.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Chhatrapati Sambhajinagar News : नेमक उत्पादनक्षम क्षेत्र किती याचे उत्तर कोणाकडेच नसलेल्या मोसंबी उत्पादकांची फळगळ आणि नैसर्गिक आपत्तीने झोप उडविली आहे. आधी फळगळ आणि आता अतिपावसाने मोसंबी उत्पादकांच्या हानीत वाढ केल्याची स्थिती आहे. काही बागांमध्ये तर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत फळगळ झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मराठवाड्यात खासकरून जालना व छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे मोसंबीचे हब मानले जातात. बीड, परभणी व इतर जिल्ह्यांतही काही प्रमाणात मोसंबीच्या बागा दृष्टीस पडतात. परंतु कृषी विभागाकडून नेमक्या उत्पादनक्षम बागा किती, लागवड किती, त्यापैकी किती बागा काढल्या गेल्या, याचे मोजमाप होताना दिसत नाही. गणना न झाल्याने ते कळत नसल्याचे स्पष्ट आहे.
त्यामुळे उत्पादनक्षम फळबागांच्या नेमक्या क्षेत्राविषयी साशंकता कायम आहे. जालना जिल्ह्यातील फळे व मोसंबी बागायतदार संघाच्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टरपर्यंत मोसंबीचे क्षेत्र आहे. त्यापैकी गतवर्षी १८ हजार हेक्टर उत्पादनक्षम बागा होत्या.
यंदा उत्पादनक्षम बागांचे क्षेत्र सुमारे २० हजार हेक्टरपर्यंत असावेत. साधारणतः ७ ते १५ टनांपर्यंत एकरी उत्पादन होणाऱ्या बागेत यंदा मात्र २ ते ७ टनांपुढे आतापर्यंत कोणी सरकले नाही. म्हणजे सुमारे ४० ते ५० टक्के उत्पादनात घट स्पष्ट आहे. त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर होणाऱ्या फळगळीमुळे झालेल्या घटीचा वाटा सर्वाधिक आहे. अर्थात, हवामान प्रतिकूल राहिले तर या घटित आणखी वाढ होणार हे स्पष्ट आहे.
साधारणतः १५ ऑगस्टपासून पुढे दरवर्षी मोसंबीची तोड सुरू होते. यंदा मात्र विविध संकटांमुळे होणाऱ्या फळगळीची व्याप्ती वाढल्याने महिनाभर आधीपासूनच अपरिपक्व मोसंबी फळे बाजारात विक्रीसाठी आणली गेली. मोसंबीची पाचोड व जालना बाजारपेठ तसेच थेट बांधावरून होणाऱ्या खरेदीचा विचार करता आतापर्यंत ५० टक्के मोसंबी तोड झाल्याची माहिती व्यापारी वर्गाच्या सूत्रांनी दिली.
त्याचा थेट फटका उत्पादनात आणि उत्पन्नात मोसंबी उत्पादकांना बसतो आहे. त्यात लागून बसलेला पाऊस झालेली अतिवृष्टी याने मोसंबी उत्पादकांच्या हानीत भर टाकण्याचे काम केले आहे. याशिवाय आता ऑक्टोबर हीट कोणता गुण दाखवते, सुरू झालेल्या डासांचे प्रमाण किती वाढते, पाऊस थांबतो की लागूनच बसतो, फळगळ थांबवावी कशी, उत्पादनात आणि दरातही असलेली घट पाहता पुढे दर वाढतील मात्र तोवर फळगळीतून बाग वाचवावी कशी या सर्व विचाराने मोसंबी उत्पादक शेतकऱ्याची झोप उडाली आहे.
हेक्टरी किमान दोन लाखांचा फटका
आतापर्यंतच्या प्रतिकूल निसर्गामुळे आलेल्या संकटा पायी मोसंबी उत्पादकांना हेक्टरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत फटका बसला आहे. निसर्ग असाच प्रतिकूल राहिल्यास व फळगळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिणामकारक शास्त्रोक्त उपाय न मिळाल्यास यंदाचा हंगामानंतर मोसंबी बागा काढून टाकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार हे स्पष्ट आहे.
उत्तर भारतात लांबलेल्या पावसाचाही परिणाम
उत्पादनात घट येत असताना उत्तर भारतात लांबलेला पाऊस तेथील मोसंबीची मागणी कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे. साधारणतः १५ सप्टेंबरनंतर तिकडे पाऊस थांबल्यास मागणी वाढेल. त्याचा फायदा दर अधिक मिळण्यास होईल, असे मोसंबी खरेदीदार संघाचे नाथाभाऊ घनगाव म्हणाले. आताच्या घडीला १५ ते २१ हजार रुपये टनापर्यंत मोसंबीला दर मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
देठ, पान, माती, पाणी, फळ दिले तपासणीला
जालना जिल्हा फळे आणि मोसंबी बागायतदार संघाचे अध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे फळगळीचे कारण शोधण्यासाठी स्वतःच्या मोसंबी बागेतील देठ, पान, पिवळी झालेली फळ, माती, पाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे तपासणीसाठी ३० ऑगस्टला दिल्याची माहिती दिली. आपण विद्यापीठाकडे प्रत्येकी चार शास्त्रज्ञ सिट्रस सेंटर व विद्यापीठाच्या समन्वयातून छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत पाठविण्याची व फळगळीचे नेमके कारण शोधण्याची विनंती केल्याची माहितीही श्री. डोंगरे यांनी दिली. या संदर्भात दोन वेळा कुलगुरूंशीही आपण संवाद केल्याचे श्री. डोंगरे म्हणाले.
बांधावरच्या खरेदीत १० टक्के कटता
मोसंबीत थेट बांधावरून केल्या जाणाऱ्या खरेदीत टनामागे क्विंटलचा कट्टा घेतला जातो. अर्थात अकरा क्विंटलचा एक टन पकडला जातो. प्रसंगानुरूप व शेतकरी बघून बांधावरून खरेदी करणाऱ्यांकडून ही लूट अधिकची केली जात असल्याची ही माहिती मोसंबी उत्पादकांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.