक वेळेमुळे मालाची टिकवणक्षमता व प्रतवारी घसरली. त्यामुळे पोहोचलेल्या मालाची काही अंशी खराबी झाल्याने तो रिपॅकिंग करून पुन्हा विकण्यासाठी कंटेनरमागे २.५ लाखांपर्यंत खर्च निर्यातदारांना करावा लागला. त्यात रिजेक्शन व दराचा फटका वेगळा, असे कंटेनरमागे सरासरी ३ ते ४.५ लाख रुपयांचे नुकसान काही निर्यातदारांचे झाल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने फेब्रुवारी व मार्चमध्ये निर्यात झालेल्या मालाचे नुकसान जास्त अधिक असल्याचे समजते.

निर्यातक्षम माल पाठवूनही तो वेळेवर न पोहोचल्याने नुकसान मोठे आहे. त्यामुळे कंटेनर भाड्यात सवलत मिळण्यासह निर्यात अनुदान मिळण्याची गरज आहे. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.
- बबनराव भालेराव, निर्यातदार, तिसगाव, ता. दिंडोरी
सुएझ कालव्यातून समुद्री वाहतूक बंद झाल्याने मोठा फटका यंदा निर्यात प्रक्रियेत बसला. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. तरच पुढील वर्षी द्राक्ष उद्योग यातून सावरू शकेल. झालेले नुकसान आर्थिक अडचणी वाढविणारे आहे.
- मधुकर गवळी, द्राक्ष निर्यातदार, उगाव, जि. नाशिक
शिपिंग कंपन्यांनी केलेली भाववाढ व नाशवंत शेतीमालाच्या निर्यात प्रक्रियेत अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने वेळोवेळी केली होती. त्यामुळे अतिरिक्त खर्चाची तरतूद केंद्र सरकारने करून द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अगोदरच कंटेनर भाववाढ झाल्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना २५ रुपये किलोमागे फटका बसलेला आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी केंद्राने धोरणात्मक पातळीवर निर्णय घेणे गरजेचे आहे.
-कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागातदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com