Sweet Orange : मोसंबी फळगळीवर उपाययोजना

सध्या परिस्थितीत मोसंबीच्या आंबिया बहराची फळे वाढीच्या अवस्थेत आहेत. जुलै महिन्यात मोसंबी पट्ट्यात सतत रिमझिम पाऊस व सूर्यप्रकाशाचा अभाव राहिल्याने मोसंबीवर विपरीत परिणाम होऊन फळगळ दिसून आली आहे.
Sweet Orange
Sweet OrangeAgrowon

सा धारणपणे मोसंबी (Sweet Orange) पिकामध्ये वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ (Sweet Orange Fruit Fall), रोगांमुळे (sweet Orange Disease) होणारी फळगळ आणि किडीमुळे होणारी फळगळ दिसून येते. मोसंबी झाडांमध्ये नत्र आणि कार्बोहायड्रेट (कर्बोदके) योग्य प्रमाणात नसले की फळांची गळ सुरू होते. मुळातच मोसंबी बागायतदार झाडांना नत्र देत नाहीत. नत्रामुळे झाडात ऑक्झिन तयार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते, जास्त फळे असली की फळांमध्ये नत्रासाठी स्पर्धा सुरू होते. सध्या मराठवाड्यामधील मोसंबी बागांमध्ये (Sweet Orange Orchard) नत्राच्या वापराची कमतरता दिसून येते.

Sweet Orange
जालना जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, लिंबूच्या विमा परताव्यात तफावत

नत्र कमी असले की विविध जैविक क्रिया करण्यास झाड कमकुवत होते, कार्बोहायड्रेटमुळे वनस्पतीं पेशींच्या भिंती जाड होतात, फळांच्या देठांमध्ये विघटन पडदा तयार होत नाही. यातून पाण्याचा अभाव किंवा जास्तीचा अतिरेक या दोन्ही गोष्टींमुळे फळगळ होते. यामुळे अन्नद्रव्य व संजीवकांचे वहन मंदावते. सतत रिमझिम पाऊस आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रिया कमी होऊन अन्न संचय कमी झाल्यामुळे फळगळ दिसून आली.

वातावरणामधील आकस्मित बदलामुळे फळगळ होते. झाडांमध्ये ऑक्झिनचे असंतुलन तयार झाल्यामुळे फळगळ होते. पावसाळ्यात बागेमध्ये सतत पाणी साचून झाडांच्या मुळांच्या परिसरात जास्तीचा ओलावा तयार होतो त्यामुळे मुळांना प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे झाडाच्या श्‍वसनक्रियेवर विपरीत परिणाम होतो, याचा परिणाम झाडाची फळे पिवळी होऊन गळून पडतात. मोसंबीचा पिवळेपणा हा देठापासून सुरू होतो.

बुरशीचा प्रादुर्भाव ः

मोसंबीमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने फायटोप्थोरा, अल्टरनेरिया, डिप्लोडिया आदी बुरशींमुळे होते. बुरशीचा प्रादुर्भाव मोसंबीच्या देठास होऊन, फळाची साल व देठ या ठिकाणी काळपट तपकिरी डाग पडतात, परिणामी तो भाग कुजतो आणि फळांची गळ होते. ज्या बागेमध्ये झाडावर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील, त्या ठिकाणी बुरशींची बीजे मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करतात. परिणामी, सल असणाऱ्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ आढळून येते.

पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे बागेमध्ये फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. फळांवर तपकिरी डाग पडून ब्राऊन रॉट या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर दिसून येतो. याचबरोबर हिरवी फळे तपकिरी करड्या रंगाची होतात. फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते, फळे गळून पडतात.

कोलेटोट्रिकम बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ काळ्या रंगाची रिंग तयार होते. तो भाग काळा पडतो. नंतर अशी फळे काळी पडतात, गळून पडतात आणि देठांजवळ लटकत राहतात.

Sweet Orange
Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

लॅसी डिप्लोडिया या बुरशीमुळे फळांच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो, पिवळा असलेला भाग नंतर तपकिरी रंगाचा होतो. झाडावर वाळलेल्या काड्या असणाऱ्या बागेत या बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.

अल्टरनेरिया बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ काळ्या रंगाचा डाग पडतो. फळाच्या आतील गाभा काळा पडतो. बुरशीची वाढ होऊन फळगळ उद्‌भवते.

Sweet Orange
Sweet Orange : मोसंबी फळगळमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

फळगळीचे व्यवस्थापन

१) वाफ्याने पाणी देताना खोडाजवळ पाणी साचणार नाही, हे पहा. पावसाळ्यात वाफे मोडून शेतातील पाणी बाहेर काढावे.

२) गळलेली फळे बागेबाहेर खोल खड्ड्यात गाडावीत.

३) शास्त्रीय फळगळ व्यवस्थापनाकरिता पहिली फवारणी एनएए (१० पीपीएम) एक ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड (१५ पीपीएम) दीड ग्रॅम अधिक एक किलो युरिया प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी एनएए (१० पीपीएम) एक ग्रॅम किंवा जिबरेलिक ॲसिड (१५ पीपीएम) दीड ग्रॅम अधिक ब्रोसिनोलॉईड Brocinoloid (चार पीपीएम) ०.४ ग्रॅम अधिक फॉलिक ॲसिड (१०० पीपीएम) दहा ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

४) झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करताना, झाडांवर पानांची संख्या कमी असल्यास, पाने पिवळट हिरव्या रंगाची असल्यास कॅल्शिअम अमोनिअम नायट्रेट १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

५) झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून ऑगस्ट महिन्यात फवारणी करावी.

६) बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे, ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या भागात फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होतो. सद्यःस्थितीत फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारी पानगळ, फळगळ व फळावरील तपकिरी कुज रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील ए एल अडीच ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्‍लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. झाडाखाली आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर आठ दिवसांनी बागेमध्ये १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक १०० ग्रॅम सुडोमोनास हे १ किलो शेणखतात मिसळून प्रति झाड दिल्यास फळगळ थांबण्यास मदत होते.

७) बुरशीजन्य फळगळीच्या नियंत्रणासाठी ०.६ टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्झिक्‍लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन अधिक डायफेनकोनॅझोल १ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(टीप ः ॲग्रेस्को शिफारशी )

- डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४

(प्रमुख शास्रज्ञ, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com